गरुडझेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:03 PM2018-03-03T16:03:45+5:302018-03-03T16:03:54+5:30

फ्लार्इंग आॅफिसर असलेल्या अवनीने ‘मिग-२१ बायसन’ हे लढाऊ विमान एकटीने उडवून इतिहास घडविला.

Sky is the limit | गरुडझेप

गरुडझेप

ठळक मुद्दे ‘मिग-२१ बायसन’ चे उड्डाण म्हणजे कुठल्याही लढाऊ वैमानिकासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

सविता देव हरकरे
नागपूर : 
आपल्यातील अगणित क्षमतांमुळे अनादी काळापासून स्त्रीने मानवजातीचे नेतृत्व केले आहे. कालांतराने आपली शारीरिक क्षमता स्त्रीपेक्षा अधिक असल्याचे पुरुषांनी जाणले आणि तिच्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. ‘चूल आणि मूल’ हेच तिचे कार्यक्षेत्र ठरविण्यात आले. परिणामी तिचे आयुष्य स्वयंपाक घरापुरतेच मर्यादित राहिले. पिढ्यान्पिढ्या ती याच कार्यक्षेत्रात बंदिस्त राहिली. तिच्यातील क्षमतांना मर्यादा आल्या. पण ज्या क्षणी तिने या बेड्या झुगारून मुक्तपणे अवकाशात झेप घेण्याचा निर्धार केला तेव्हा निपचित पडलेल्या तिच्या पंखांना बळ मिळाले. मोठमोठ्या जबाबदाऱ्या ती लीलया पेलू लागली. बघताबघता सर्वच क्षेत्रे तिने पादक्रांत केली. भारतीय वायुसेनेतील २४ वर्षीय लढाऊ वैमानिक अवनी चतुर्वेदी हिने घेतलेली गरुडझेप हे त्याचेच प्रतीक आहे. फ्लार्इंग आॅफिसर असलेल्या अवनीने ‘मिग-२१ बायसन’ हे लढाऊ विमान एकटीने उडवून इतिहास घडविला. विशेष म्हणजे हा महापराक्रम गाजविणारी ती पहिली भारतीय महिला आहे. जून २०१६ मध्ये अवनी, भावना कांत आणि मोहना सिंग या तिघींना हवाई दलाच्या फायटर स्क्वाड्रनमध्ये प्रवेश मिळाला होता. ‘मिग-२१ बायसन’ चे उड्डाण म्हणजे कुठल्याही लढाऊ वैमानिकासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
महिलांनी इतर सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असला तरी सुरक्षा दलांमध्ये मात्र गेली अनेक वर्षे त्यांचा सहभाग नगण्यच राहिला. १९६८ साली वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून पुतिन अरोरा लेफ्टनंट जनरल म्हणून सेवेत दाखल झाल्या. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. दुसरीकडे जगातील अनेक देशांच्या सेना दलात महिलांचा प्रवेश फार पूर्वीच झाला आहे. जर्मनी, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, नॉर्वे, फ्रान्स, स्वीडन, फिनलॅण्ड आणि इस्रायल या देशांनी तर महिलांना प्रत्यक्ष लढण्याची संधीसुद्धा दिली आहे. आपल्या येथे मात्र आजवर वैद्यकीय, कायदा, शिक्षण, सिग्नल्स आणि अभियांत्रिकी शाखांमध्ये महिलांना प्रवेश मिळत होता.
सेनादलातील काम जोखमीचे असते याबद्दल कुणाचे दुमत नाही. यासाठी घ्यावयाचे प्रशिक्षणही अत्यंत कठोर असते. पण ते महिलांना जमणारच नाही असे गृहित धरणेही त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. कारण आजवर भारतीय महिलेने ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले त्या त्या क्षेत्रात आपला झेंडा रोवला. प्रत्येक क्षेत्रात उच्चस्थानी विराजमान होणे हे त्यांच्यातील शक्तीचेच द्योतक नाही काय? परंतु अलीकडच्या काही वर्षांपासून परिस्थितीत बदल होतो आहे. म्हणूनच अवनीसारख्या तरुणी वायुसेनेत कर्तृत्व गाजवू लागल्या आहेत. नौदलात महिलांना कायदा, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर अशा विभागात काम करण्यास मिळत होते. आता त्यांना जहाजावर कामाची संधी देण्याचा विचार सुरू आहे. लष्करी दलातही स्त्री-पुरुष भेदभाव संपविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. लष्कराचा एक प्रमुख भाग असलेल्या ‘मिलिटरी पोलीस’मध्ये महिलांची नियुक्ती करण्याच्या योजनेचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. दरवर्षी ५२ अशारीतीने एकूण ८०० महिलांना या दलात नियुक्त केले जाणार आहे. महिलांना युद्धात कामगिरी बजावण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल मानले जात आहे. विशेष म्हणजे भारताचे संरक्षण मंत्रिपद भूषविण्याचा मान निर्मला सीतारामण यांच्या रूपात एका महिलेने प्राप्त केला आहे. त्यामुळे निकट भविष्यात तीनही दलात महिलांसाठी चांगल्या संधी चालून येतील अशी अपेक्षा आहे. मध्यंतरी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनीसुद्धा अशा आशयाचे संकेत दिले आहेत. महिलांना लढणाऱ्या सैनिकांची भूमिका मिळण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याचे त्यांनी सांगितले होते. ‘महिलांकडे मी जवान म्हणून बघतो’, असे ते म्हणाले होते.
निमलष्करी दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ९ लाख जवान आहेत. त्यापैकी २० हजार महिला सैनिक आणि अधिकारी आहेत. ही संख्या तुलनेत कमी असली तरी भविष्यात वाढणार आहे.
दुसरीकडे झारखंडमधील नक्षलविरोधी मोहिमेत पुरुषांसोबत महिला कमांडोही खांद्याला खांदा लावून लढताना दिसणार आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलात प्रथमच १३५ महिला कमांडोंची तुकडी तैनात करण्यात आली आहे. डेल्टा कंपनीच्या २३२ बटालियनमधील या महिला रांचीच्या खुंटी येथे सराव करीत आहेत. अत्यंत धाडसी असलेल्या या महिला कमांडो जंगलातील नक्षलविरोधी कारवायांचा प्राथमिक अनुभव घेत आहेत. त्यांना अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज करण्यात आले आहे.
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलानेही प्रथमच १०० महिलांना भारत-चीन सीमेवर १५ चौक्यांमध्ये तैनात केले आहे. या महिला युद्ध प्रकार आणि शस्त्रांचा मारा करण्यात तरबेज आहेत. या धाडसी महिलांना ८ हजार ते १८ हजार फूट उंचीवरील चौक्यांवर नेमण्यात आले आहे. भारताने सीमा क्षेत्रात प्रथमच लढाऊ महिलांची नियुक्ती केली आहे. त्या काम करीत असलेल्या चौक्या अत्यंत खडतर आणि दुर्गम भागातील आहेत. याठिकाणी कठीण पर्वतरांगा असून वातावरण प्रतिकूल आहे.
एकूणच सुरक्षा दलांमध्ये यापुढे महिला आपल्या कर्तृत्वाने अवनीसारखे अनेक इतिहास घडवताना दिसतील.

Web Title: Sky is the limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.