Bobby Deol took lottery; Salman Khan decided Lucky Charm! | बॉबी देओलला लागली लॉटरी; सलमान खान ठरला लकी चार्म!

चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्याने अतिशय हलाखीचे जीवन जगणारा अभिनेता बॉबी देओलची गाडी पुन्हा एकदा रुळावर येताना दिसून येत आहे. अर्थातच यामागेही भाईजान सलमान खान याचाच खूप मोठा हात आहे. सध्या बॉबी भाईजान सलमानसोबत ‘रेस-३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त ‘यमला पगला दीवना फिर से’ या त्याच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही तो सध्या विविध ठिकाणी हजेरी लावत आहे. या चित्रपटात तो मोठा भाऊ सनी देओल आणि पापा धर्मेंद्र यांच्यासोबत बघावयास मिळेल. तर ‘रेस-३’मध्ये तो सलमान खान, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, साकिब सलीम आणि डेजी शाह या जबरदस्त स्टारकास्टसोबत अ‍ॅक्शन करताना दिसेल. दरम्यान, बॉबीसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. होय, सलमानसोबत जबरदस्त अ‍ॅक्शन केल्यानंतर बॉबी साजिद नाडियाडवाला यांच्या ‘हाउसफुल-४’मध्ये अक्षयकुमारसोबत अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट त्याने साइन केला असून, त्याची एकप्रकारे लॉटरीच लागली आहे. 

दरम्यान, ‘हाउसफुल-४’मध्ये बॉबी देओलसोबत अभिनेता अक्षयकुमार आणि रितेश देशमुख बघावयास मिळणार आहे. यावेळेस चित्रपटाची कथा पुनर्जन्मावर आधारित असल्याने जबरदस्त कॉमेडी बघावयास मिळणार आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याचबरोबर बॉबी या कॉमेडी सिक्वेंसमध्ये कितपत परफेक्ट बसेल हे बघणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. 
 

सध्या बॉबी त्याच्या ‘रेस-३’ या चित्रपटाची अबूधाबी येथे शूटिंग करीत आहे. त्यानेच ‘हाउसफुल-४’बाबतची माहिती दिली. बॉबीने म्हटले की, ‘मी दोन्ही साजिदसोबत (निर्माता साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक साजिद खान) काम करण्यावरून खूश आहे. माझी सुरुवातीपासूनच साजिद नाडियाडवालासोबत काम करण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण होताना दिसत आहे. अक्षय आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. त्याच्यासोबत पुन्हा एकदा काम करणे मजेशीर असेल. ‘हाउसफुल-४’ खूप मोठी फ्रेंचाइसी आहे. त्यामुळे चित्रपटाची शूटिंग केव्हा सुरू होणार याची मी प्रतीक्षा करीत आहे. 
Web Title: Bobby Deol took lottery; Salman Khan decided Lucky Charm!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.