Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र...

By Namdeo Kumbhar | Published: February 14, 2018 01:11 PM2018-02-14T13:11:22+5:302018-02-14T13:36:55+5:30

खट्याळ आयुष्य, एकमेकांची सोबत, न उलगडणारं कोडं, रुसवे-फुगवे आणि नवीन स्वप्नाची पहाट या प्रेमाभोवती गुंफण घालत असते. 

Valentines Day: Love letter to love lovers ... | Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र...

Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र...

प्रिय मित्र/ मैत्रिणींनो

प्रेम. एकाच शब्दात संपूर्ण जग एकवटलेलं. काही जणांच्या आठवणींचा पेटारा उघडण्यासाठी पुरेसा असा. आज प्रेमदिन. अर्थात प्रेम बहरून येण्याचा दिवस. कोणीतरी 'आपलं' भेटावं म्हणून झुरणारं मन. तिच्याकडे पाहून नकळत कितीतरी वेळा धडधडणारं ह्रदय. प्रेमात मंजुरी असावीच असं काही नसतं. ते एकतर्फी असू शकतं. समजून घेऊन एकमेकांच्या भावनांचा आदर करणारा एकोपाही असतो. गुंतागुंत कळण्यापूर्वी जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेणारंही प्रेम असते. पण तुमचं आणि आमचं असं सगळयांचं थोड्याफार फरकाने सेम असतं. खट्याळ आयुष्य, एकमेकांची सोबत, न उलगडणारं कोडं, रुसवे-फुगवे आणि नवीन स्वप्नाची पहाट या प्रेमाभोवती गुंफण घालत असते. 

इश्क पर जोर नही है ये वो आतिश ‘गालिब’
कि लगाए न लगे और बुझाए न बने 

मिर्झा गालिब यांच्या या शायरीमधून प्रेमाची परिभाषा समजते. पण सध्या ज्या बातम्या समोर येताहेत, त्या वाचल्या-पाहिल्या तर आपल्याला ही परिभाषा खरंच समजली आहे का, असा प्रश्न पडतो. प्रेमाला नकार दिला म्हणून तरुणीवर अॅसिड हल्ला किंवा तिची सोशल मीडियावरून केली जाणारी बदनामी, हे सगळं धक्कादायक आहे. बरं, यातल्या अनेक घटना समोरही येत नाहीत. पण त्या तरुणीचं, तिच्या कुटुंबीयांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंच की. कारण, ज्यांना कळायचं त्यांना कळतंच आणि त्यातून जे पसरायचं ते पसरतंच. त्यामुळे हे प्रकार थांबायला हवेत. त्यासाठी शांत डोक्याने विचार करणं आवश्यक आहे. 

प्रेमातून आपल्याला काहीतरी मिळावं आणि ते आपल्याला हवं तेच असावं या अट्टाहासापायी आज अनेक तरुण-तरुणींच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. खरं तर प्रेम ही निखळ भावना. परंतु त्यात अहंकार आला, 'इगो' आला की ती विकृती बनते. आपल्याला कुणी नकार देऊच कसा शकतं, अशी घातक भावना मनात येते. नकार सहन होत नाही. आपला पौरुषत्वाला दिलेलं ते आव्हान वाटतं आणि मग त्यातून सुरू होतो सुडाचा प्रवास. त्या अवस्थेत मती माती खायला जाते. त्यामुळे पुढचा-मागचा विचार न करता आपण घातकी पाऊल टाकतो.

वास्तविक, हे प्रेम नाही. ही आहे वासना. आपल्याला जे हवं ते साध्य करून त्याचा उपभोग घेतल्यावर वासना संपते. परंतु प्रेमाचं तसं नसतं. प्रेमात स्वार्थ नसतो. आपल्याबरोबर नसली तरी आपल्याला आवडणारी व्यक्ती खूष आहे हे पाहून आपल्याला देखील समाधान देणारी भावना म्हणजे प्रेम. मनांचं मीलन म्हणजे प्रेम. समोरून आपलं प्रपोजल नाकारलं गेलं त्याचा अर्थ तुमच्यात काही कमीपणा आहे असाच होत नाही. तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका. मनातील न्यूनगंड आधी झटका. हताश न होता चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा. ब्रेकअपचं दु:ख होणारच, पण त्याचा कुणालाही सुगावा लागू देऊ नका. 

दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा. त्यात आत्मपरीक्षण करा. अशा परिस्थितीत मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत खूप महत्त्वाची असते. तुम्ही नोकरी करत असाल तर काही दिवसांची सुटी घेऊन बाहेरगावी फिरायला जा. अशावेळी छंद तुम्हाला खूप छान साथ देतील. 

शेवटी एकच सांगेन... निखळ, निःस्वार्थ अन् निर्व्याज प्रेम करा...

                                                                                                                                            - नामदेव कुंभार 

Web Title: Valentines Day: Love letter to love lovers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.