- संतोष सोनवणे
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीतून उत्तम संभाषण करता येणं आवश्यक आहे. दैनंदिन कार्यालयीन कामकाजातही आपण इंग्रजी वापरतो. तरीही आयत्या वेळी इंग्रजीत संभाषण किंवा प्रेझेंटेशन करायची वेळ आली तर आपण कचरतो. इंग्रजीमधून आपले विचार नीट मांडता येतील का? चपखल शब्द सुचतील का? अशा शंका मनात डोकावतात. याला कारण म्हणजे आपण ज्या प्रकारे इंग्रजी संभाषण कला शिकतो या पद्धतीत आहे. या संभाषण कौशल्याच्या भीतीवर मात करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन करणे आवश्यक आहे. ही प्रक्रि या थोडी कठीण वाटणे स्वाभाविक आहे, पण चिकाटीने रोज सराव केल्यास इंग्रजी भाषाकौशल्य नक्की सुधारता येते. याच आत्मविश्वासाने महेश खाडे यांनी उपक्रम राबवला आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना खाडे सांगतात की, जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी इंग्रजी विषयाला घाबरतात. वाचनात अडखळतात. ही भीती दूर करण्यासाठी फोनेटिक्स मेथडचा उपयोग करण्याची कल्पना सूचली. याचा वापर डी.एड्.ला असताना केला होता. जिल्हा परिषद शाळेत काम करण्यापूर्वी सीबीएसई शाळेत एक वर्ष कामाचा अनुभव असल्याचा फायदा इथे झाला. या उपक्रमात सगळ्यात मोठा व नावीन्यपूर्ण बदल म्हणजे जुनी पूर्वापार चालत आलेली बाराखडी पद्धत बंद करून इंग्रजी मुळाक्षरांचे फोनिक साउंड शिकवले.
एक महिन्यात १०० टक्के विद्यार्थी अचूक जलद गतीने इंग्रजी वाचू लागले. विद्यार्थ्यांमधली इंग्रजीची भीती कमी झाली. वाचन करता करता इंग्रजी ऐकू लागली, बोलू लागली, लिहू लागली. पर्यायाने इंग्रजी विषयात समृद्ध होण्यास सुरुवात झाली.
भाषा ही अक्षर, शब्द व वाक्यांनी बनली आहे. मात्र, अक्षरांनी बनलेल्या शब्दांना व शब्दांपासून बनलेल्या वाक्यांच्या योग्य त्या समन्वयाने भाषा बनत असते. कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग किंवा अर्थ पाठ करून घेणे पुरेसे नाही. त्याचा योग्य संदर्भासहीत वाक्यात उपयोगही करता आला पाहिजे. त्यामुळे इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यासाठी शब्दकोष जवळ असणे आवश्यक आहे.
मुळातच खाडे यांना इंग्रजी भाषेची आवड असल्याने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून प्रथम श्रवणकौशल्य विकसित केले जाते. त्यानंतर काही दृक-श्राव्य साधनाचा वापर करून संवाद कसा साधावा त्याचे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेस मुलांना विषय किंवा टॉपिक दिले जातात. ज्याद्वारे मुले संभाषण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर मुलांना डेमो संभाषण दाखवून त्यांना स्वत: संभाषणाकरिता तयार केले जाते.
आपल्या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना खाडे यांनी स्पष्ट केले की, भाषा शिकताना चुका होणारच. अशा चुकांमुळे इंग्रजी बोलण्याचे सोडून देऊ नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी एन्जॉय करा. नवीन भाषा शिकताना आपल्याला मिळतात नवे अनुभव, नवे विचार, एक नवी संस्कृती.. या नवीन दृष्टिकोनाचा आनंद घ्या. मग भाषा आत्मसात करणे एक कंटाळवाणा अभ्यास न राहता एक रसरशीत जिवंत अनुभव होईल. चांगले इंग्रजी ऐका.
उच्चारांकडे तसेच आवाजाच्या चढ-उताराकडे विशेष लक्ष द्या. अधिकाधिक लोकांशी इंग्रजीमध्ये बोला. सुरुवातीला कधी योग्य शब्द सापडणार नाहीत तर कधी व्याकरणाच्या चुका होतील. तरीही इंग्रजी बोलत राहा. सतत सराव केल्याने आत्मविश्वास वाढेल व बोलणे अधिक सहज होईल.
आज जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील मुलांना इंग्रजी विषयाची गोडी लागावी व पालकांनाही याची जाणीव व्हावी, की मराठी शाळेतही मुले उत्तम इंग्रजी शिकतात तसेच बोलतातही. याकरिता महेश खाडे यांचा ‘ध्यास’ कौतुकास्पद आहे.

   santosh.sonawane2@gmail.com