‘सेक्स स्लेव्ह’ ते नोबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 03:37 PM2018-10-11T15:37:51+5:302018-10-11T15:38:56+5:30

१९९३ साली जन्मलेली २४ वर्षांची नादिया आज यजिदी मानवाधिकार कार्यकर्ती आहे. तिची नादिया अभियान नावाची संस्था नरसंहार, सामूहिक अत्याचार आणि मानवी तस्करी पीडित महिला व बालकांना सहकार्य करते.

'Sex Slave' to Nobel | ‘सेक्स स्लेव्ह’ ते नोबेल

‘सेक्स स्लेव्ह’ ते नोबेल

googlenewsNext

सविता देव हरकरे
नागपूर:
२०१४ ची ती एक काळरात्र होती. आॅगस्टचा महिना होता. उत्तर इराकच्या सिंझरजवळील एका गावात लोक गाढ झोपी गेले होते. ही रात्र आपल्यासाठी ‘काळ’ बनून येणार याची कल्पना त्यांना तरी कुठे होती. अचानक गावात वादळ आले. हातात काळे झेंडे घेतलेल्या इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाच्या(इसिस)दहशतवाद्यांचे ट्रक या गावात येऊन धडकले. अवघ्या काही क्षणात त्यातून बाहेर पडलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पुरुषांना गोळ्या घालून ठार केले. जी काही लहान मुलं होती त्यांना लढाईचे धडे देण्यासाठी पाठविले तर हजारो महिलांना आपली लैंगिक भूक भागविण्यास दासी बनवून ताब्यात घेतले. या दुर्दैवी महिलांमध्ये एक तरुणी होती जिचे नाव होते नादिया मुराद. हे क्रूरकर्मा दहशतवादी मुरादसह सर्वांना मोसुलला घेऊन गेले. त्यावेळी मोसुल ही इसिसची स्वयंघोषित राजधानी होती. तेथे या नराधम दहशतवाद्यांनी अमानुषतेच्या सर्व सीमा पार करीत या महिलांवर सामूहिक बलात्कार केले. बेदम मारहाण केली. यातना दिल्या. महिला आणि मुलींना विकण्यासाठी दासींचे बाजार भरविले जात होते. याजिदी महिलांना धर्मपरिवर्तन करुन मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात होता. इतर पीडित याजिदी महिलांप्रमाणेच मुरादचा सुद्धा एका अतिरेक्यासोबत बळजबरीने निकाह लावण्यात आला. हे पाशवी अत्याचार असह्य झालेली नादिया सतत पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. या नरकयातनांमधून स्वत: ची सुटका करुन घेण्यास तडफडत होती. या तीन महिन्यांच्या काळात नादियाची अनेकदा खरेदी आणि विक्री करण्यात आली. तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. ‘माझ्यावर किती लोकांनी बलात्कार केला हे मोजणेही कठीण झाले होते’, असे ती सांगते. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात. एक दिवस नादियाचे प्रयत्नही फळास आले. एका मुस्लीम कुटुंबाच्या मदतीने ती पळून गेली. खोट्या ओळखपत्राच्या आधारे तिने कुर्दीस्तान गाठले. तेथील शिबिरांमध्ये यजिदींसोबत राहू लागली. आपले सहा भाऊ आणि आईची हत्या झाल्याची दु:खद वार्ता तिला तेथेच कळली. अखेर याजिदींसाठी काम करणाऱ्या एका संघटनेच्या मदतीने ती बहिणीकडे जर्मनीला पोहोचली.
नादियाच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर एवढ्या जीवघेण्या शारीरिक व मानसिक आघातांचा सामना करु शकली नसती. दहशतवाद्यांच्या तावडीत असताना नादियासोबतच्या अनेक मुलींनी इमारतींवरुन उड्या घेऊन आत्महत्या केली होती. एका क्षणी नादियाने सुद्धा आत्मघाताचा प्रयत्न केला होता. पण नियतीला हे मान्य नसावे. नादिया चूप बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिने माध्यमे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरुन इराकमध्ये महिलांवर झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज बुलंद केला. २०१६ साली अमेरिकन काँग्रेसमधील भाषणात इसिसचा नायनाट करण्याचे आवाहन करताना सिरिया आणि इराकमध्ये दहशतवादाची समस्या किती गंभीर आहे आणि तेथील लोक किती नरकयातना भोगताहेत याची प्रचिती आणून दिली. अत्याचाराची ही कहाणी म्हणजे दहशतवाद्यांविरुद्धचे प्रभावी शस्त्र आहे आणि जोपर्यंत या दहशतवाद्यांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आपण या शस्त्राचा वापर करतच राहणार, असे नादियाने ठासून सांगितले. तिच्या या धाडसाला साऱ्या जगाने तेव्हा कुर्निसात केला होता आणि आता नोबेल पुरस्काराची त्यात भर पडली आहे.
१९९३ साली जन्मलेली २४ वर्षांची नादिया आज यजिदी मानवाधिकार कार्यकर्ती आहे. तिची नादिया अभियान नावाची संस्था नरसंहार, सामूहिक अत्याचार आणि मानवी तस्करी पीडित महिला व बालकांना सहकार्य करते. आपले संपूर्ण जीवन तिने ‘अवर पीपल्स फाईट’ या चळवळीसाठी समर्पित केले आहे.
बलात्कार म्हणजे स्त्रियांच्या मनात दहशत निर्माण करणारं पुरुषी हत्यार. युद्ध आणि संघर्षांमध्ये हे शस्त्र हमखास उगारलं जातं. इतिहासाची पानं चाळली आणि वर्तमानाचा मागोवा घेतला की हे धगधगतं वास्तव समोर येतं. अशा हिंसाचारात सर्वाधिक अत्याचार होतात ते स्त्रीवरच. पोळली जाते ती स्त्रीच. धर्मयुद्ध असोत वा त्यानंतर झालेले महायुद्ध. पहिल्या महायुद्धात ५ लाख माणसं मारली गेलीत. बलात्कारही मोठ्या प्रमाणात झालेत. शत्रूला आपल्या क्रौर्याचा परिचय देण्यासाठी हे शस्त्र वापरणं सोपं होतं. आज युद्धाचा प्रकार बदलला. संहाराची शस्त्रे बदलली. बदलले नाही ते फक्त एकच शस्त्र. ते म्हणजे बलात्कार. पण तेव्हा स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. त्यामुळं विरोध करण्याची ताकदही तिच्यात नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. स्त्री सुद्धा बदलली आहे. अन्यायाविरुद्ध आक्रोश करायला शिकते आहे. आणि नादियासारख्या जांबाज मुली हिंसाचाराविरुद्धच्या या लढ्यात तिचे मनोबल वाढविताहेत.

 

 

Web Title: 'Sex Slave' to Nobel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.