Kamal Haasan will enter AAP, will Arvind Kejriwal visit today! | कमल हासन करणार ‘आप’मध्ये प्रवेश?, आज अरविंद केजरीवाल घेणार भेट!

सुपरस्टार कमल हासनने जेव्हापासून राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हापासूनच त्यांचे नाव कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जोडले जात आहे. आता या चर्चांवर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. होय, कमल हासन आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज (दि.२१) त्यांची चेन्नई येथील निवासस्थानी भेट घेणार आहेत. जेव्हा या दोघांच्या भेटीची बातमी समोर आली तेव्हापासून कमल आपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. वास्तविक अद्यापपर्यंत त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

दरम्यान, कमल हासन यांच्या आपचे संयोजक तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेटीवरून असा दावा केला जात आहे की, ते लवकरच आम आदमी पक्षात प्रवेश करतील. सुरुवातीला त्यांना कॉँग्रेस तथा भाजपामध्ये आणण्यासाठी विशेष फिल्डिंग लावली जात होती. परंतु हे पक्ष माझ्या विचारधारेशी निगडित नसल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केल्याने, ते अन्य पर्याय स्वीकारतील, असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, वृत्तानुसार कमल हासन यांनी सीएम केजरीवाल यांच्या स्वागताकरिता दुपारचे स्नेहभोजन ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.वास्तविक केजरीवाल आणि कमल हासन यांच्या भेटीची बातमी अत्यंत गुपित ठेवण्यात आली होती. मात्र आता ही बातमी समोर आली आहे. असो, केजरीवाल गुरुवारी सकाळी चेन्नईला पोहोचणार असून, सायंकाळी उशिरापर्यंत दिल्लीत परतणार आहे. काही दिवसांपूर्वीच केजरीवाल दहा दिवसांसाठी इगतपुरी येथे विपश्यना योग शिबिरात सहभागी झाले होते. दिल्ली परतल्यानंतर ते २० सप्टेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात गेले नव्हते. परंतु त्यांनी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांची सायंकाळी भेट घेतली होती. 

मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला की, अरविंद केजरीवाल सुपरस्टार रजनीकांत यांच्याही संपर्कात आहेत. मात्र अद्यापपर्यंत हे स्पष्ट होऊ शकले नाही की, रजनीकांत यांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे. असो, काही दिवसांपूर्वीच कमल हासन यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त करताना स्वत:चा पक्ष काढणार असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर भाजपा आणि संघावर आपला रोष व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट केले होते की, भगवा सोडून कुठलाही रंग स्वीकारण्यास तयार आहे. आता ते आपचे सर्वेसर्वा केजरीवाल यांना भेटणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे. 
Web Title: Kamal Haasan will enter AAP, will Arvind Kejriwal visit today!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.