#Interview: Staying away from social media, life will find meaning - Ashpal Sharma! | #Interview : सोशल मीडियापासून दूर रहा, जीवनाचा अर्थ सापडेल -यशपाल शर्मा !

आपण जे काम करतो त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून द्या. जे करू ते मनापासून करू असा निश्चय करा, मग बघा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, असा यशाचा सल्ला प्रसिद्ध अभिनेते यशपाल शर्मा यांनी तरुणाईला दिला. या सोबतच जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर काही काळ मोबाईल, सोशल मीडिया या भ्रमीक जगाला बाजूला सारा, मग तुम्हाला जीवनाचा अर्थ सापडेल, असाही सल्ला त्यांनी दिला. 

रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट यांच्यावतीने यशपाल शर्मा यांचा तरुणाईशी संवाद साधण्यासाठी ‘यूथ मीट’ या कार्यक्रमाचे गुरुवारी दुपारी मायादेवी नगरातील रोटरी हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. आदिवासी बांधवांसाठी लढणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील झिलाबाई यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. 

अभिनेत्री तथा दिग्दर्शिका प्रतिभा शर्मा, क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. सूरज जहाँगिर, मुख्य समन्वयक गनी मेमन, सचिव कृष्णकुमार वाणी, झिलाबाई, जननायक फाउंडेशनचे होनाजी चव्हाण उपस्थित होते. 

साहित्याचे मोठे योगदान
अभासी जगातून बाहेर पडून तुम्ही चांगल्या साहित्याचे वाचन करा. चांगल्या व्यक्तिमत्वासाठी साहित्याचे मोठे योगदान असल्याचे सांगून मराठीतील शिवाजी सावंत, वसंत देव, विजय तेंडुलकर या लेखकांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. यांच्यासह इतरही लेखकांचे साहित्य तुम्ही वाचल्यास विचार प्रगल्भ होतील असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. 

आयुष्यात अविस्मरणीय क्षण
झिलाबाई यांच्यावर लघुपट तयार करणाऱ्या, यशपाल शर्मा यांच्या पत्नी प्रतिभा शर्मा यांनी सांगितले की, मी जिल्ह्यातील कासोदा येथील असून प्रतिभा शिंदे या माझ्या चांगल्या मैत्रीण आहे. त्यांच्या सांगण्यावरून मी हा विषय घेतला. झिलाबाई व माझे काही जुने नाते असावे, त्यामुळे आमच्यात खूप चांगला संवाद असल्याचेही त्या म्हणाल्या. 

आभासी जगात तरुणाई भरकटतेय
तरुणाईशी गप्पा मारताना सर्व प्रथम यशपाल शर्मा यांनी आजची तरुणाई भरटली असल्याचे सांगून त्यांना यातून सावरण्याचे आवाहन केले. काही काळ मोबाईलला दूर सारा व जेथे नेटवर्क नाही तेथे जाऊन बघा, तेथे मनाला किती शांती मिळेल. आज जगासोबत चालले पाहिजे, असेही ते म्हणाले, मात्र या अभासी जगाच्या आहारी न जाता जे कर्म कराल, ते पूर्ण मनापासून करा, तुम्ही हमखास यशस्वी व्हाल, असेही त्यांनी नमूद केले. 

रंगमंच हेच खरे साधनेचे ठिकाण 
चित्रपट व नाटक यांच्यातील तुलनेबाबत बोलताना यशपाल म्हणाले, नाटकातूनच खरी भूमिका साकारली जाते. त्यामुळे रंगमंच हेच खरे साधनेचे ठिकाण आहे.  
‘वो कल भी चुना लगाते थे और आज भी चुना लगा रहे है...’

आपल्या गप्पांचा शेवट यशपाल यांनी काही ओळींनी केला. यामध्ये त्यांनी नेत्यांच्या भूमिकेवरील कविता मांडताना सांगितले की, एका नेत्याची हकालपट्टी होऊन तो पान टपरी चालवू लागला. त्यावर पत्नी म्हणते, बघा एका नेत्याचे हाल ते पान टपरी चालवित आहे. त्यावर पतीने उत्तर दिले, ‘वो कल भी चुना लगाते थे और आज भी चुना लगा रहे है...’, या ओळींनी सभागृहात जोरदार हशा पिकला. 

खलनायकाची भूमिका चांगली म्हणताच टाळ्यांचा  कडकडाट
एरव्ही चित्रपटातील नायकाची भूमिका सर्वांना आवडते. मात्र माझ्या दृष्टीने खलनायकाची भूमिका सर्वात चांगली आहे. कारण संपूर्ण चित्रपटात तो नायकाला त्रास देत असतो व आनंद घेत असतो. त्यामुळे हीच भूमिका मला जास्त आवडते, असे उत्तर भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला यशपाल यांनी दिले. त्यांच्या या उत्तरावर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तुम्ही एकदम चांगले, नम्र वागून चालणार नाही, थोडे खोडकर असायलाच हवे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: #Interview: Staying away from social media, life will find meaning - Ashpal Sharma!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.