-रवींद्र मोरे 
गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यात यावर्षी राजकीय व्यक्तींना प्राधान्य देत राजकारणात प्रभावी व्यक्तींच्या आयुष्यावर काही दर्जेदार चित्रपटांची निर्मिती बॉलिवूडमध्ये करण्यात येणार आहे. यात बॉलिवूडचे काही दिग्गज स्टार राजकीय भूमिका साकारताना दिसणार असून कोणते कलाकार पडद्यावरील राजकारणात आपले नशीब आजमावू पाहत आहेत, याबाबत घेतलेला हा वृत्तांत...

* विद्या बालन

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळा ठसा उमटविणारी अभिनेत्री विद्या बालन आपणास सागरिका घोष यांच्या 'इंदिरा, इंडियाज मोस्ट पॉवरफुल पीएम' या पुस्तकावर आधारित चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलिकडेच तिने 'तुम्हारी सुलू'मध्ये एका गृहिणीची भूमिका साकारली होती. ती आता लवकरच पडद्यावरील राजकारणात उतरणार आहे.

* अनुपम खेर

गेल्या काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारित आगामी 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता दिसून येत आहे. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर साकारणार असून अलिकडेच या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूकचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. त्यात ते हुबेहूब माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे चालताना दिसत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

* नवाजुद्दीन सिद्दीकी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यात बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी नवाजुद्दीनला खूपच मेहनत घ्यावी लागत असल्याचे समजते. डिसेंबर २०१७ मध्ये या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. शिवाय जानेवारी २०१८ मध्ये टिझरदेखील रिलीज करण्यात आला. यात नवाजुद्दीन अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच दिसत असून दर्शकांनी या टिझरला खूपच प्रतिसाद दिला. 

* इरफान खान

अ‍ॅमेझॉनच्या 'द मिनिस्ट्री' या शोमध्ये इरफान एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकीय व्यंगावर आधारित या सिरीजमध्ये राजकारणाचे विविध पैलू दर्शकांना बघावयास मिळणार आहेत. अलिकडेच इरफान शूटिंगसाठी पंजाबला जात असताना तो आजारी पडला होता, त्यामुळे काही दिवस शूटिंग थांबविण्यात आली होती. इरफानचा दमदार अभिनय यात दिसणार असून दर्शकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

* रिचा चड्डा

सुधीर मिश्रा यांच्या 'दास देव' या चित्रपटात अभिनेत्री रिचा चड्डा राजकारणातील एका प्रभावी महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 'देवदास' आणि 'हेमलेट' यांचे एकत्रिकरण असून यात रिचा चड्डा पॉलिटिक्स करताना दिसणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात तिची दमदार भूमिका बघावयास मिळत आहे. येत्या काही दिवसातच हा चित्रपट रिलीज होणार आहे.   
Web Title: And 'Politics' will play on the screen!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.