Bollywood has many good and bad experiences- Ankit Tiwari | ​बॉलिवूडने अनेक बरे-वाईट अनुभव दिलेत- अंकित तिवारी

- रूपाली मुधोळकर

‘आशिकी2’च्या हिट गाण्यांनंतर संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेला बॉलिवूडचा पार्श्वगायक अंकित तिवारी येत्या २३ मार्चला नागपुरात येतो आहे. लोकमत परिवाराकडून दिवंगत जोत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणाºया  सूर जोत्स्रा राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याचे तो खास आकर्षण असणार आहे. या पाचव्या सूर जोत्स्रा राष्ट्रीय संगीत पुरस्कारसोहळ्यात अंकितच्या गीतांवर थिरकण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. याचनिमित्ताने अंकितशी मारलेल्या खास गप्पांचा हा वृत्तांत....


प्रश्न : सूर जोत्स्रा राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने तू पुन्हा एकदा लोकमत परिवार आणि नागपूरकरांसोबत असणार आहेस. किती उत्सूक आहेस?
अंकित : लोकमत परिवाराशी माझे मधूर संबंध आहेत. किंबहुना मी स्वत:ला नेहमीच या परिवाराचा एक भाग समजत आलोय. लोकमत परिवाराच्या कार्यक्रमानिमित्त मी याआधीही नागपुरात आलेलो आहे. त्यावेळीही नागपूरकरांनी मला भरभरून प्रेम दिले. यावेळी नागपूरकर कुठलीही कसर सोडणार नाहीत, हा विश्वास मला आहे. निश्चितपणे मी या सोहळ्यासाठी प्रचंड उत्सूक आहे.

प्रश्न : अंकित, नवे नवे लग्न झालेय. (गत २३ फेबु्रवारीला अंकित लग्नबंधनात अडकला.) लग्नानंतर अशी कुठली एक गोष्ट बदलल्याचे जाणवतेयं?
अंकित : (खळखळून हसत) सध्या तरी काहीही नाही. लग्नाला उणेपुरे सात दिवस झाले आहेत. अजूनही लग्नाचे विधी संपलेले नाहीत. त्यामुळे नक्की काय बदलले किंवा काय बदलणार आहे, याचा अंदाज अद्याप तरी आलेला नाही. तसेही मला कुठलेही वाईट व्यसन नाही. त्यामुळे मला एकदम असे काही बदलावे लागेल नाही, असे दिसतेय.

प्रश्न : बॉलिवूडमध्ये सध्या नवे नवे गायक येत आहेत. नवे टॅलेंट येतेयं. यांच्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोण काय?
अंकित : मी नव्या लोकांना माझे स्पर्धक मानत नाही. कारण माझी स्पर्धा माझ्या स्वत:शी आहे आणि मला माझ्याशीच सुरू असलेली ही स्पर्धा जिंकायची तर कष्टाला पर्याय नाहीये, हेही मला ठाऊक आहे. त्यामुळे मला चिंता नाही. केवळ कष्ट करायचे आणि पुढे जायचे, एवढेच मी माझ्यापुरते ठरवले आहे.

प्रश्न : कानपूर ते बॉलिवूड या प्रवासाबद्दल थोडक्यात काय सांगशील?
अंकित : हा प्रवास माझ्यासाठी अनेक चढ-ऊतारांनी भरलेला राहिला. नाव, पैसा, यश सगळे काही मिळाले. सोबतच खूप काही शिकवून जाणारे अनुभवही मिळाले. या अनुभवांनी माणूस म्हणून मला घडवले. पुढेही हेच अनुभव माझ्या कामी येतील, एवढेच मी सांगेल.

प्रश्न : तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांग.
अंकित : लवकरच ‘बागी2’ येतोय. त्यात माझे गाणे चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे. याशिवाय ‘तेरे इश्क की बारीश’ हे गाणे गाणे नुकतेच डिजिटली रिलीज झाले. ‘महबुबा’ हा अल्बमही येतोय. 

ALSO READ : गायक आणि संगीतकार अंकित तिवारी पल्लवी शुक्लासोबत अडकला लग्नाच्या बेडीत
Web Title: Bollywood has many good and bad experiences- Ankit Tiwari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.