Kangana Ranaut named in CDR case! Jackie Shroff's wife Ayesha Shroff is in trouble! | ​सीडीआर प्रकरणात कंगना राणौतचे नाव! जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफही अडचणीत!!

ठाण्यातील बेकायदेशीर कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात बॉलिवूडचे मोठे स्टार्स अडकत असल्याचे चित्र आहे. नव्या चौकशीत याप्रकरणात बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ या दोघींची नावे समोर आली आहेत. कंगना व आयशा या दोघीही सीडीआर रॅकेटमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला वकील रिजवान सिद्दीकी याच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
रिजवान सिद्दीकी हा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा वकील आहे. तीन दिवसांपूर्वी त्याला सीडीआरप्रकरणी अटक करण्यात आली. डीसीपी (गुन्हे शाखा) अभिषेक त्रिमुखे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना या तपासाचा खुलासा केला.
त्यांनी सांगितले की, या प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकार आणि उद्योगपतींचा पर्दाफाश होणार आहे. सिद्दीकीचे फोन रेकॉर्ड तपासल्यानंतर आयशा श्रॉफ यांनी अवैधरित्या अभिनेता साहिल खान याचे सीडीआर काढले होते, असे समोर आले आहे. ( साहिल खान हा आयशा यांचा व्यावसायिक भागीदार आहे.) याप्रकरणी आयशा यांना समन्स बजावण्यात आला आहे. कंगना राणौत हिने सुद्धा हृतिक रोशनचा मोबाईल नंबर रिजवानसोबत शेअर केल्याचे पुरावे आहेत. हृतिकचा सीडीआर मिळवण्यासाठी कंगणाने त्याचा मोबाईल पाठवला होता का, याची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यासाठी कंगणाला नोटीस बजावणार आहे. सीडीआर प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. चौकशीनंतरच त्यांनी अवैधरित्या सीडीआर का मिळवले, हे स्पष्ट होईल, असे त्रिमुखे म्हणाले. सिद्दीकीने चौकशीत अनेक खुलासे केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ALSO READ : ‘या’ अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटली बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत!

रिजवान सिद्दीकीच्या अडचणी वाढल्या
सीडीआरप्रकरणी अटक करण्यात आलेला रिजवान सिद्दीकीच्या अडचणी दिवसागाणिक वाढत आहेत. मॉडेल व अभिनेत्री रोजलीन हिने मंगळवारी रिजवानविरोधात तक्रार दाखल केली. रिजवानने अवैधरित्या आपले सीडीआर काढलेत, असा आरोप तिने केला आहे. रोजलीनने २०१३ मध्ये मुंबईचा माजी आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.  याप्रकरणात रिजवान सिद्दीकी रोजलीनचा वकील होता. पण नंतर तो रोजलीनची साथ सोडून पारसकरच्या बाजूने झाला. याप्रकरणात पारसकर यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती.
Web Title: Kangana Ranaut named in CDR case! Jackie Shroff's wife Ayesha Shroff is in trouble!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.