New Experience, New Innings ... - Shreyas Talpade | नवा अनुभव, नवी इनिंग...- श्रेयस तळपदे

अभिनेता श्रेयस तळपदे ‘पोस्टर बॉयज’ या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्दर्शनाची नवी जबाबदारी या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने उत्कृष्टरित्या पेलली. त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

१.अभिनेता, कलाकार, दिग्दर्शक म्हणून तू मराठी इंडस्ट्रीतील सर्व स्थित्यंतर पाहिली आहेस, काय वाटते या संपूर्ण बदलाविषयी?
- मी चित्रपटांमध्ये जेव्हा एक अभिनेता म्हणून काम केले, तेव्हा मी नवखा होतो. हळूहळू माझ्या माहितीमध्ये भर पडत गेली. चित्रपटाची स्क्रिप्ट, लेखन, दिग्दर्शन या सर्व गोष्टींचा मी खुप अभ्यास करायचो. आपल्या आयुष्यात सोशल मीडियाचा अंतर्भाव झाला आणि चित्रपटाची मार्केटिंग, प्रमोशन या सर्व गोष्टी सुरू झाल्या. मराठी इंडस्ट्री देखील आता हळूहळू विकसित होत आहे. बिग बजेट चित्रपट आता मराठीतही साकारणे सुरू झाले आहे. ट्रेंड बदलतो आहे. त्यासोबत मराठी प्रेक्षकांनीही थोडंसं बदलणं अपेक्षित आहे. 

२. एक कलाकार म्हणून इंडस्ट्रीत येण्याअगोदर थिएटर करणं किती गरजेचं असतं?
- कुणीही व्यक्ती जन्मत:च कलाकार नसतो. व्यक्तीमधील कलाकार शोधून काढण्यासाठीच थिएटर करणं गरजेचं आहे. थिएटरमध्ये कलाकार अनेक गोष्टी शिकतो. या शिकलेल्या गोष्टींचा त्याला पुढे खूप फायदा होतो. चित्रपटांमध्ये काम करताना त्याला अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो ज्या त्याने थिएटरमध्ये शिक लेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक कलाकाराने थिएटर हे के लेच पाहिजे.

३. सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- दिग्दर्शक म्हणून ‘पोस्टर बॉयज’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांच्या भेटीला आलो आहे. नवा अनुभव, नवी इनिंग मी सुरू केली. अभिनेता म्हणून मी अनेक वर्ष काम केलं पण, दिग्दर्शन करण्याचा प्रवास मी एन्जॉय केला. दिग्दर्शन करत असताना सनी पाजी आणि बॉबी पाजी यांच्यासमोर खूप नर्व्हस होतो. मात्र, अभिनेता म्हणून त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं.

४. अभिनेता, दिग्दर्शक आणि कुटुंबवत्सल व्यक्ती या सगळ्या पातळया कशा सांभाळता?
- खरंतर अ‍ॅक्टिंग माझं पॅशन आहे. माझं हे पॅशन पूर्ण करण्यासाठी माझ्या पाठीमागे माझी पत्नीही तेवढीच खंबीरपणे उभी असते. एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हटल्यावर माणूस त्यासाठी काहीही करायला तयार होतो. कुटुंबासह सर्व पातळ्यांमधून जायला मला काहीही अडचण येत नाही. सर्वकाही मी मॅनेज करत असतो. 

५. समीक्षणाचा चित्रपटाच्या कमाईवर किती परिणाम होतो, काय वाटते?
- चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटाचं समीक्षण होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. त्या समीक्षणाचा प्रेक्षकांवरही परिणाम होतो. चित्रपटाला किती रेटिंग आहे हे पाहूनच प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येतात. मात्र, ही सगळी तयारी अर्थात निर्मात्याला ठेवावीच लागते. चित्रपट हिट होणार की फ्लॉप हे कुणाच्याही हातात नसतं. 

Web Title: New Experience, New Innings ... - Shreyas Talpade
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.