Ishaan Khattar is the guidance given by Shahid Kapoor | इशान खत्तर सांगतोय शाहिद कपूरने दिले हे मार्गदर्शन

बियॉण्ड द क्लाऊड्स या चित्रपटाद्वारे शाहीद कपूरचा लहान भाऊ इशान खत्तर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओपनिंग चित्रपटाचा मान मिळालेल्या 'बियॉण्ड द क्लाऊड्स'मधील इशानच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत आणि बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी बियॉण्ड द क्लाऊड्स याच चित्रपटाची निवड का केलीस?
बियॉण्ड द क्लाऊड्स या चित्रपटाने माझी निवड केली असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या चित्रपटांचा मी फॅन आहे. त्याच्या चित्रपटाद्वारे मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे याचा मला प्रचंड आनंद होत आहे. या चित्रपटाच्या ऑडिशन्ससाठी मला बोलवण्यात आले होते. मी ऑडिशन दिल्यानंतर त्याच दिवशी माझी निवड झाली असल्याचे मला कळवण्यात आले. या सगळ्या गोष्टी इतक्या जलद घडल्या की, मी खरंच या चित्रपटाचा भाग आहे यावर मला काही वेळ विश्वासच बसत नव्हता. 

या चित्रपटासाठी तू कित्येक किलो वजन कमी केले आहेस, त्यासाठी तुला किती मेहनत घ्यावी लागली?
या चित्रपटात मी अतिशय गरीब मुलाची भूमिका साकारत आहे. या मुलाला अनेकवेळा जेवायला देखील मिळत नाही. त्यामुळे माझी शरीरयष्टी ही त्याचप्रकारे असली पाहिजे असे माजिद सरांचे म्हणणे होते. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या केवळ बारा दिवस आधी मला आठ किलो वजन कमी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. माझ्याकडे वेळ खूपच कमी होता. त्यामुळे मी जिमला जाणे सोडले आणि केवळ सायकल चालवण्याचा व्यायाम करायला लागलो. तसेच डाएट करायला सुरुवात केली. या डाएटनुसार मला दोन-दोन तासाने जेवायला लागायचे. मी माझ्या आईसोबत राहातो. पण त्याकाळात माझी आई एका कामानिमित्त शहराच्या बाहेर गेली होती. त्यामुळे मी बारा दिवस केवळ आणि केवळ माझ्या वजन कमी करण्याला दिले.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी शाहिदने तुला कशाप्रकारे मार्गदर्शन केले?
मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे हे ऐकल्यावर तो खूपच खूश झाला होता आणि त्यात मला पहिल्याच चित्रपटात माजिद मजिदी यांच्यासोबत काम करायला मिळतेय त्याचा त्याला अधिक आनंद झाला होता. मला इतक्या चांगल्या दिग्दर्शकासोबत पदार्पण करायला मिळत असल्याने माझी जबाबदारी प्रचंड वाढली असल्याचे त्याने मला सांगितले. चित्रपटाच्या मुहुर्तालादेखील तो आला होता. माझा मेकअप होईपर्यंत तो माझ्यासोबत व्हॅनिटी व्हॅनमध्येच बसला होता. मी चित्रीकरण करायला गेल्यावर तो गेला. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्याने मला कधीच कोणताही सल्ला दिला नाही. मी माझा शोध स्वतःहून घेतला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते.

या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील विविध परिसरात झाले आहे, त्याचा अनुभव कसा होता?
मी स्वतः लहानाचा मोठा मुंबईत झालो असल्याने मी मुंबईतील अनेक ठिकाणे पाहिली आहेत. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मला मी न पाहिलेली मुंबई पाहायला मिळाली. या चित्रपटामुळे माझा मुंबईकडे पाहाण्याचा दृष्टिकोनच बदलला. या चित्रपटासाठी धोबीघाट, धारावी, दादर यांसारख्या रिअल लोकेशन्सवर आम्ही चित्रीकरण केले आहे. 
Web Title: Ishaan Khattar is the guidance given by Shahid Kapoor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.