माणसांमधील नाती जोडणारी माझी एसटी, मी एसटीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 12:22 AM2019-05-03T00:22:11+5:302019-05-03T00:22:53+5:30

महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्वतंत्र नवी ओळख एसटीला मिळाली. महाराष्ट्रभर प्रगतीचा एसटीरूपी रथ अविरत फिरतो आहे. एसटीनेच गावं आणि शहरं जोडली. माणसांमधील नाती जोडली. प्रवासादरम्यान विविध जातीधर्माच्या, स्तराच्या लोकांना सामावून घेते ती एसटी. किल्लारीच्या भूकंपादरम्यान मदतीसाठी, तर माळीण गावाची कहाणी जगासमोर आणण्यासाठी अशा आप्तकालीन स्थितीत एसटीच मदतीला धावून आलेली आहे. एसटीच्या ब्रीदवाक्य असलेल्या लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र ’ हे शब्द आहेत. महाराष्ट्राच्या सेवेसाठी एसटीचा हा प्रवास अखंड सुरू आहे.

My ST, which relates to the relations between the people, I ST | माणसांमधील नाती जोडणारी माझी एसटी, मी एसटीचा

माणसांमधील नाती जोडणारी माझी एसटी, मी एसटीचा

Next

रत्नपाल जाधव

पाहतापाहता महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५९ वर्षे पूर्ण झाली. १ मे १९६० या दिवशी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांना निकराचा लढा द्यावा लागला होता. १०५ आंदोलकांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. अखेर, सर्व प्रयत्नांना यश आले. गेल्या ५९ वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच बाबतीत जी काही प्रगती झाली आहे, त्यात लालपरी एसटीचा वाटा लाखमोलाचा आहे आणि ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

सुमारे ३,०७,००० चौरस किमी पसरलेल्या महाराष्ट्रात प्रगतीचा हा एसटीरूपी रथ फिरतो आहे, न थकता, न थांबता. एसटीची चाकं ही महाराष्ट्र राज्याची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्यासाठी धावत आहेत. आपला महाराष्ट्र सुंदरसंपन्न आहे. तब्बल ७२० किलोमीटर लांबीचे सागरीसौंदर्य, निसर्गरम्य अशा पर्वतरांगा, परिसर सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या नद्या, बोलीभाषा, संस्कृतीचा वारसा जपणारी गावे, तितकीच संपन्नतेकडे वाटचाल करणारी शहरे, असे चित्र महराष्ट्रात पाहायला मिळते. हे सारं पाहता आलं ते एसटीमुळे. ज्यावेळी वाहतुकीसाठी काही पर्याय नव्हता, त्या काळात एसटीनेच गावं आणि शहरं जोडली. माणसामाणसांतील नाती जोडली. एसटीमुळेच खेड्यातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन पुढील शिक्षण घेणे शक्य झाले. शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे एसटीनेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असत. त्यात खुशालीची पत्रे व निरोपही असायचे. संपूर्ण ग्रामीण यंत्रणाच एसटीवर अवलंबून होती. एखादी बाळंतपणासाठी असलेली भगिनी असो वा सर्पदंश झालेला रुग्ण, अशा आपत्कालीन स्थितीत एसटी हेच वाहन गावकऱ्यांच्या उपयोगी पडत असे. पोस्टखात्याची टपालसेवा, आरोग्यासाठी असलेल्या औषधांचे वितरण, वृत्तपत्रे, लग्नसराई, सणउत्सव यात प्रवाशांची सुखरूप नेआण हे सर्व काही एसटीवरच अवलंबून असायचे.

काही गाजलेल्या मराठी चित्रपटांत सुरुवातच गावातील एसटीच्या आगमनाने दाखवली आहे. व पुढे ते चित्रपट चालू होतात. एसटीचं गावात आगमन म्हणजे आता आपल्या गावात प्रगती येणार आहे, हेच या चित्रपटात सुरुवातीलाच दिग्दर्शक दाखवून देतो. दिग्दर्शकाच्या कल्पकतेला दाद द्यावी लागेल. लातूरला किल्लारी येथे शरद पवार मुख्यमंत्री असताना जो भूकंप झाला, त्यावेळीही एसटी आपत्कालीन परिस्थितीच्या मदतीसाठी पुढे होती. काही वर्षांपूर्वी भूस्खलनात उद्ध्वस्त झालेले माळीण हे गाव व या दुर्घटनेची बातमी जगाला एसटीच्या चालकामुळेच कळू शकली. या आणि अशा कित्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये एसटी नेहमीच उपयोगी पडत असते. एसटी प्रवास करते म्हणजे नुसतं या गावातून त्या गावात एसटी जाते, एवढा साधा त्या प्रवासाचा अर्थ होत नाही, तर त्या प्रवासादरम्यान अनेक जाती-धर्मांच्या, विविध गावांतल्या मग तो गरीब असो वा श्रीमंत, दुर्बल असो वा सक्षम सगळ्या घटकांना सामावून घेऊन त्यांना गरजेनुसार सवलती देते. एसटीचा हा महाराष्ट्राच्या सेवेसाठीचा प्रवास अविरत सुरू आहे.

राज्याच्या स्थापनेपासूनच्या ५९ वर्षांच्या काळात सर्व बाबतीत महाराष्ट्र बदलला आहे. एसटीनेही आपल्यात काळानुरूप बदल करत आधुनिकतेची कास धरली आहे. अनेक संकटं झेलत एसटी आजही सामाजिक बांधीलकी जोपासत धावते आहे. एका बाजूला खाजगीकरणाची स्पर्धा आहे, अर्थात खाजगीकरणाविरुद्ध स्पर्धा एसटीला अगदी तिच्या स्थापनेच्या दिवसापासूनच करावी लागली आहे. आजही एसटीला खाजगीकरणाचा सामना करावा लागतो आहे. तरीही, आजही ग्रामीण भागात एसटीशिवाय पर्याय नाही. एसटी हेच त्यांच्या हक्काचे, सोयीचे आणि आर्थिकदृष्ट्या परवडू शकेल, असे वाहन आहे. एसटीचं ब्रीदवाक्यच प्रवाशांच्या सेवेसाठी हे आहे. या ब्रीदवाक्याप्रमाणे एसटीने आपली सेवा या महाराष्ट्रासाठी दिलेली आहे. हे एक नागरिक म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
आंदोलने, मोर्चे, दंगलीच्या वेळी लोक एसटीची जाळपोळ करताना किंवा दगडफेक करतानाच्या घटना पाहिल्यावर वाईट वाटतं. ज्या एसटीचा या राज्याच्या सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे, अशा एसटीवर दगडफेक करताना त्या हातांना लाज कशी वाटत नाही, याची खरंच खंत वाटते. गेल्या वर्षी १ मे रोजी भारतीय सैन्यात कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांचे देशाप्रति योगदान पाहता त्यांच्या कुटुंबीयांसाठी एसटीचाही हातभार लागावा, या राष्ट्रीय कर्तव्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शहीद सन्मान योजना राज्यपालांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. यात राज्यातील जवळपास ५१७ वीरपत्नींना एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमधून मोफत प्रवास पास उपलब्ध झाला आहे. वीरपत्नींना प्रवासादरम्यान सन्मानजनक वागणूक देण्याचे आगारपातळीवर महामंडळाने सूचित केलेले आहे.

तसेच एसटीचे ब्रीदवाक्य असलेल्या लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’ हे वैभवशाली वाक्य वाढवले आहे, ही प्रत्येकाचा अभिमान उंचावणारी गोष्ट आहे. पूर्वी एसटीवर विविध कामांची, योजनांची माहिती किंवा अनेक जाहिराती डेपोमध्ये पेंटर येऊन रंगवायचे. पण, आता डिजिटल युग आहे, त्यामुळेच आता जाहिरातीसाठी एसटीच्या दोन्ही बाजूला व पाठीमागच्या साइडला फ्लेक्स लावले जातात व या जाहिराती अंगावर लेऊन एसटीची राज्यभर भटकंती सुरू असते.

माझा कवी मित्र व नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या काव्यमय चारोळीतून म्हणतो, ‘इथे नांदते शक्ती, भक्ती, हाती घेऊनी हात, मानवतेची कास धरूनी, चालू या प्रगतीची वाट...’ भविष्यातही राज्याच्या प्रगतीच्या वाटेत एसटीरूपी चाक सदैव पुढे असेल, यात शंका नाही.
 

Web Title: My ST, which relates to the relations between the people, I ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.