ठळक मुद्देविविध उपक्रम : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले, तो ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भात शासन निर्णय काढला आहे.
साताºयातील राजवाडा चौकातील प्रतापसिंग शाळेमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांना दाखल करण्यात आले. शाळेत दाखल करताना त्यांचे नाव भिवा, असे नोंदविण्यात आले आहे. प्रतापसिंग शाळेच्या दाखल रजिस्टरच्या १९१४ क्रमांकासमोर बालभिवाची स्वाक्षरी आहे. संबंधित प्रशासनाने हा ऐतिहासिक ठेवा आजही जतन करून ठेवला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: शिकले आणि खºया अर्थाने देशाला शैक्षणिक क्रांती व युगांतराची चाहुल लागली. पुढे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेबांचे योगदान बहुमोल ठरले. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावा, इतिहासाला कूस बदलण्याची जाणीव करून देणारा हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिन म्हणून शाळा महाविद्यालयातून साजरा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवसाच्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आदी नैतिक मूल्यांची जोपासना केली. त्यांची शिकवण विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावी यासाठी या दिनाचे औचित्य साधून उपक्रम राबविले जाणार आहे.