' मोदी' को हराना मुश्किल ही नही, नामुमकिन भी है, हा मतितार्थ आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांचा. एकेकाळी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींशी थेट पंगा घेणाऱ्या आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या मोदी लाटेला बिहारमध्ये महाआघाडीची भक्कम भिंत बांधून थोपवणाऱ्या नितीश कुमार यांचे आजचे बोलणे बरेच काही संकेत देऊन गेले. स्वत:च पुढाकार घेऊन बांधलेली महाआघाडीची मोट मोडून पुन्हा एनडीएच्या कळपात दाखल झालेले नितीश कुमार राजकीय हवा जोखण्यात वाकबगार आहेत. पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहण्याच्या नादात २०१४ साली त्यांचे आडाखे चुकले होते. पण तरीही प्राप्त परिस्थितीच्या कलाने निर्णय घेत स्वत:चे अस्तित्व आणि राजकीय उपद्रव मूल्य टिकवून ठेवण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. महाआघाडी मोडतानाही त्यांनी राजकीय गणिते डोक्यात ठेवूनच चाली खेळल्या आहेत.  
केंद्र आणि देशातील अर्ध्याहून अधिक राज्यात सत्तेवर असलेल्या आणि प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत भाजपा आणि मोदींना रोखणे विरोधकांसाठी दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. हाक मारू तो भाजपात आणि पाय ठेवू तिथे सत्ता अशा थाटात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत पावणे दोन वर्षांपूर्वी झालेल्या बिहारमधील पराभवाने मात्र त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवली होती. बिहारमध्ये यशस्वी ठरलेला महाआघाडीचा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर अमलात आला असता तर ती २०१९ ची लोकसभा सहज जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मोदींसाठी डोकेदुखी ठरली असती. त्यामुळे महाआघाडीला अपशकून करण्यासाठी भाजपाच्या गोटातून मोर्चेबांधणीला आधीच सुरुवात झाली होती. पण संभाव्य महाआघाडीच्या मुख्य नेत्यालाच मोदी आणि शहा आपल्या गोटात पळवतील याची कल्पना कुणालाच नव्हती. 
बिहारमध्ये जे नाट्य घडले ते नियोजित नव्हते असे नितीश आणि भाजपाकडून सांगण्यात येत असले तरी त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे राजकीय भाबडेपणा ठरेल. सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी अशाप्रसंगी नितीश कुमार यांनी केलेले समर्थन, राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार राममाथ कोविंद यांना पाठिंबा यातून नितीश कुमार यांनी एनडीएतील पुनर्प्रवेशासाठी नेपथ्यरचना केली, तर तेजस्वी यादव याणि मिसा भारती यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी तात्कालिक कारण निर्माण केले. 
बाकी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसला या हालचाली माहीत असूनही काही करता आले नसेल तर त्यातून त्यांची राजकीय दुर्बलताच अधोरेखित होते. महाआघाडीत नितीश कुमार सरपंच असले तरी दबदबा लालूंचा होता. आपल्या दोन्ही पुत्रांना मंत्रिमंडळात सामावून लालूंनी तशी व्यवस्था चोख केली होती. आपल्याकडे जास्त आमदार असतानाही आपण नितीश यांना मुख्यमंत्री केल्याचे सांगून लालू त्यांना राजकीय उपकारांच्या ओझ्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे स्वतंत्र कार्यशैलीच्या नितीश यांचे त्यांच्याशी फार काळ जुळणे कठीणच होते. त्यात भाजपाला पर्यायी आघाडी उभारताना आपले नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले जाणार नाही, हेही नितीश कुमार यांना कळून चुकले होते. त्यापेक्षा बिहारच्या विधानसभेत  बाकी नितीश कुमारसारखा शिलेदार आल्याने २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपासाठी बिहारमधील ४० जागांचे गणित सोपे झाले आहे. 
एकीकडे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या मोठ्या राज्यातील सत्ता, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड येथील निर्विवाद वर्चस्व, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर येथील विजयांमधून पूर्वोत्तर भारतात केलेला प्रवेश आणि आगामी निवडणुकीत कर्नाटकमध्ये  सत्तास्थापनेची संधी यामुळे भाजपासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आव्हाने कमीच आहेत. सरकार विरोधी वातावरण निर्मिती करण्यासाठी जनमानसाचे लक्ष वेधता येईल असे मुद्देही विरोधकांच्या हाती नाहीत. त्यात नितीश कुमार यांना आपल्या गोटात खेचून मोदी आणि शहा यांनी कल्पनेतील विरोधी महाआघाडीच्या पायावरच घाव घातला आहे. त्यामुळे आज मोदींना पर्याय नसल्याचे आणि त्यांना आव्हान देणाराही कुणी नसल्याचे नितीश यांनी केलेले विधान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या कलाकडे संकेत देणारे आहे.