Comedy movie entertains viewers - Happy Shadow! | कॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया !

-रवींद्र मोरे 
टीव्ही मालिका ते बॉलिवूड चित्रपटातील अभिनयापर्यंत हर्ष छाया यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारुन दर्शकांचे मनोरंजन केले आहे. अभिनयाच्या दीर्घ अनुभवानंतर हर्ष यांनी ‘खजूर पे अटके’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा एक फॅमिली कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाच्या प्रवासाबाबत त्यांच्यासोबत मारलेल्या मनसोक्त गप्पा...!

* आजपर्यंत अनेक कॉमेडी चित्रपट आलेत, तर आपल्या या चित्रपटाचे वेगळेपण काय आहे?
- या चित्रपटाचे वेगळेपण हे दर्शकच ठरवतील. मी कहाणी लिहताना वेगळेपणाचा विचारच केला नव्हता, मनात आले आणि स्क्रीप्ट लिहिली. यात वेगळेपणाचा विचार केला तर ही एक ब्लॅक कामेडी आहे. एका मनुष्याच्या मृत्यूच्या अवती भोवती फिरणारी ही कॉमेडी कहाणी होय. मृत्यूचा विषय आला की गांभिर्य येतच. मात्र मृत्यू तर होणारच मात्र त्यातही आपणास आपले आयुष्य कसे सजग जगता येते, हे या कहाणीत कॉमेडी स्वरुपात दाखविण्यात आले आहे. 

* चित्रपटातील कॅरेक्टर्स शोधताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
- भूमिकेला न्याय देणारे म्हणजेच स्क्रीप्टनुसार अनुभवी अ‍ॅक्टर्स मिळणे, आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवणे, हे एक मोठे चॅलेंज होते. विशेषत: जे अ‍ॅक्टर्स मिळाले ते खूपच त्या क्षेत्रातले अनुभवी आहेत. सर्वांनीच आपल्या पद्धतीने भूमिकेला न्याय दिला आहे, असे मी ठामपणे सागंतो. 

* चित्रपट पाहताना कोणता अनुभव येईल?
- हा चित्रपट फॅमिली कॉमेडी असून १०० टक्के प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडित आहे. विशेष म्हणजे संपूर्ण फॅमिलीने हा चित्रपट सोबत पाहण्याची मजा काही औरच आहे. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपण स्वत:ला शोधत असल्याचा अनुभव चित्रपट पाहताना येणार आहे. आपण जसे घरात, कुटुंबात वागतो तेच कॅरेक्टर्स चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा कॉमेडी दर्शकांना भावेल, असे मला वाटते.

* हा चित्रपट दर्शकांनी का पाहावा, याबाबत काय सांगाल? 
- कॉमेडी चित्रपट पाहण्याअगोदर असे म्हटले जाते की, ‘बुद्धी घरी सोडून यावी..’ मात्र मी असे सांगतो की, हा चित्रपट पाहताना संपूर्ण बुद्धीचा वापर करुन पाहावा. हा चित्रपट म्हणजे ‘वन लाईन जोक’ नाही तर आपल्या आयुष्यातील गंभीर प्रश्नांना सहज कसे हाताळायचे, ही शिकवण देणारा चित्रपट होय. हा चित्रपट म्हणजे संपूर्ण कुटुंबाला आयुष्याचे गणित शिकवणारा आहे.  

* आगामी काळात कोणत्या आशयावर चित्रपट बनविण्याचा विचार आहे?
- नपुंसकता या विषयावर मला फोकस करायचा असून त्यावर माझे कामही सुरु झाले आहे. अलिकडे आलेल्या ‘शुभ मंगल सावधान’ यात हा विषय दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र तो विषय त्या चित्रपटात लग्नाप्रसंगी थांबल्याचे दाखविण्यात आले आहे, मात्र माझ्या चित्रपटात हा विषय लग्नापासून सुरु होताना दाखविले जाणार आहे. 
Web Title: Comedy movie entertains viewers - Happy Shadow!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.