Journey of 'Raji' was not easy - Meghna Gulzar | ‘राजी’चा प्रवास सोपा नव्हता-मेघना गुलजार

मेघना गुलजार- बॉलिवूडमधील एक मोठ्ठं नाव. ‘तल्वार’,‘जस्ट मॅरिड’,‘फिलहाल’, ‘दस कहानियाँ’ या चित्रपटांचे उत्कृष्ट दिग्दर्शन करणारी कर्तृत्ववान दिग्दर्शक आणि लेखिकाही. चित्रपटाच्या स्क्रिप्ट लिखाणापासून तिने करिअरला सुरूवात केली. गुलजार आणि राखी यांची एकुलती एक कन्या असूनही तिने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपड केली. सध्या ‘राजी’मुळे ती चर्चेत आहे. सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणे आणि १९७१ची चित्रपटात वातावरणनिर्मिती करणे ही आव्हाने चित्रपटाच्या माध्यमातून तिने दिग्दर्शक म्हणून पेलली. या चित्रपटाच्या निमित्ताने जान्हवी सामंत यांनी तिच्याशी मारलेल्या या गप्पा...

* ‘राजी’च्या प्रवासाविषयी काय सांगशील?
- जेव्हा राजीची स्क्रिप्ट माझ्याकडे आली तेव्हा मी अनेक स्क्रिप्टवर काम करत होते. मला चित्रपटाची स्टोरीलाईन आवडली होती. मग मी आलियाशी चित्रपटाविषयी बोलले. ती मला म्हणाली,‘तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट पूर्ण कराल तेव्हा मला सांगा; कारण मी हा चित्रपट करू इच्छिते.’ मला आणि करण जोहरला अनेक वर्षांपासून एकत्र काम करायचेच होते. धर्मा प्रोडक्शन आणि मी मग ‘राजी’च्या प्रवासाला सुरूवात केली. ‘राजी’ हा एका सत्यघटनेवर आधारित चित्रपट असून १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश एका मोठ्या  युद्धाच्या तोंडावर असताना या मुलीला भारतातून पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. भारताच्या या मुलीचे एका पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत लग्न होते आणि पाकिस्तानात पोहोचल्यावर भारतीय हेर या नात्याने ती मायभूमीच्या रक्षणासाठी जीवाचे रान करते, याभोवती कथानक फिरते. पण, तो काळ मोठया पडद्यावर पे्रक्षकांसमोर उभा करणे तितकेसे सोपे नव्हते. 

*  ‘सहमत’ या व्यक्तिरेखेसाठी आलिया भट्ट हिची निवड का केली?
-  एकतर तिचं २०वर्षाचं वय. तिचे व्यक्तिमत्त्व. ती अगदी तंतोतंत काश्मिरी मुलीसारखी वाटते. सत्य घटनेत ज्या मुलीने तिच्या जीवाची बाजी लावली आहे, तिचे कार्य, तिचे समर्पण या सगळया गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. आलियाच्या व्यक्तिरेखेचा प्रवास तिच्या भूमिका निवडीपासूनच झाला. मला आलियाची क्षमता, तिची कामाप्रती समर्पण वृत्ती मला माहित आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेसाठी मला तीच अत्यंत उत्कृष्ट वाटली. 

* एक दिग्दर्शक म्हणून ‘राझी’ करताना कोणकोणत्या अडचणींचा तुला सामना करावा लागला?
- एकतर मला पडद्यावर १९७१चा काळ चित्रीत करायचा होता. त्यात पाकिस्तानातील दृश्ये साकारायची होती. पाकिस्तानातील लोकांचे राहणीमान, बोलण्याची लकब, घरे, रितीरिवाज या सर्व गोष्टींचा मला अभ्यास करावा लागला. सर्व कलाकारांचा अभिनय नैसर्गिक वाटण्यासाठी स्क्रिप्टवर मेहनत घ्यावी लागली. खासकरून आलियाकडे आमचे विशेष लक्ष असायचे. लग्न झाल्यानंतरची सहमत कशी असेल? ती सून, नणंद, पत्नी या सर्व भूमिकांमधून जाताना तिचा वावर कसा असेल? तिच्या बोलण्याची, विचार करण्याची पद्धत यांवर काम करावे लागले. 

*  सध्या बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांविषयी तुझं मत काय?
- गेल्या ५ वर्षांपासून मी पाहतेय चित्रपटाच्या कंटेंटवर खूप भर दिला जातो. विविध विषय हाताळले जातात, प्रेक्षकांभिमुख चित्रपट साकारण्याकडे विशेष कल दिसून येत आहे. काही नवे प्रोडक्शन हाऊस देखील सुरू झाले आहेत. त्यामुळे काही नवी आव्हाने स्विकारली जात आहेत. त्याचबरोबर प्रादेशिक सिनेमाही बरीच प्रसिद्धी मिळवत आहेत. 

* गुलजार यांची मुलगी असण्याची एक चांगली आणि एक वाईट बाब कोणती ​?
- चांगली बाब मी सांगेन की, मी लहानाची मोठी केव्हा झाले हे मला कळलंच नाही. जेव्हा मी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा मला गुलजारची मुलगी म्हणून कुणीच ट्रीट केलं नाही. मी माझी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत होते. त्याशिवाय वाईट बाब म्हणून मी सांगणार नाही पण, मी अनेकदा पप्पांना विचारायचे की, तुम्ही एवढ्या प्रेशरमध्ये काम कसं करता? त्यांनी मला या गोष्टीचं उत्तर न देता स्वत: अनुभवायला लावलं. तिथूनच माझा मेघना गुलजार म्हणून खरा प्रवास सुरू झाला.

* एखादा विषय किंवा घटना ज्यावर तुला भविष्यात चित्रपट करायला आवडेल?
- होय, मी एका चित्रपटावर काम करत आहे. पण, त्यानंतर मी राजीच्या अगोदर ज्या स्क्रिप्टवर काम करत होते त्यावरच मी पुन्हा काम सुरू करणार आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा होईल. मला सध्याच्या काळातील वास्तवावर एखादा चित्रपट साकारायचा आहे. विचार सुरू आहे, लवकरच अ‍ॅक्शन प्लॅन हाती घेईल.
Web Title: Journey of 'Raji' was not easy - Meghna Gulzar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.