'Acting My Comfort Zone' - Wiki Kaushal | ‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल

‘मसान’,‘जुबान’,‘बॉम्बे वेल्वेट’,‘लव शव ते चिकन खुराना’ यासारख्या चित्रपटांमध्ये चोखंदळ भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल लवकरच ‘राझी’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिच्यासोबत त्याची जोडी जमली आहे. या चित्रपटाविषयी आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी जान्हवी सामंत यांनी त्याच्यासोबत चर्चा केली. 

* ‘राझी’ या चित्रपटातील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील? तुझ्या व्यक्तिरेखेतील कोणती बाब तुला जास्त आवडली?
- इकबाल सय्यद ही व्यक्तिरेखा मी साकारत असून इकबाल हा पाकिस्तानी आर्मीमध्ये मेजर असतो. त्याचीही फॅमिली असते. तो एका काश्मिरी मुलीसोबत लग्न करतो. ती गुप्तहेर आहे हे त्याला माहिती नसतं. १९७१ च्या युद्धातील सर्व चित्रण या चित्रपटात करण्यात आलं असून या युद्धाच्या काळातच या दोघांचे लग्न होते. या चित्रपटाच्या बाबतीत मला आवडलेली बाब म्हणजे शूटींग पूर्ण झाल्यानंतर मला एकदम हायसं वाटलं. वाह, हे सगळं शूटिंग इतकं प्रभावी होतं की, मी या संपूर्ण शूटिंगच्या प्रक्रियेवरच फिदा झालो. संपूर्ण टीमसह या चित्रपटाची शूटिंग करण्यात मजा आली. एक गंभीर विषय ज्या जबाबदारीने आम्ही सर्वांनी हाताळला याचा अभिमान वाटतोय. 

* चित्रपटासाठी भूमिका निवडताना तुझा दृष्टीकोन काय असतो?
- मला मनापासून ज्या प्रोजेक्टमध्ये काम करावंसं वाटतं त्यातच मी करतो. आत्तापर्यंत मी ‘मसान’,‘मनमर्जियाँ’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मी माझ्या भूमिका खुप विचारपुर्वक निवडतो. चांगली स्क्रिप्ट, चांगले दिग्दर्शक यांकडे मी विशेष लक्ष देतो. 

* अ‍ॅक्शनवर आधारित चित्रपट करण्याचा विचार तू केला नाहीस का?
- ‘पुरी’ हा माझा पहिला अ‍ॅक्शन चित्रपट ‘राझी’नंतर येत आहे. अ‍ॅक्शनवर आधारित असा हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. मी या अ‍ॅक्शनवर आधारित चित्रपटासाठी बरीच ट्रेनिंग घेतली आहे. अ‍ॅक्शनचे जग माझ्यासाठी नवीन आहे. 

* अभिनय क्षेत्रात आल्यानंतर तुझं आयुष्य कसं बदललं?
- मला संधी मिळत गेली आणि अभिनय क्षेत्राकडे वळलो. मी अभिनय क्षेत्रात काम करत असताना स्वत:ला खूपच समाधानी आणि आनंदी मानतो. आपल्याला घरी असताना किती सुरक्षित आणि शांत वाटतं तसं मला अभिनय करताना वाटतं. माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे. मी स्वत:ला ओळखायला शिकलो आहे. 

* चित्रपटाच्या दिग्दर्शकांसोबत तुझं नातं कसं असतं?
- खरंतर चित्रपट हे दिग्दर्शकांनी पाहिलेलं स्वप्न असतं. त्यामुळे आम्ही कलाकार फक्त त्यांच्या स्वप्नाला अस्तित्वात आणण्यासाठी झटत असतो. एक कलाकार म्हणून माझं दिग्दर्शकांसोबत नातं चांगलं असलंच पाहिजे. कारण, तो सेटवर बॉस असतो. दिग्दर्शकाकडून खुप शिकायलाही मिळतं.

* सध्या बॉलिवूडमध्ये तयार करण्यात येणाऱ्या चित्रपटांबद्दल तू काय सांगशील? 
- बॉलिवूडमधील सध्याचे चित्रपट हे एका सकारात्मक बदलातून प्रवास करत आहेत. चित्रपटाची स्क्रिप्ट ही हिरो आहे. मुख्य म्हणजे प्रेक्षक हा बदल स्विकारताना दिसत आहेत. त्यांना जर स्क्रिप्ट आवडली तर ते पुन्हा पुन्हा जाऊन देखील चित्रपटाचा आनंद लुटत आहेत. प्रेक्षक गांभीर्याने एखाद्या चित्रपटांची प्रशंसा करताना दिसत आहेत. 

* बॉलिवूडमध्ये तू कोणत्या कलाकाराला आदर्श मानतोस?
- मी हिंदी सिनेमा बघतच मोठा झालो आहे. त्यामुळे कुणा एकाचे नाव घेणे अत्यंत कठीण आहे. पण, नक्कीच सांगेन की, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, ओम पुरी, अक्षय कुमार, शाहरूख खान, हृतिक रोशन हे सगळेच माझे रोल मॉडेल आहेत. या सर्व कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. 

Web Title: 'Acting My Comfort Zone' - Wiki Kaushal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.