नुकताच संजय लीला भन्साली यांच्या बहुप्रतिक्षित पद्मावती सिनेमाता ट्रेलर रिलीज झाला. भव्यदिव्य असा सिनेमाचा ट्रेलर रसिकांना चांगलाच भावतो आहे. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये एक गोष्ट सा-यांच्या नजरा आकर्षित करत आहे, ती बाब म्हणजे दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांचे जबरदस्त पोशाख आणि पेहराव (कॉस्टच्युम). या सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने राणी पद्मावती ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. शाहिद कपूरने महाराजा रतन सिंह तर रणवीर सिंहने अल्लाउद्दीन खिलजी ही भूमिका साकारली आहे. सिनेमात सगळ्याच कलाकारांचा पेहराव आणि पोशाख आकर्षक आणि तितकाच वजनदार आहे. दीपिका, रणवीर आणि शाहिद यांच्या पोशाख-पेहरावाची जबाबदारी डिझायनर रिंपल आणि हरप्रीत नरुला यांनी समर्थपणे पेलली आहे. ट्रेलरमध्ये या तिघांचा पेहराव आणि पोशाख भव्य असल्याचं पाहायला मिळत असून त्यामुळेच तो रसिकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमातील व्यक्तीरेखांचा पोशाख आणि पेहराव त्या त्या काळानुरुप दाखवण्यात आला आहे. संजय लीला भन्साली यांच्या स्क्रीप्टनुसार सिनेमातील व्यक्तीरेखांचा पोशाख आणि पेहराव डिझाईन केल्याचं हरप्रीत आणि रिंपल यांनी सांगितले आहे.राणी पद्मावतीचा पोशाख आणि पेहराव डिझाईन करणं आव्हानात्मक होतं असं त्यांना वाटतं.पद्मावतीच्या पोशाखात श्रीलंकन लूकचा प्रभाव पाहायला मिळेल. यावरील नक्षीकाम आणि पोशाख आकर्षक वाटावा म्हणून लावण्यात आलेले दागदागिने वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या भूमिकेसाठी दीपिकानं हलकासा मेकअप केला आहे.त्यामुळे या पोशाख आणि पेहरावात दीपिकाचं नैसर्गिक सौंदर्य रसिकांना पाहायला मिळणार आहे.शाहिद कपूर या सिनेमात महाराज रतन सिंह ही भूमिका साकारत आहे. चौदाव्या शतकातील चित्तौडच्या वातावरणानुसार शाहिदच्या पोशाख आणि पेहरावाची निवड करण्यात आली आहे. त्या काळात प्रसिद्ध असलेली पेहरावाच्या शैलीचा खास विचार करण्यात आला आहे. शाहिदचा पोशाख शोधण्यासाठी तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला. प्राचीन वस्त्र आणि वेशभूषा समजून घेण्यासाठी रिंपल आणि हरप्रीत यांनी जगातील विविध संग्रहालयाला भेटीसुद्धा दिल्या. महाराजा रतन सिंह यांच्या पोशाखात राजस्थानची झलक आणि छटा दिसावी यासाठी वेजिटेबल डाईची मदत घेण्यात आली असं या दोन्ही डिझायनर्सनी सांगितलं. पद्मावती सिनेमात रणवीर सिंह महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तो अल्लाऊद्दीन खिलजी ही भूमिका साकारतोय. कपटी आणि तितकाच क्रूर अशी छबी असणा-या खिलजीला लक्षात घेऊनच रणवीरचा पोशाख आणि पेहराव डिझाईन करण्यात आला आहे. यासाठी रिंपल आणि हरप्रीत यांनी अफगाणिस्तान आणि कजाकिस्तान, मध्य आशिया तसंच तुर्कीच्या आजूबाजूच्या परिसरात वेशभूषा आणि पोशाखाचा शोध घेतला. खिलजीच्या तरुण योद्धा, आक्रमण करणारा इथपासून ते सुलतान अशा विविध छबी लक्षात घेऊन त्याचा पोशाख पेहराव डिझाईन करण्यात आला आहे. रिंपल आणि हरप्रीत यांनी याआधी 'बाजीराव मस्तानी', 'सावरियाँ' आणि 'रामलीला' सिनेमातही कॉस्ट्च्युम डिझायनर म्हणून भूमिका निभावली होती. 
Web Title: Learn Deepika, Ranveer, Shahid's Costume Moment in Padmavati Cinema!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.