Making an actor a cricketer !!! | एक अभिनेत्याला क्रिकेटर घडविताना!!!

EXCLUSIVE 
भारतीय क्रिकेटचा यशस्वी कप्तान महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर चित्रपट बनत असताना त्याची भूमिका साकारायला त्याच्यासारखाच मेहनती अभिनेता अपेक्षित होता, आणि सुदैवाने सुशांतसिंह राजपूत हा धोनीसारखाच दिसत असल्याने त्याला धोनीची भूमिका साकारायला मिळाली. सुशांतनेही अतोेनात मेहनत घेऊन महेंद्रसिंहच्या भूमिकेला न्याय दिला तसेच माझ्या प्रशिक्षणालाही साकार केले. म्हणून सुशांतच धोनीच्या भूमिकेसाठी ‘परफेक्ट’ आहे, असे भारतीय क्रिकेटचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी ‘लोकमत सीएनएक्स’ला सांगितले. 

महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनावरील ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत साकारत आहे. एका अभिनेत्याला क्रिकेटरची भूमिका साकारण्यासाठी त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण देणे गरजेचे होते. म्हणून सुशांतला किरण मोरे यांनी सुमारे ८ ते ९ महिने क्रिकेटचे प्रशिक्षण देऊन एक अभिनेता ते क्रिकेटर घडविले. सुशांतला क्रिकेटर घडविताना आलेला अनुभव किरण मोरे यांनी सीएनएक्सला सांगितला. 

एका अभिनेत्याला क्रिकेटचा काही अनुभव नसताना त्याला एका क्रिकेटरच्या भूमिकेसाठी सज्ज करणे खूप कठीण होते. तसे सुशांतला शिकविताना मलाही बरेच काही शिकायला मिळाले. आणि तो माझ्यासाठीही मोठा अनुभव होता. कारण लहान मुलांना शिकविणे सोपे, परंतू पंचवीस-तीस वयातील व्यक्तिला शिकविणे खूप कठीण असते. मात्र सुशांतनेही दिलेल्या प्रशिक्षणावर मेहनत तर घेतली शिवाय धोकादेखील पत्करून तो रोज सातत्याने तासनतास क्रिकेटचा सराव करायचा. सराव करत असताना सुशांतला बºयाचदा तोंड व हाताला बॉलदेखील लागले. मात्र सुशांत कधीही घाबरला नाही. एखाद्या अभिनेत्याला त्याचा चेहरा आणि हात-पायाची काळजी घेणे अनिवार्य असते, कारण त्याचे करिअर त्याच्यावरच असते, मात्र काही झाले तरी ही भूमिका मी यशस्वी पार पाडणारच असा हट्टहास सुशांतचा होता. यावरुन कोणतीही भूमिका साकारताना सुशांत किती जीव ओतून त्या भूमिकेला न्याय देतो याचा प्रत्यय येत होता. 
धोनीची भूमिका प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुशांत ठरल्याप्रमाणे रोज सकाळी ६.३० वाजता ग्राऊंडवर पोहचायचा. रोज कसून सराव करायचा आणि किमान चारशे बॉल खेळायचा. धोनी कसा खेळायचा, कोणता बॉल कसा पकडायचा, त्याची फलंदाजी, त्याची देहबोली याचे वेगवेगळ्या अ‍ॅँगलचे व्हिडीओ आम्ही सोबत पाहायचो आणि तसाच सराव सुशांत करायचा. 

सुशांत ग्राऊंडवर खेळत असताना त्याला एकदा सचिन तेंडूलकरने पाहिले आणि हा कोण नवीन खेळाडू असे विचारले. मी सांगितले की हा अभिनेता सुशांत आहे. सचिननेही त्याचे खेळणे पाहून आश्चर्य व्यक्त केल की, एका परिपूर्ण क्रिकेटरसारखाच खेळतोेय! यावरुन अभिनेता ते एका यशस्वी क्रिकेटरची भूमिका सत्यात उतविताना सुशांतने किती मेहनत घेतली हे दिसून येते. सुशांत हा खरच खूप मेहनती व हुशार अभिनेता असून तो भविष्यात खूप मोठा स्टार होईल हे आवर्जून सांगू इच्छितो. 

ravindra.more@lokmat.com
Web Title: Making an actor a cricketer !!!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.