FIR against Priya Warrior in Aurangabad; Religious feelings have been hurt! | औरंगाबादमध्ये प्रिया वारियरविरोधात तक्रार दाखल; धार्मिक भावना दुखाविल्याचा आरोप!

एका स्थानिक संघटनेकडून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश आणि तिच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर लुलू यांच्याविरोधात औरंगाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत ‘ओरू अदार लव’ या गाण्यामधून धार्मिक भावना दुखाविल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार महाराष्ट्रातील एका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. वास्तविक पोलिसांनी अद्यापपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. मात्र या गाण्यावरून ही पहिलीच तक्रार नसून, यापूर्वीदेखील हैदराबाद येथील काही तरुणांनी प्रिया आणि दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

औरंगाबादमधील जिन्सी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार ‘जनजागरण समिती’च्या काही तरुण कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष मोहसीन अहमदने पीटीआयशी बोलताना म्हटले की, धार्मिक भावना दुखाविण्यासाठी जाणूनबुजून अशाप्रकारच्या गाण्याची रचना केली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की, कलम २९५ अंतर्गत प्रिया वारियर, दिग्दर्शक ओमर लुलू आणि निर्मात्यावर गुन्हा दाखल केला जावा. द इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार, जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी फहीम हाशमी यांनी या तक्रारीच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. हाशमीने म्हटले की, आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली असून, त्यामध्ये मुस्लीम समाजाच्या भावना दुखाविल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या आम्ही याप्रकरणी वरिष्ठांच्या सूचना माागविल्या आहेत. त्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, याअगोदर प्रिया प्रकाशविरोधात एका मौलवीने फतवादेखील काढला होता. प्रिया प्रकाश एका गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली. सध्या तिच्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Web Title: FIR against Priya Warrior in Aurangabad; Religious feelings have been hurt!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.