महल, पाकीजा, रजिया सुलतान अशा  भव्य कलाकृती पडद्यावर जिवंत करणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी सन १९९३ मध्ये आजच्याच दिवशी (११ फेबु्रवारी) जगाचा निरोप घेतला होता.  गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक अशीही त्यांची ओळख होती.  कमाल अमरोही यांनी आपल्या अख्ख्या फिल्मी करिअरमध्ये केवळ पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यापैकी एक होता, ‘पाकिजा’. मीना कुमारीच्या अभिनयाने सजलेल्या ‘पाकिजा’कडे एक चित्रपट म्हणून नव्हे तर एक अमर कलाकृती म्हणून बघितले जाते. पण हीच अमर कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४ वर्षे लागलीत. होय, १९५८ साली या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आणि १९७२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.  याचे मुख्य कारण होते कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली ‘पाकिजा’ची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतरचा तलाक.

असेही म्हणतात की,  सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मध्यस्थी केली नसती ‘पाकिजा’ कधीच बनला नसता.   सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर कमाल अमरोही व मीना कुमारी दोघेही पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. प्रदीर्घ खंडानंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात झाली, तोपर्यंत मीनाकुमारीला व्याधींनी घेरले होते. पण त्याची पर्वा न करता तिने चित्रीकरण पूर्ण केले. मात्र तिच्या आजारपणाची आणि वाढलेल्या वयाची छाया चित्रपटातील काही मोजक्या दृश्यांत आणि ‘तीर ए नजर’सारख्या गाण्यात दिसते. १९७२ साली चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुदैर्वाने काही दिवसांतच मीनाकुमारीचे निधन झाले. सुरुवातीच्या काही दिवसांत हा चित्रपट फार चालला नव्हता. नंतर  चित्रपट हिट झाला.

कमाल अमरोही यांच्या नावाचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता. अशावेळी मीना कुमारी त्यांच्या प्रेमात पडली.  कमाल अमरोही हे  जिद्दी, जातिवंत कलाकार होते. त्यांच्या कामात कोणी लुडबूड केलेली त्यांना अजिबात सहन होत नसे. देखणे व्यक्तिमत्व, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अशा तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या कमाल यांच्या प्रेमात मीनाकुमारी पुरती वेडी झाली. कमाल यांनी तिच्या प्रेमाचा स्वीकार करून तिच्याशी ‘निकाह’ केला. कमाल अमरोहींनी त्यांची पहिली पत्नी आणि मुलांना गावी पाठवून मीनाकुमारीसोबत संसार सुरु केला.

सुरुवातीची काही वर्षे सुखाची गेली. पण नंतर कमाल यांच्या तापट स्वभावामुळे  त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळेनासे झाले. याऊलट   मीनाकुमारी यशाच्या पायºया चढू लागली. यातच मीनाकुमारीचे स्वच्छंदी वर्तन त्यांच्यातील वादाला कारण ठरू लागले. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मीनाकुमारीला यश खुणावत होते.  यातच तिला दारूचे व्यसन जडले. कमाल अमरोहींची बंधने तिला नकोशी वाटू लागली आणि एक दिवस कमाल अमरोहीचा सोन्याचा पिंजरा सोडून ती बाहेर पडली.  यामुळे  ‘पाकिजा’ चित्रपट अर्धवट राहिला होता. दोघेही एकमेकांसोबत काम करण्यास तयार नसताना सुनील दत्त व नर्गिस यांनी दोघांना कसेबसे राजी केले आणि नाखुशीने का होईना कमाल व मीना कुमारी यांनी ‘पाकिजा’ पूर्ण केला. तोपर्यंत मीनाकुमारीचे यश दिवसेंदिवस वाढू लागले तसे तिचे व्यसनही. ती पूर्णत: व्यसनाच्या आधीन झाली होती. पुढे ३१ मार्च १९७२ रोजी मीना कुमारीने जगाचा निरोप घेतला. तर ११ फेबु्रवारी १९९३ मध्ये कमाल अमरोही यांनीही जगाला अलविदा म्हटले.


Web Title: kamal amrohi death anniversary personal life meena kumari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.