- सविता देव हरकरे

लहान मुलांसाठी आईची कुस आणि घरानंतर शाळा हेच सर्वाधिक सुरक्षेचे ठिकाण. शाळा म्हणजे विद्येचे मंदिर. म्हणूनच तिला विद्यालय म्हटले जाते. शिक्षणासोबतच मुलांचा सर्वांगिण विकास घडवून त्यांना देशाचा उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी नैतिकतेचे धडे देणारे संस्कारपीठ म्हणजे शाळा. मुलांना शाळेत सोडून आल्यावर पालकांचे मन निश्चिंत होते. कारण शाळेतील पवित्र वातावरण आणि गुरुजनांच्या सान्निध्यात आपल्या मुलांचे आयुष्य घडतेय असा दृढ विश्वास त्यांना असतो. पण हरियाणाच्या गुरुग्राममधील एका नामांकित शाळेत अवघ्या सहा वर्षांच्या प्रद्युम्नची चाकूने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने मात्र त्यांचा हा समज आणि विश्वासाच्या पार चिंधड्या उडाल्या आहेत. या निष्पाप जीवाने कुणाचे काय बिघडविले होते की त्याला एवढ्या निर्दयीपणे संपविण्यात आले. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला होता आणि त्यास विरोध करण्याची शिक्षा त्याला मिळाली होती. आणि हे अक्षम्य कृत्य करणारा होता त्याच्याच शाळेच्या बसचा वाहक. गेल्या वर्षी याच शाळेत एका सहा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत संशयास्पद स्थितीत आढळला होता.
चिमुकल्या प्रद्युम्नच्या हत्येने सारा देश ढवळून निघाला असतानाच हृदय पिळवटून टाकणा-या आणखी दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दिल्लीतील एका खासगी शाळेत तेथील शिपायानेच पाच वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गखोलीत अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला तर हैदराबादेत पाचवीत शिकणा-या एका मुलीला गणवेशात न आल्याने मुलांच्या शौंचालयात उभे राहण्याची क्रुर शिक्षा देण्यात आल्याने पालकांमध्ये आक्रोश निर्माण झाला.
या घटना काही लहानसहान शाळांमधील नाही तर चांगल्या प्रतिष्ठित शाळांमधील आहेत. जेथे आईवडिलांकडून अवाढव्य शुल्क आकारले जाते. मोठमोठाल्या इमारती बांधल्या जातात. पण आपल्या विद्यार्थ्यांप्रती जबाबदारीकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले जाते.

आईवडील भयग्रस्त
प्रद्युम्नच्या आईवडिलांवर दु:खाचा जो पहाड कोसळला त्याने आज देशातील प्रत्येक मातापित्याच्या मनात भय निर्माण केले आहे. पालक लाचार आहेत. त्यांच्या मनात प्रश्नांचे काहुर माजले आहे. आज प्रद्युम्न आहे,उद्या आणखी कोण्या कोवळ्या बालकाचा बळी गेला तर? आमची मुले शाळेच्या चार भिंतींमध्येही सुरक्षित नाहीत काय? आम्ही मुलांना घरातच कोंडून ठेवायचे काय आणि हाच यावरील उपाय ठरणार आहे काय? मुलांना केवळ ‘गुड टच,बॅड टच’ शिकवून काय होणार? समोर हातात चाकू घेऊन एखादा राक्षस उभा झाल्यास एवढ्या चिमुकल्या जीवाने त्याला ‘नाही’ म्हटल्याने काय होणार? सहासात वर्षांची ही मुलं चाकू आणि बंदुकीचा सामना करणार तरी कशी?
प्रद्युम्नच्या घटनेत तर शाळा व्यवस्थापनेने बेजबाबदारपणाचा कळसच गाठला आहे. शाळेचा बसवाहक चाकू घेऊन मुलांच्या स्वच्छतागृहात पोहोचू शकतो मग तो बसमध्येही चाकू बाळगत नसेल कशावरुन? याचा अर्थ मुले एका चाकूधारी वाहकासह बसमधून प्रवास करीत होते आणि व्यवस्थापनाला याचा थांगपत्ताही नाही,असा होतो.

धक्कादायक आकडेवारी
समाजातील प्रदूषित मानसिकतेचा बळी ठरलेला प्रद्युम्न हा काही एकटा नाही. त्याच्यासारखी अनेक बालके मूकपणाने आपल्यावरील हा अत्याचार सहन करीत आहेत. देशातील बालमन किती भयानक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे याचा अंदाजही कुणाला घेता येणार नाही. आणि केवळ कुपोषण आणि शाळाबाह्य मुलांच्या आकडेवारीवरुन ते ठरविताही येणार नाही. मुलांच्या लैंगिक शोषणाचे वाढते गुन्हे ते किती असुरक्षित वातावरणात जगत आहेत याची भीषणता विषद करतात. वर्ल्ड व्हिजन इंडिया नामक स्वयंसेवी संघटनेने दोनतीन महिन्यांपूर्वी यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली ती अतिशय धक्कादायक तसेच या देशातील बालपण किती धोक्यात आहे,याचे वास्तव उघड करणारी आहे. या सर्वेक्षणानुसार येथील प्रत्येक दुसरा मुलगा लैंगिक शोषणाचा शिकार ठरतो आहे. दुर्दैव हे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषणाच्या घटना घडत असतानाही समाजात याविषयी पाहिजे तेवढी जागरुकता आणि संवेदनशिलता जाणवत नाही. आणि याचे प्रमुख कारण आहे लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याकडे बघण्याचा आपला उदासिन दृष्टीकोन. या संस्थेतर्फे २६ राज्यांमध्ये १२ ते १८ वर्षे वयोगटातील ४५ हजार मुलांना या सर्वेक्षणात सहभागी करुन घेण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार प्रत्येक चौथे कुटुंब आपल्या मुलासोबत घडलेल्या प्रकाराची वाच्यताच करीत नाही. तर प्रत्येक पाचपैकी एका मुलास लैंगिक शोषणाच्या धास्तीने असुरक्षितता वाटते. विशेष म्हणजे विकृत मानसिकतेकडून हा अत्याचार सहन करणारी मुले आणि मुलींची संख्या सारखीच आहे. आणि जवळपास ९८ टक्के घटनांमध्ये आरोपी हा मुलांच्या ओळखीतलाच असतो.

मूळ प्रश्न सुटणार का?
मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले असून तपासी संस्था तपासही करीत आहेत. कालांतराने या प्रकरणांत आरोपींना शिक्षा मिळेलही. पण यामुळे मूळ प्रश्न सुटणार आहे का? अशा दररोज किती घटना आमच्या देशात घडतात कुणास ठाऊक आणि पोलीस कारवाईने अशा गुन्ह्यांमध्ये निर्ढावलेल्या आरोपींवर किती वचक बसतो याबद्दलही साशंकता आहे. प्रद्युम्नच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना देशभरातील शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्याची सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली असून या प्रश्नात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील दिशानिर्देशांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला असून त्यावर शासन आणि शाळांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एकीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासन अभ्यासक्रम बदलासह वेगवेगळे प्रयोग करीत आहे. शाळांकडूनही व्यक्तिमत्व विकासाच्या नावावर पालकांना वेळोवेळी वेठीस धरले जाते. प्रामुख्याने बड्या शाळांमध्ये तर गणवेषावर नको तेवढे लक्ष केंद्रीत केले जात असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे बघण्यास मात्र त्यांना वेळ नाही, हेच या घटनांमधून अधोरेखित होते. कुटुंब आणि समाजानेही आता या प्रश्नावर कृतीशिल व्हायला हवे. कारण अशा विकृत मानसिकतेतून आपल्या मुलांचा बचाव करण्याकरिता पोलीस आणि प्रशासनापेक्षाही सामाजिक सतर्कता आणि सक्रियता अधिक महत्वाची आहे.