Media crosses limit while covering Sridevi's death | बाथटबमधली सामुदायिक आत्महत्या

मुकेश माचकर

हिंदी चित्रपटसृष्टीतली ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईपर्यंतच्या काळात भारतीय प्रसारमाध्यमांनी, खासकरून वृत्तवाहिन्यांनी एक नवा तळ गाठला आहे... बाथटबचा तळ!... यावर सगळ्या देशाचं एकमत असेल... सोशल मीडियावर तर कोणीतरी माध्यमांना बाथटब मीडिया अशी निर्भर्त्सनाही केली आहे प्रसारमाध्यमांची. 
श्रीदेवीचा मृत्यू कसा घडला असावा, याची माहिती देताना एका चॅनेलच्या उत्साही वार्ताहराने स्टुडिओत बाथटब आणला, हे या गौरवाचं कारण. खरंतर तो वार्ताहर कौतुकालाच पात्र आहे. भारतातली ७३ टक्के संपत्ती एक टक्का धनवानांच्या हातात एकवटलेली आहे आणि ९९ टक्के भारतीयांना अंघोळीसाठी न्हाणीघरही उपलब्ध नसणार तिथे बाथटब कुठून माहिती असणार, असा त्याचा होरा असल्यास तो चुकीचा नाही. गंमत म्हणजे अंघोळ आणि शौचाची धड व्यवस्था नसलेल्या या वर्गाकडे याच धनवानांच्या कृपेने टीव्हीही आहेत, मोबाइलही आहेत आणि संपता संपणार नाही इतका डेटाही आहे. त्यामुळे, अंघोळीची व्यवस्था नसो-नसो, श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी त्याच्या मनावर सतत आदळत राहील, याची पूर्ण व्यवस्था आहे. आाता तिच्या मृत्यूचं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर सुस्पष्ट होण्यासाठी ‘ये बाथटब क्या होता है?’ या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं पाहिजे, नाहीतर त्याला झोप कशी लागणार? या सर्वसामान्य माणसाची झोप निरव मोदीच्या घोटाळ्याने उडत नाही, न्या. लोया यांचा मृत्यू कसा झाला असेल, हेही त्याला अस्वस्थ करत नाही. पलक्कडमधल्या मधू नावाच्या मतिमंद तरुणाला संशयावरून जीवघेणी मारहाण करताना हसत हसत सेल्फी काढणाऱ्या जमावाचा तर तो स्वत:च एक भागही असू शकतो, त्यामुळे मधूची नृशंस रानटी हत्याही त्याला हादरवून टाकत नाही. फारतर, एक जबरी सेल्फी काढण्याची संधी हुकली, याची हळहळ वाटेल त्याला. तर मुद्दा असा की श्रीदेवीसारखी ग्लॅमरस अभिनेत्री बाथटबमध्ये बुडून मरण पावली, ही माहिती मिळते, पण बाथटब म्हणजे काय हे माहिती नसतं, तेव्हा ती जीवघेणी उलाघाल घडवून आणणारी पंचाईत ठरते. या वार्ताहराने ती सोडवण्याचं प्रसंगावधान दाखवलं, हे खरंतर कौतुकास्पद आहे.
आता बाथटब हा असा असतो, असं नुसतं दाखवून काही उपयोग नसतो. तसा तर बाथटब सर्वसामान्य जनतेने अनेक सिनेमांमध्येही पाहिला आहे, लक्सच्या जाहिरातींमध्येही पाहिला असेल, श्रीदेवीच्या सिनेमांमध्येही टबबाथगीत असणारच. बाथटब सिनेमात पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं यांच्यात किती फरक असतो, ते सर्वसामान्य माणसाला विचारा. या सर्वसामान्य माणसाला जेव्हा भविष्यात कधीतरी बाथटबयुक्त हॉटेलात निवास करण्याची संधी मिळते, तेव्हा तो चक्रावून जातो. जरा वरच्या दर्जाचे सर्वसामान्य लोक घोळका पद्धतीने जगभ्रमंतीला निघतात, तेव्हा त्यांना ही संधी मिळते. तिथे बहुतेकांची परिस्थिती चणे आहेत, तर दात नाहीत, अशी होते. कारण, बाथटब तर असतो, पण त्यात अंघोळ कशी करतात, याची काही माहिती नसते. त्यात आपण जन्मसिद्ध जगद्गुरू वगैरे असल्यामुळे किरकोळ नश्वर, भौतिक गोष्टींमध्ये मार्गदर्शन घेण्याचा आपला स्वभाव नाही. परदेशी पर्यटक माहिती नसेल तिथे थेट प्रश्न विचारून मोकळे होतात. आपण, हॉटेलच्या रूममधल्या अनेक सोयीसुविधा केवळ विचारायचा संकोच म्हणून वापरतच नाही. बाथटब ही त्यातलीच एक. त्यामुळे ‘शोले’मधल्या त्या सुप्रसिद्ध ‘ये अंग्रेज लोग सुसाइड क्यूँ करते है’वाल्या प्रसंगाप्रमाणे पुढचा प्रश्न उद्भवतो की इस बाथ टब में नहाते कैसे हैं?
म्हणूनच बाथटबमध्ये पहुडतात कसं आणि पाणी कसं सोडतात, गरम-गार पाण्याचं संतुलन कसं राखतात, साबण कसा लावतात, अंगघाण पाण्यात किती काळ डुंबायचं असतं, त्या पाण्याचा निचरा कसा करायचा असतो, या सगळ्याची माहिती देणं हे खरं सांगायचं तर राष्ट्रीय कर्तव्यच आहे. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर आता ज्याला कुणाला घर बांधायचं असेल, तो बाथटबशिवाय घर बांधेल का? हॉटेलात राहायचं असेल, तर बाथटब असलेल्या रूमला किती मोठ्या प्रमाणावर प्राधान्य मिळेल. आता खरंतर देशात प्रधानमंत्री बाथटब योजनाच आखली गेली पाहिजे युद्धपातळीवर. हर घर शौचालय असो वा नसो, हर घर बाथटब असलाच पाहिजे, त्याला सरकारी अनुदान मिळालंच पाहिजे. हवाई चप्पल घालणारे हवाई प्रवासाचं स्वप्न पाहू शकतात, तर प्यायला स्वच्छ पाणीही न मिळणारे बाथटबमध्ये अंघोळ करण्याचं स्वप्न का पाहू शकत नाहीत? ती आकांक्षा सरकारने नाही पूर्ण करायची तर कोणी करायची? अब की बार, बाथटब सरकार, ही निवडणूक जिंकणारी घोषणा का असू शकत नाही? बाथटब हे एखाद्या पक्षाचं चिन्ह का असू शकत नाही? मित्रों, मैं बचपन से बाथ टब में नहाना चाहता था, असं सांगणारा नेता पंतप्रधान का बनू शकत नाही?
तर मूळ मुद्दा असा की श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बाथ टबबद्दल लोकांच्या मनात कुतूहल असणारच आणि ते शमवणं हे वृत्तवाहिन्यांचं कामच आहे. तैमूरला दिवसाला किती डायपर लागतात, आराध्याचे डोळे पपांसारखे आहेत की मम्मासारखे, अमक्या सिरीयलमध्ये तमक्याची बायको ढमक्याबरोबर लागू आहे, हे तमक्याला कळल्यानंतर तो ढमक्याच्या बायकोला काय सांगणार आहे, कोणा मुख्यमंत्र्याच्या हेअरकटचं रहस्य काय, अमक्या नेत्याच्या कुत्र्याला नाश्त्यात काय लागतं, काळ्या मश्रूमचे गुणधर्म, ओमच्या उच्चाराने मूळव्याध आणि अतिसार या दोन्ही रोगांवर एकसमयावच्छेदेकरून उपचार कसा होतो, गायीच्या शेणाचं पोषणमूल्य काय आहे, अशा अनेक जीवनावश्यक प्रश्नांवरच्या कुतूहलांचं शमन करणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी आता बाथटबचा वापर कसा करायचा हे समजावून सांगितलंच पाहिजे. त्याशिवाय ‘ये बाथटब में लोग डूबते कैसें है?’ या पुढच्या प्रश्नावर उत्तर कसं मिळणार?
यासंदर्भात, श्रीदेवीचे विशेष आभार मानायला हवेत. तिचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं, असं आधी प्रसृत झालं होतं. त्यामुळे देशातल्या सगळ्या जनतेला हृदयविकाराची केवढी मौलिक माहिती मिळाली. कितीही फिट लाइफस्टाइल असली, तरी हृदयविकार होऊ शकतो. किंबहुना खूप डाएट, खूप फिगर कॉन्शसनेस, वयोमानापेक्षा तरुण दिसण्याची लालसा यातून हृदयावर ताण येऊन त्यातून ते बंद पडू शकतं, हे एरवी सर्वसामान्य माणसांना कसं कळलं असतं. शिवाय खूप कॉस्मेटिक सर्जऱ्या करून घेणं घातक असतं, हे कळल्यामुळे कितीतरी मजूर आणि भिकाऱ्यांनी रंग गोरा करून घेण्याच्या, दात सरळ करून घेण्याच्या किंवा गेलाबाजार नव्या स्टाइलचा हेअरकट करून घेण्याच्या ‘शस्त्रक्रिया’ लांबणीवर टाकल्या. त्यांचा जीव वाचला. नंतर श्रीदेवीच्या मृत्यूचं वेगळंच कारण समोर आलं तरी आधीच्या कारणामुळे झालेल्या ज्ञानप्राप्तीचं मोल काही कमी होत नाही; म्हणूनच या वाहिन्यांनी आधी अर्धवट माहितीवर चुकीची बातमी दिली होती, याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली नाही. बाथटबमध्ये बुडाल्यानंतर श्रीदेवीला हार्टअॅटॅक आला नसेलच, असं सांगता येईल का?
मूळ मुद्दा होता श्रीदेवी बुडली कशी, याचा. श्रीदेवीसारखी इतकी ख्यातनाम व्यक्ती बाथटबमध्ये बुडून मेल्यानंतर देशात बाथटबांबद्दल उत्सुकता वाढणार, बाथटबांचा शोध मुळात वेदांमध्येच लागलेला आहे, असं सत्यपाल सांगणार, देशात बाथटबांची संख्या वाढणार, ते वेगवेगळ्या क्वालिटीचे मिळणार, त्यात चायनाचा मालही येणार, तो असाही घातक असणार (बहिष्कार घाला, बहिष्कार घाला, चायनीज मालावर बहिष्कार घाला, स्वदेशी बाथटब वापरा- पतंजलीचा शुद्ध देशी बनावटीचा बाथटब लवकरच बाजारात येतो आहे हो!) त्यात लोकांना बाथटब वापरण्याची माहिती नाही नीट. मग श्रीदेवीप्रमाणेच बाथटबमध्ये बुडून मरणाऱ्यांची संख्या किती वाढेल? तेव्हा बाथटबमध्ये अंघोळ करताना घेण्याची काळजी, या विषयावर प्रात्यक्षिकासह प्रबोधन करणं हे प्रसारमाध्यमांचं काम नाही का? शहाणे करून सोडावे सकळजन, हे त्यांचं ब्रीद नाही का?
एका चॅनेलच्या एका वार्ताहराने निव्वळ लोकशिक्षणाच्या आंचेतून बाथ टबची माहिती देऊन, जिवावर उदार होऊन प्रात्यक्षिक देऊन देशातल्या कितीजणांचे संभाव्य मृत्यू टाळले आहेत, याचा खरंतर विचार करायला हवा. आपल्या कामावरची त्याची निष्ठा पाहता, भविष्यात असाच प्रसंग ओढवला, तर वार्ताहराला बाथटबमध्ये पहुडायला लावून त्यात पाणी भरून त्याला मरण्याचंही प्रात्यक्षिक करायला लावलं जाईल, अशी दाट शक्यता आहे. त्याने वाहिनीचा किमान एका माणसाचं तरी थकलेल्या पगाराचं देणं वाचेल आणि महिनो न् महिने पगार मिळत नसताना जिवंत राहून मरणयातना भोगण्यातून त्या बिचाऱ्याचीही सुटका होईल. 
मीडियाला बाथटब मीडिया म्हणून हिणवण्याआधी माय लॉर्ड, आधी या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. शिवाय अर्णब गोस्वामीच्या तथाकथित बातम्या, दुसऱ्याच्या नवऱ्याची बायको छाप मालिका, पुरुषांनी साड्या नेसून केलेले पाचकळ विनोद, प्रत्येक शेंबडा बाथरूम सिंगर हा भविष्यातला मोहम्मद रफी, किशोर कुमार नाहीतर लता मंगेशकरच असल्याच्या थाटात डोळ्यांत पाणी आणून केली जाणारी कवतुकं हा मनोरंजन निर्देशांक असलेल्यांना जशी सरकारं मिळतात, तसाच मीडियाही मिळणार. एखाद्या वाहिनीने श्रीदेवीच्या मृत्यूचं संवेदनाशून्य पोस्टमॉर्टेम करत न बसता न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भातली बातमी चालवली असती, तर आपण कोणता चॅनेल पाहिला असता, याचंही प्रामाणिक उत्तर देशातल्या ‘सोयीनुसार सर्वसामान्यां’नी द्यायला हवं माय लॉर्ड...
...ते उत्तर देण्याची हिंमत असेल, तर त्या दिवशी, त्या बाथटबमध्ये झालेली अकलेची आत्महत्या सामुदायिक होती, हे वेगळं सांगावं लागणार नाही.
 


Web Title: Media crosses limit while covering Sridevi's death
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.