Dilip Kumar's condition is unhealthy; Lilavati ICU filed! | दिलीपकुमार यांची प्रकृती अस्वास्थ्य; लीलावतीच्या आयसीयूमध्ये दाखल!

सुपरस्टार दिलीपकुमार यांना अचानकच किडनीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी याबाबतची माहिती देताना म्हटले की, त्यांना किडनीचा त्रास जाणवू लागल्यानेच आयसीयूमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीविषयी  सध्या कुठल्याही प्रकारची माहिती समोर आली नसल्याने; डॉक्टरांच्या अधिकृत अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. 

आज दुपारी त्यांना किडनीचा त्रास जाणवत होता. शिवाय त्याच्या उजव्या पायाला सूजही आली होती. त्यामुळे त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना सातत्याने प्रकृतीचा त्रास जाणवत असून, श्वासोच्छ्वास घेण्याच्या समस्येने ते त्रस्त आहेत. ९४ वर्षीय दिलीपकुमार यांना ‘दादासाहेब फाळके’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी ‘मधुमती’, ‘मुघल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘गंगा जमुना’, ‘राम और श्याम’ आणि ‘कर्मा’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीपकुमार १९९८ मध्ये आलेल्या ‘किला’ या चित्रपटात अखेरीस अभिनय करताना त्यांच्या चाहत्यांना दिसले. काही दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी सायरा बानो यांनी सोशल मीडियावर त्यांचे नवीन शर्ट आणि पॅण्ट परिधान केलेले फोटो शेअर केले होते. वास्तविक दिलीपकुमार या वयातही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. 

त्यांच्या चित्रपट करिअरविषयी सांगायचे झाल्यास, त्यांनी १९४४ मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली. तब्बल सहा दशक त्यांनी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा, अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे. 
Web Title: Dilip Kumar's condition is unhealthy; Lilavati ICU filed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.