Actor Smriti Biswas-Narang gave help to Nasik | अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांना नाशिककरांनी दिला मदतीचा हात!

लावण्यखानी सौंदर्य आणि दमदार अभिनयाने तब्बल तीन दशके चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजवूनही दादासाहेब फाळकेंच्या भूमित अडगळीचे आयुष्य जगणाºया अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांना नाशिककरांनी मदतीचा हात दिला आहे. नाशिक पोलीस आयोजित ‘नाशिक मॅरेथॉन’ स्पर्धेदरम्यान त्यांना ५१ हजारांचा धनादेश पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल उपस्थित होते. १७ फेब्रुवारी रोजी ‘अभिनयाची सम्राज्ञी जगते नाशकात हलाखीचे जीवन’ अशा मथळ्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
 
कधीकाळी कोट्यवधी रूपयांची संपत्ती नावे असलेल्या स्मृती आज देवळाली कॅम्प परिसरात अवघ्या पाचशे स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये वास्तव्य करीत आहेत. मनोरंजन उद्योग विश्वातील लोकांनी पाठ फिरविल्याने त्यांना खूपच हलाखीचे जीवन जगावे लागत असताना वैद्यकीय उपचारासाठीही पदरी पैसे नसल्याची दयनीय अवस्था त्यांची झाली आहे. स्मृती यांना डॉ. राजीव आणि जितू अशी दोन अविवाहित मुले असून, दोघेही हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. अशात समाजातील दात्यांनी मदत करावी अशी त्यांनी हाक देताच नाशिककरांनी त्यास साद घातली आहे. 

ALSO READ : B'day Special : कधीकाळी कोट्यवधींची मालकीण असलेली ‘ही’ अभिनेत्री नाशिकमध्ये जगतेय हलाखीचे जीवन!

नाशिकरांंसह पोलीस खात्यातील काही अधिकारी व कर्मचाºयांनी आर्थिक स्वरूपाची मदत गोळा करून त्यांना ५१ हजाराचा धनादेश दिला. याव्यतिरिक्तही समाजातील आणखी काही मंडळी त्यांना मदतीसाठी पुढे येत आहेत. ‘नेक दिल’, ‘अपराजिता’, ‘मॉडर्न गर्ल’ असे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी काम केले. दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारानेही गौरविण्यात आले. त्यामध्ये ‘दादासाहेब फाळके गोल्डन ईरा’ यासारख्या मानाच्या पुरस्काराचा समावेश आहे. 

मदत कौतुकास्पद
अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांना नाशिककरांनी मदतीचा हात देवून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. स्मृती यांचे मनोरंजन विश्वातील योगदान खरोखरच अतुलनीय आहे. एवढ्या मोठ्या अभिनेत्री नाशिकमध्ये हलाखीचे जीवन जगत असल्याने, नाशिककरांनी केलेली मदत कौतुकास्पदच म्हणावी लागेल. 
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त 
Web Title: Actor Smriti Biswas-Narang gave help to Nasik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.