Diljeet Dosanjh and Tapasi Pannu's 'Surma' trailer release! | दिलजीत दोसांज व तापसी पन्नूच्या ‘सूरमा’चा ट्रेलर रिलीज!

या भारतभूमीवर अनेक हॉकीपटू झालेत. काही आजही लोकांच्या लक्षात आहेत तर अनेजण क्रीडाप्रेमींच्या विस्मृतीत गेलेत. असाच एक विस्मृतीत गेलेला हॉकी स्टार म्हणजे संदीप सिंह. भारतीय हॉकीस्टार संदीप सिंहच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. अनेक संघर्षाअंती संदीप सिंह भारताच्या हॉकी संघात स्थान मिळवतो, यानंतर एक स्टार खेळाडू बनतो. पण यापश्चात त्याच्यासोबत असे काही घडते की, त्याच्या शरिराचा खालचा भाग लुळा पडतो. येथून सुरु होतो, संदीप सिंहचा नवा संघर्ष. दिलजीत दोसांज आणि तापसी पन्नू यांचा अभिनय असलेल्या ‘सूरमा’ या आगामी चित्रपटात संदीप सिंहचा हा संघर्ष दाखवला गेला आहे.
आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. दिग्दर्शक साद अली यांनी या ट्रेलरमध्ये संदीपच्या आयुष्यातील सर्व संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यात दिलजीतने संदीपची भूमिका साकारली आहे.पंजाबचा एक ‘गबरू जवान’ असलेल्या दिलजीत अर्थात संदीपची नजर तापसी पन्नूवर पडते आणि तो हॉकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतो. इथून या ट्रेलरची सुरूवात होते. मैदानात उतरल्यावर एका क्षणाला भारतासाठी खेळायचेच असा निर्धार तो करतो. या प्रवासात त्याची जिद्द, त्याची मेहनत, त्याचा संघर्ष आणि देशभक्ती याचे दर्शन ट्रेलरमध्ये घडते. दोसांज यात मुख्य भूमिकेत असल्याने ट्रेलरमध्ये त्याच्याशिवाय अन्य कुठल्याही कलाकारावर फोकस करण्यात आलेला नाही. येत्या १३ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस  येत आहे. हा ट्रेलर तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. 
संदीप सिंह एक लीजेंड हॉकी खेळाडू व भारतीय राष्ट्रीय हॉकी टीमचा माजी कर्णधार होता. जगातील सर्वात वेगवान ड्रॅग फ्लिकर म्हणून संदीप सिंहला ओळखले जाते. त्याच्या ड्रॅगचा वेग ताशी १४५ किमी/तास होता आणि या शानदार वेगामुळे त्याला ‘फ्लिकर सिंह’ म्हणूनही ओळखले जाते. संदीप सिंह ‘कमबॅक सिंह’ म्हणूनही ओळखला जातो.

Web Title: Diljeet Dosanjh and Tapasi Pannu's 'Surma' trailer release!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.