ठळक मुद्देमोदींना सार्वत्रिक निवडणुकीच्या मतपेटीतून नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पदच्युत करण्याची घाई अनेकांना झाली आहेमोदींना पर्याय म्हणून कोणाचा चेहरा येत असावा ?... लालू प्रसाद यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, ओवेसी, केजरीवाल, शरद पवार की स्टॅलिन?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवा, असा सूर सोशल मीडियावर सध्या वारंवार आळवला जातोय. खरं तर या विषयावरून भक्त आणि निंदकांमध्ये चांगलीच जुंपलीय. या सगळ्या गदारोळात मूळ गाभा हरवतोय. एखादा महत्वाचा बदल करण्यापूर्वी तुमच्याकडे ती जागा घेऊ शकणारा पर्याय आहे का? हे रॉबर्ट रुर्कच्या `समथिंग ऑफ व्हॅल्यू` या कादंबरीतलं वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे. इतक्या वर्षांपूर्वी वाचलेल्या या वाक्याची आठवण होणं सध्या स्वाभाविक आहे, म्हणा. आजची भारतातील राजकीय स्थिती आणि त्यावर सुरू असलेली जाहीर मतप्रदर्शनाची जत्रा पाहिली की या वाक्याची प्रकर्षाने आठवण येणं अटळच होतं. 

भारतातल्या मतदारांनी दिलेल्या सुस्पष्ट कौलाच्या आधारे नरेंद्र मोदी बहुमताने केंद्रात सत्तेवर आले. पण आता मोदींना सार्वत्रिक निवडणुकीच्या मतपेटीतून नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पदच्युत करण्याची घाई अनेकांना झाली आहे. सोशल मीडिया किंवा इतरत्र टीका करून त्यांना हटवण्यासाठी हिरीरीनं लिहिणा-या सुशिक्षितांच्या डोळ्यांसमोर मोदींना पर्याय म्हणून कोणाचा चेहरा येत असावा ?... लालू प्रसाद यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, ओवेसी, केजरीवाल, शरद पवार की स्टॅलिन?

भारतामध्ये लोकशाही आहे. सत्तेमध्ये असणाऱ्या एखाद्या पक्षाला बाजूला करायचे झाले तर निवडणुकीच्या माध्यमातूनच त्याला दूर करता येते. परंतु आज नरेंद्र मोदी यांनी काहीही केलं तरी त्यांच्यावर लगेच टीका केली जाते. सोशल मीडियावर काहीही लिहून मोकळे होतात किंवा त्यांच्याविरोधात व्हॉटस्अॅपवर फॉरवर्ड करुन टाकतात. लगेचच त्यांना हटवलं पाहिजे वगैरे घोषणा करुन टाकतात. पण असं लिहिताना त्यांना हटवल्यावर पर्याय कोण याचा त्यांनी विचार केला आहे का ? कोणालाही विरोध करताना तो इश्यू बेस्ड असावा. पूजा किंवा निंदा ही दोन्ही टोकं व्यक्तीभोवती फेर धरून नाचत राहतात. व्यक्ती आवडत नाही, पण त्याच व्यक्तीची धोरणं पटतात, असं होऊ शकतं. त्याच पद्धतीनं आवडणा-या माणसाच्या निर्णयांवर टीका करण्याची वेळही येऊ शकते. पण दोन्ही बाबतीत  व्यक्ती नव्हे, तर समस्या, मुद्दा वा धोरण केंद्रस्थानी असणं प्रगल्भतेचं लक्शण आहे.

भारतातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता काँग्रेस आणि भाजपा हे दोनच राष्ट्रीय पातळीवरचे मुख्य प्रवाहातले पक्ष. नाही म्हणायला प्रादेशिक पर्याय आहेत पण त्यांची व्याप्ती फारच मर्यादित आहे. कॉंग्रेस आणि तिच्या आघाडीला फारसा अर्थ नाही. कॉंग्रेसकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवार आहे तरी कोण ? पाच नावं काढताना नाकी नऊ येतात.  नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ काम केलं होतं. त्याचा अनुभव त्यांच्याकडे होता पण राहुल गांधींकडे तसा कोणताच अनुभव नाही. डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून प्रभावित करायचे पण पंतप्रधान म्हणून आता त्यांचा विचार होऊ शकत नाही. मग पुन्हा केवळ गांधी परिवार हा एकमेव निकष लावला तर उरतात प्रियांका गांधी. तर प्रियांकांचं आज तरी काहीही योगदान नाही. राहुल वा प्रियंका यांना काँग्रेसची सत्ता असताना घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनविण्याएेवजी त्यांना मंत्रीपद देऊन प्रशासनाचा थेट अनुभव द्यायला हवा होता. 

तसाच विचार केला, तर मोदी काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. भाजपा काही कायम सत्तेत असू शकत नाही. उलट सक्षम विरोधी पक्ष असणं नेहमी चांगलं. उगाच कंटाळा आला, बदला सत्ताधारी हे काय साडी बदलण्याइतकं सोपं आहे का...? चला आता बास झालं...बदला या पंतप्रधानांना, असं म्हणणारे पर्यायाचा विचार न करता बोलून मोकळे होतात. जर तुम्हाला सध्या चाललेलं बरोबर वाटत नाही तर आधी पर्यायाबद्दलही विचार करा. एकेकाळी मी कॉलेजमध्ये असताना इंदिरा गांधीचा चाहता, सहानुभूतीदारही होतो. पण घराणेशाहीचा नाही. घराणेशाही असेल तर ती तितका सक्षम पर्याय वाटेल अशी हवी. जर ती घराणेशाही सक्षम नसेल त्याला काहीच अर्थ नाही.