जाणून घ्या माधुरी दीक्षितचे काय मत आहे राजकारणात प्रवेश करण्याविषयी

By प्राजक्ता चिटणीस | Published: April 16, 2019 07:47 PM2019-04-16T19:47:27+5:302019-04-16T19:49:00+5:30

अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत. राजकारणात प्रवेश करण्याविषयी माधुरीचे काय मत आहे हे तिने नुकतेच सांगितले.

madhuri dixit opens about her political views during kalank promotion | जाणून घ्या माधुरी दीक्षितचे काय मत आहे राजकारणात प्रवेश करण्याविषयी

जाणून घ्या माधुरी दीक्षितचे काय मत आहे राजकारणात प्रवेश करण्याविषयी

googlenewsNext
ठळक मुद्देराजकारणात प्रवेश करण्यासाठी त्याविषयी तुम्हाला आवड असावी लागते. तसेच सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणे गरजेचे असते. मला राजकारणात रस नसल्याने राजकारणात जाण्याचा प्रश्नच येत नाही. 

माधुरी दीक्षितचा कलंक हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील भूमिकेविषयी आणि तिच्या नृत्याच्या आवडीविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...

कलंक हा मल्टीस्टारर चित्रपट असून अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचे फायदे आणि तोटे काय असतात?
मल्टीस्टारर चित्रपटात खूप स्टार असल्याने चित्रपटाची जबाबदारी एकाच्या खांद्यावर नसते. प्रत्येकाचा चित्रपटाच्या यशात-अपयशात वाटा असतो आणि त्यातही प्रत्येक कलाकाराचे एक वेगळे फॅन फॉलॉव्हिंग असते. त्यामुळे या चित्रपटांला प्रेक्षकांचे प्रेम मिळेल की नाही याची चिंता कमी असते. अशा चित्रपटांचे चित्रीकरण करताना तर खूपच वेगळा अनुभव असतो. अनेक कलाकार एकत्र असल्याने एक वेगळी एनर्जी सेटवर असते. त्यामुळे तुम्हाला देखील तुमचा अभिनय अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. चित्रपटात अनेक कलाकार असल्याने तुमच्या वाट्याला भूमिका तितकीशी मोठी येत नाही. पण तरीही तुमच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे सोने करणे हे तुमच्या हातात असते.

कलंक या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी पहिल्यांदाच आलिया, वरुण या अभिनेत्यांसोबत काम करत आहे. आलिया खूप चांगली अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना आपण अभिनय न करताना एकमेकांशी बोलतच आहोत असे वाटते. तिने या चित्रपटात नृत्य देखील खूप चांगले केले आहे. कथ्थक न शिकता देखील तिने अतिशय ग्रेसफुली नृत्य केले आहे यासाठी तिचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. वरुणसोबत या चित्रपटात माझे खूप महत्त्वाची दृश्यं आहेत. अभिनयाच्या बाबतीत तो गेल्या काही वर्षांत खूप मॅच्युअर्ड झाला आहे असे मी आवर्जून सांगेन. मी आणि संजय दत्तने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. साजन नंतर तर संजयला एक वेगळी ओळख मिळाली. तो खूप चांगला अभिनेता असून त्याच्यासोबत काम करताना मजा येते.

तुझे आणि नृत्याचे एक वेगळेच नाते आहे, याविषयी काय सांगशील?
मी तीन वर्षांची असल्यापासून नृत्य शिकत आहे. अनेक वर्षं मी नृत्याचे धडे गिरवले आहेत. आजही मी दिवसातील दोन तास नृत्याचा रियाज करते. त्यामुळे नृत्य हे माझ्या रक्तात भिनले आहे. मी स्वतः नृत्य खूप एन्जॉय करते. या चित्रपटात देखील मी एका गाण्यावर नृत्य करताना दिसणार आहे. हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले आहे. त्यांच्यासोबत मी अनेक वर्षांनी काम केले. पण आमच्या दोघांना काय हवे आहे ते आम्हाला एकमेकींना चांगलेच माहीत आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघी एकमेकींसोबत खूपच कर्म्फटेबल असतो. 

तू आता अभिनयानंतर निर्मितीक्षेत्रात प्रवेश केला आहेस. निर्मिती आणि अभिनय यांच्यात काय फरक जाणवला?
चित्रपटाची निर्मिती करणे हे खूपच कठीण असते. तुम्ही वाचलेली कथा पडद्यावर मांडणे हा प्रवास खूपच अवघड असतो. अभिनय करताना तुम्ही तुमचे काम करून घरी निघून जाता. पण निर्माता म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. मी मराठी चित्रपटाद्वारे नुकत्याच माझ्या निर्मिती क्षेत्रातील करियरला सुरुवात केली. माझा १५ ऑगस्ट हा चित्रपट मी चित्रपटगृहात प्रदर्शित न करता डिजिटल माध्यमात प्रदर्शित का केला असे मला आज अनेकजण विचारत आहेत. पण मराठी चित्रपटांना चित्रपटगृहं कमी मिळतात हे वास्तव आहे. त्यातही एका आठवड्यात एकाहून अधिक चित्रपट असल्यास चित्रपटगृहांची संख्या अजून कमी होते आणि त्याचवेळात एखादा हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत असेल तर मराठी चित्रपटांना चित्रपटगृहं मिळणे खूपच कठीण जाते. म्हणून मी माझा चित्रपट डिजिटल माध्यमात प्रदर्शित करण्याचे ठरवले. डिजिटलमुळे तुम्हाला जगभरात पोहोचता येते आणि त्याचा फायदा तुमच्या चित्रपटाला नक्कीच होतो. 

अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत, तुझा राजकारणात येण्याचा काही विचार आहे का?
राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्याविषयी तुम्हाला आवड असावी लागते. तसेच सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणे गरजेचे असते. मला राजकारणात रस नसल्याने राजकारणात जाण्याचा प्रश्नच येत नाही. 

Web Title: madhuri dixit opens about her political views during kalank promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.