FTII's hand in my hand: Anupam Kher | माझ्या जडणघडणीत एफटीआयआयचा मोठा हात : अनुपम खेर

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली. तसेच त्यांचा रांची डायरीज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याबाबत अनुपम खेर यांच्याशी मारलेल्या गप्पा...

एफटीआयआयच्या अध्यपदी तुमची निवड झाल्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एफटीआयआयमध्ये कामकाज कशाप्रकारे करायचे हे तुम्ही ठरवले आहे का?
मी रांची डायरीज या माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाद्वारे मी फॅन्सशी लाइव्ह चॅट करत होतो. त्याचवेळी एका फॅनने मला अभिनंदन केले आणि चॅटमधूनच मला ही बातमी कळली. एफटीआयआयच्या बाबतीत घोषणा करण्यापूर्वी एक दिवस आधी मला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून फोन आला होता आणि मी या पदाचा भार स्वीकारावा असे त्यांना वाटत असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. पण आमचे बोलणे झाल्यानंतर मला काहीही ऑफिशअल मेसेज किंवा पत्र आले नव्हते. ही बातमी माझ्या चाहत्यांकडून मला कळल्यावर मी खूपच खूश झालो. मी आजवर घेतलेल्या मेहनतीचे मला फळ मिळाले. माझ्यावर एक खूप मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी तितकीच मेहनत घेणार आहे. एफटीआयआयसोबत माझे जवळचे नाते आहे. कारण मी सहा महिने तिथे शिक्षण घेतले आहे. चित्रपटांमध्ये अभिनय कसा करायचा हे तिथेच मी शिकलो. तसेच तिथे मला अनेक क्लासिक चित्रपट पाहायला मिळाले. त्यामुळे माझ्या जडणघडणीत एफटीआयआयचा मोठा हात आहे. ही संस्था आज एका नावाजलेली संस्था आहे. एक अभिनेता, शिक्षण म्हणून माझा आजवरचा अनुभव मी त्या मुलांसोबत वाटणार आहे आणि विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मदतीने या संस्थेचे अजून नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे.

तुमच्या या आजवरच्या प्रवासाविषयी काय सांगाल?
मी गेली ३५ वर्षं चित्रपटसृष्टीत आहे. हे ३५ वर्षं कसे गेले हे मला देखील कळले नाही. पण मी कधी मागे वळून पाहात नाही. मी वर्तमानात आणि भविष्यात रमणारा माणूस आहे. अजूनही मला खूप सारा प्रवास करायचा आहे. वन्य विभागात माझे वडील क्लर्क होते. आम्ही सिमलामध्ये राहात होतो. लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि मी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज मला इतके यश मिळवता आले आहे. कुछ भी हो सकता है हेच माझे जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आहे.

तुम्ही सध्या नवीन पिढीसोबत देखील काम करत आहात, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
नवीन पिढी खूप हुशार आहे. त्यांच्यात शिकण्याची प्रचंड आवड आहे. माझे अभिनयाचे क्लासेस आहे, या क्लासेसमधील मुलांकडून अनेकवेळा मला खूप काही शिकायला मिळते. स्वतःला लोकांसमोर सादर कसे करायचे हे या पिढीला चांगलेच माहीत आहे. तसेच सोशल मीडियामुळे ही पिढी जगाशी खूप चांगल्याप्रकारे जोडली गेली आहे. त्यामुळे या नव्या पिढीसोबत काम करताना खूप मजा येते.

गेल्या काही वर्षांत चित्रपटांचे प्रमोशन किती बदलले आहे?
मी ज्यावेळी चित्रपटसृष्टीत आलो, त्यावेळी चित्रपटांचे प्रमोशन करणे हा प्रकारच नव्हता. चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली तर ते आवर्जून चित्रपटगृहात जायचे. पण आता आपण बनवलेले प्रोडक्ट किती चांगले आहे हे लोकांना ओरडून सांगावे लागते. काळ खूपच बदलला आहे. तुम्हाला यात टिकून राहायचे असेल तर तुम्ही देखील काळाप्रमाणे बदलणे गरजेचे आहे.

रांची डायरीज या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?
एम एस धोनी या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना रांची हे शहर मला प्रचंड आवडले होते. त्यामुळे मीच या चित्रपटाचा दिग्दर्शक सात्विक मोहन्तीला रांची या शहरात चित्रीकरण करण्याविषयी सुचवले होते. त्याने हे शहर पाहिले आणि तो देखील या शहराच्या प्रेमात पडला. सात्विकने मला या चित्रपटाची कथा ऐकवली, त्यावेळी त्याच्याकडे या चित्रपटासाठी निर्माताच नव्हता. भरपूर वर्षांपूर्वी मी मुंबईत आलो, त्यावेळी मला देखील मदत करायला कोणी नव्हते. सात्विकच्या चित्रपटाची कथा चांगली असल्याने मी त्याला मदत करायचे ठरवले आणि मीच या चित्रपटाचा निर्माता बनलो. या चित्रपटात सौंदर्या शर्मा ही नवीन मुलगी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच जिमी शेरगील, सतिश कौशिक आणि मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहोत.  

Also Read : 'हम आपके हैं कौन' सिनेमाच्या 'त्या' सीनमधील अनुपम खेर यांच्या 'चेह-यामागचं वास्तव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Web Title: FTII's hand in my hand: Anupam Kher
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.