खलिस्तानचा जप(व)लेला निखारा आणि ट्रुडो यांचा दौरा

By अोंकार करंबेळकर | Published: February 23, 2018 10:08 AM2018-02-23T10:08:13+5:302018-02-23T10:09:51+5:30

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो भारतात येणार असे वृत्त प्रसिद्ध झाले तरी भारतात त्याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही.

Justine Trudeau's India visit | खलिस्तानचा जप(व)लेला निखारा आणि ट्रुडो यांचा दौरा

खलिस्तानचा जप(व)लेला निखारा आणि ट्रुडो यांचा दौरा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो भारतात येणार असे वृत्त प्रसिद्ध झाले तरी भारतात त्याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. वास्तविक कॅनडाचे आणि भारताचे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे संबंध. अनिवासी भारतीयांना आवडणारी जागा, सहज रोजगार मिळत असल्याने भारतातून लाखो लोक तिकडे स्थलांतरित झाले. कॅनडा सरकारच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे चार मंत्री. त्यांच्याबद्दल बोलताना जस्टीन विनोदाने म्हणाले होते नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटपेक्षा माझ्या कॅबिनेटमध्ये जास्त शिख मंत्री आहेत. तिकडच्या शिख मतदारांना आवडेल असे हे विधान असले तरी त्यात तथ्य आहेच. संरक्षणमंत्रालयासारखी महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी शिख मंत्र्याकडे विश्वासाने दिली. हे सर्व पाहाता भारत आणि कॅनडा यांच्यात सर्वात चांगले संबंध असायला हवे होते. मात्र हे आजिबात शक्य झालेले नाही. 

भारत आणि कॅनडा यांच्यात ही शांतता प्रस्थापित होण्यात अडसर असेल तर तो खलिस्तानी विचाराचा. ३० ते ३५ वर्षांपुर्वी संपूर्ण भारताला हादरवणार्या या मोहिमेच्या उपटून टाकलेल्या रोपांनी कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पुन्हा मुळं घट्ट केली. विमानात घातपात, पंजाबी मंत्र्यांवर हल्ले करणे असे प्रकार त्यांनी सुरुच ठेवले. त्यामुळे भारतापासून दूर या देशांमध्ये खलिस्तानाचा निखारा धगधगत राहिला. त्यात कॅनडाचा क्रमांक आधी लागतो. भारताने बंदी घातलेल्या संस्था तिकडे व्यवस्थित कार्यरत राहिल्या. शिख मतदारांना चुचकारण्यासाठी त्याकडे कँनडा सरकारही दुर्लक्ष करत राहिले. त्यामुळे या खलिस्तानवाद्यांचे फावले. भारतीय नेत्यांना भेट नाकारणे, गुरुद्वारात येऊ न देणे अशा कारवायांपर्यंत त्यांची मजल गेली. ट्रुडोंच्या मंत्रिमंडळात खलिस्तान समर्थक मंत्री असल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी वारंवार चिंता व्यक्त केली होती. त्याकडेही कॅनडा सरकारने दुर्लक्ष केले.
ट्रुडो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी विविध मुद्द्यांवर एकत्र येऊन चर्चा केली आहे. एका भेटीमध्ये ट्रुडो यांच्या लहान मुलीशीही संवाद साधत तिच्याशी गप्पागोष्टी त्यांनी केल्या होत्या. गेल्याच महिन्यात डावोसमध्ये हे दोन्ही नेते पुन्हा भेटले होते.यामुळे भारत खलिस्तान मुद्द्याला फारसा उचलणार नाही असा समज कॅनडाचा झाला असावा. त्याच समजला घेऊन आलेल्या ट्रुडो यांना इथे भारतात आल्यावर खरी परिस्थिती समजली. ट्रुडोंचे कुटुंब विमानातून उतरल्यापासून केवळ उपचारापलिकडे फारसे महत्त्व देण्यात आले नाही. त्यांचे स्वागत राज्यमंत्र्यांकडून करण्यात आले. नेत्यानाहू, ओबामा यांना मिळालेली ते  खास 'मोदीमिठी' स्वागत ट्रुडोंना मिळाले नाही. क्षी जिनपिंग पासून नेत्यानाहूंपर्यंत सर्वांना अहमदाबाद, साबरमती आश्रमाचा दौरा घडवून आणणारे पंतप्रधान मोदी ट्रुडोंच्या अहमदाबाद दौर्याकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे मथुरेला हत्ती प्रकल्पाला भेट दे, आग्र्याला ताजमहालासमोर फोटो काढ असे पर्यटन ट्रुडो यांचे कुटुंब आणि त्यांचे मंत्री करत राहिले. तर नरेंद्र मोदी कर्नाटक निवडणुकीसाठी प्रचार, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मनोहर पर्रिकरांच्या तब्येतीची विचारपूस अशा कामांमध्ये व्यग्र राहिले. मुंबई दौऱ्यामध्ये कॅनेडियन नागरिक आणि दहशतवादी जसपाल अटवाल यांनी ट्रुडो यांच्या पत्नीबरोबर काढलेला फोटो प्रसिद्ध झाल्यावर भारतीय माध्यमांनी या दौऱ्यावर पुन्हा टीका सुरु केली. त्यात पुन्हा कॅनडाच्या भारतातील राजदुतांनी अटवाल यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केल्याचे लक्षात आल्यावर मात्र कडेलोटच झाला. पंजाबी नेत्यांनी विशेषत: मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करुनही अशा चुका ट्रुडो यांच्या दौऱ्यात होत राहिल्या. त्यामुळे या दौऱ्यात गुंतवणूक, उद्योग, व्यवसाय, संरक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर कितपत मंथन झाले व त्यातून काय निष्पन्न झाले हे कोडेच असेल.
या दौऱ्यामुळे भाजपा आणि काँग्रेस मात्र एका मुद्द्यावर तरी एकत्र आल्याचे दिसून आले. खलिस्तानला खतपाणी मिळत असेल तर ते आजिबात खपवून घेतले जाणार नाही असा कडक संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅ. अमरिंदर सिंग यांच्या वर्तनातून गेला आहे.

अपेक्षाभंग हेच ट्रुडोंच्या कार्यकाळाचे फलित ?
२०१५ पुर्वी दहा वर्षे कॅनडामध्ये कॉन्झव्र्हेटिव्ह पक्षाची सत्ता होती. प्रचंड लोकप्रियता लाभलेले स्टीफन हार्पर हे दशकभर पंतप्रधानपदी होते. त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमादेखील मोठी होती. त्यामुळे कॉन्झव्र्हेटिव्ह पक्षाला आव्हान देणे हे तितकेसे सोपे नव्हते. पण सर्व अडथळ्यांना तोंड देत जस्टीन यांनी आपल्या पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. जस्टीन ट्रुडो यांनी 2013 मध्ये लिबरल पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. जस्टीन हे अत्यंत लहान असून, नेतृत्व करण्यास पक्व नाहीत, असे मत अनेक राजकीय पंडितांचे होते. मात्र कॅनडाला ख:या बदलाची गरज आहे असे सांगत ‘रिअल चेंज’ अशी घोषणाच त्यांनी दिली होती आणि जिंकूनही दाखवलं.
जस्टीन ट्रुडो हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचे पुत्र. त्यामुळे राजकारणाची आणि लिबरल पक्षाच्या धोरणांची माहिती त्यांना लहानपणापासूनच मिळत होती. त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांची आई मार्गारेट आणि वडील पिएरे विभक्त झाले. त्यानंतर कॅनडाच्या मॅकगील विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते फ्रेंच आणि गणित शिकविण्याचे काम करू लागले. वर्ष 2000सूनच त्यांनी पक्षाच्या कामामधे अत्यंत तरुण वयात असतानाच लक्ष देण्यास सुरुवात केली होती. 2008 मधे पॅपिनेऊ मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

बॉक्सिंग आणि रिव्हर राफ्टिंगच्या छंदामुळेही ते अधिकाधिक चर्चेमधे आहेत. इतकेच नाही तर राजकारणामधे असताना 2012 कर्करोगाच्या संशोधनासाठी निधी जमविण्यासाठी त्यांनी कॉन्झव्र्हेटिव्ह पक्षाचे खासदार पॅट्रिक ब्राङोव्हू यांच्याशी बॉक्सिंगचा सामना खेळून जिंकूनही दाखवला. माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचा मुलगा या ओळखीपेक्षा या सामन्यामुळे संपूर्ण कॅनडाभर जस्टीन प्रसिद्ध झाले. कॅनडातील प्रसारमाध्यमांनी आपल्याकडे वळविलेला मोहरा 2015 पर्यंत टिकवून ठेवण्यात त्यांना यश मिळाले. सर्वसामान्य तरुणांच्या मनातील प्रश्नावर बोलणं, कधी एखाद्या कार्यक्रमात स्वत: सहभाग घेणं, सार्वजनिक ठिकाणी भीड न बाळगता प्रश्नांना सडेतोड उत्तरे देणं ही सगळी पद्धत कॅनेडीयन मतदारांना प्रचंड भावली. सर्वात उल्लेखनीय म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत अकृत्रिम अशी होती. त्याचा परिणाम मतदानात दिसून आला. आधीच्या सरकारची ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरणाचे प्रश्न हाताळण्याची पद्धती, स्थलांतरितांना, आश्रय मागणाऱ्यांना वागवण्याची योजना यावर ट्रुडो यांनी सडकून टीका केली होती आणि स्वत:ची उदारमतवादी प्रणाली मांडली होती. त्यांच्या अनेक मुद्दय़ांवर आक्षेपही नोंदविण्यात आले आहेत. कॅनडाने गांजाचे सेवन कायदेशीर ठरवावे अशी त्यांनी केलेली मागणी अत्यंत वादग्रस्त ठरली होती. सत्तेमधे येताच इराक आणि सीरियामधे इसिसविरोधात लढणारी कॅनडाची एफ-35 लढाऊ विमाने मागे बोलावण्याचा निर्णय त्यांनी 24 तासांच्या आत घेतला, तर 26 हजार सीरियन स्थलांतरितांना स्वीकारत असल्याचेही जाहीर केले. यावरही कॅनडामधे अनेकांनी टीका केली होती.

जस्टीन यांचे बाबा प्रिएरे कॅनडाचे लोकप्रिय पंतप्रधान होते. तत्कालीन आंतरराष्ट्रीय नेत्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. प्रिएरे पंतप्रधानपदी असताना 1972 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन कॅनडाच्या अधिकृत राजकीय भेटीसाठी आले होते. कॅनडा सरकारतर्फे देण्यात आलेल्या भोजनावेळेस निक्सन यांनी आय वॉट टू टोस्ट विथ फ्युचर प्राईम मिनिस्टर ऑफ कॅनडा असे म्हणत केवळ काही महिने वयाच्या जस्टीनकडे पाहत पेयाचा चषक उंचावला होता. एकेदिवशी हादेखील पंतप्रधान होईल हे निक्सन यांचे भाकीत खरोखरच वास्तवात आले.

जस्टीन तरुणांच्या चर्चामधे विविध कारणांनी येत असतात. त्यांचे कपडे, हेअरस्टाईल इथपासून त्यांच्या विविध मतांर्पयत माध्यमांसकट सर्वत्र चर्चा होत आहे. दंडावर टॅटू असणारे ते जगातले पहिलेच पंतप्रधान असावेत. बॉक्सिंग करणारा, शाळेत शिकवणारा हा आगळावेगळा पंतप्रधान कॅनडाला लाभला आहे. त्यांच्याबाबत सांगण्याजोगी आणखी एक वेगळेपणाची बाब म्हणजे पहिल्या महायुद्धावर आधारित द ग्रेट वॉर या सिनेमातही त्यांनी काम केले आहे. 
इतकी सगळी जबरदस्त पार्श्वभूमी असणार्या जस्टीन यांनी सत्तेत आल्यावर मात्र फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. दीर्घकाळाचा विचार करता त्यांना भारताशी संबंध चांगले ठेवणे भाग आहो पण तसे न करता एकापाठोपाठ एक चुकांमुळे या संबंधांत सकारात्मक बदल तात्काळ होतील असे सध्या तरी दिसत नाही.

Web Title: Justine Trudeau's India visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.