बरगळण्याची ‘कला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 08:56 PM2018-05-07T20:56:27+5:302018-05-07T20:56:48+5:30

देशाच्या इतिहासात वर्तमान काळ हा सर्वाधिक संशोधनाचे पर्व म्हणून नोंदविला जाईल, असे दिसते. कारण कधी नव्हे एवढे शोध या काळात लागताहेत आणि विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या शोधांची ‘निर्मिती’ करणारे दुसरे तिसरे कुणी नसून आमचे राजकीय पुढारी आहेत.

Rubbish 'art' | बरगळण्याची ‘कला’

बरगळण्याची ‘कला’

Next
ठळक मुद्देविषारी वक्तव्ये करण्याची प्रवृत्ती राजकीय नेत्यांमध्ये फारच वाढीस लागली आहेत.

सविता देव हरकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
देशाच्या इतिहासात वर्तमान काळ हा सर्वाधिक संशोधनाचे पर्व म्हणून नोंदविला जाईल, असे दिसते. कारण कधी नव्हे एवढे शोध या काळात लागताहेत आणि विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या शोधांची ‘निर्मिती’ करणारे दुसरे तिसरे कुणी नसून आमचे राजकीय पुढारी आहेत. त्यांचेही कुठे चुकले बरे? देशातील शास्त्रज्ञ नवे कुठलेही संशोधन करीत नसताना मग राजकीय पुढाऱ्यांना ही जबाबदारी स्वीकारावीच लागणार होती ना ! हे आपले अहोभाग्यच समजायचे की आपल्याला असे सर्वगुणसंपन्न राजकीय पुढारी लाभलेत. फक्त फरक इतकाच की त्यांचे हे संशोधन या देशाला आणि येथील जनतेला विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी शेकडो वर्षे मागे घेऊन जात आहे. अर्थात संशोधकांच्या या नव्या पिढीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच बाजी मारली आहे. आता हेच बघा ना! चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चुकीचा असून मानवाची उत्क्रांती माकडापासून झालेली नाही असा (अ)सत्यापलाप केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. डार्विनवादावरील त्यांचे हे भाष्य देशभरातील शास्त्रज्ञांनी फेटाळून लावले. पण तरीही त्यांनी मात्र आपला दावा काही सोडला नाही. कुठल्याही वैज्ञानिक तथ्याशिवाय असे विधान एवढ्या जबाबदारीच्या अन् उच्चपदस्थ व्यक्तीने करणे हास्यास्पद ठरणारेच. डार्विनने १८५९ साली उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता. पण ईश्वराने जीवसृष्टी निर्माण केली यावर विश्वास असलेल्या मंडळींनी त्याला कायम विरोध केला.
मध्यंतरी राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांनी अशीच मुक्ताफळे उधळत आपल्या वैज्ञानिक ज्ञानाची प्रचिती दिली होती. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनचा नाहीच. ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी न्यूटनच्याही हजारो वर्ष आधी तो मांडला होता, असा शोध राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी लावला होता. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने लावल्याचे आजवर आम्ही शिकत आलो. पण ते चुकीचे होते, असेच म्हणावे लागेल. या देशात प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धेचे स्वातंत्र्य आहे, हे खरे. पण देशातील उच्चपदस्थांनी त्याचा वापर करताना अशी बिनबुडाची, निराधार विधाने करणे म्हणजे त्या पदाचा अपमानच नव्हे काय?
उत्तराखंडचे शिक्षण मंत्री अरविंद पांडे यांनी मांडलेला अंकगणिताचा अजबगजब सिद्धांतही आम्ही अनुभवला. पांडे यांनी डेहराडूनच्या एका कॉलेजला अचानक भेट दिली. एका वर्गात शिक्षिका विज्ञान शिकवित होती. मंत्रिमहोदयांनाही मग आपले गणिताचे ज्ञान पाजळण्याची इच्छा झाली. उणे अधिक उणे काय? असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर शिक्षिकेने उणे असे बरोबर उत्तर दिले. पण मंत्रिमहोदयांना ते काही पटले नाही. त्यांच्या मते हे उत्तर ‘अधिक’ होते. सोबतच गणितात ‘अधिक ’ आणि रसायनशास्त्रात ‘उणे’ होत असल्याचा नवा सिद्धांतही त्यांनी मांडला.
या शोधकार्यात बाजी मारली ती आमचे तरुण नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी. इंटरनेटचा शोध महाभारत काळात लागला होता, असा जावईशोध त्यांनी प्रथम लावला. एवढ्यावरच त्यांची ही शोधवृत्ती थांबली नाही. त्यांनी सौंदर्याच्या क्षेत्रातील सखोल ज्ञानाची चुणूकही दाखवून दिली. ऐश्वर्या राय भारत सुंदरी होऊ शकते पण डायना हेडनला सुंदर कसे मानायचे? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी सर्वांनाच अचंबित केले. हे देव मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यापासून दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यासारखेच बरगळत आहेत. सुशिक्षित तरुणाईला त्यांनी सांगितलेला अर्थार्जनाचा मार्ग फारच ‘अनमोल’ आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी सरकारी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविण्यापेक्षा पानटपºया टाकण्याचा सल्ला त्यांनी देऊन टाकला. देवांपासून प्रेरणा घेत आणखीही काही वावदूक नेत्यांनी आपले ज्ञान पाजळण्यास सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राह्मण होते अशी मुक्ताफळे गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी उधळली आहेत. एक पाऊल आणखी पुढे टाकत श्रीराम क्षत्रीय आणि भगवान कृष्ण ओबीसी होते असे सांगून जनमानसात जातीय विष पेरण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. राजकीय नेत्यांपासून प्रेरणा घेत असाच एक शोधप्रबंध आयआयएम अहमदाबादच्या प्राध्यापकाने मांडला. ग्रीक तत्त्ववेत्ते प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांच्या फारपूर्वीपासून भारतातील वेदांमध्ये आर्थिक विचार मांडले गेले होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
एकमेकांवर कुरघोडी करीत असताना लोकांच्या जातीय अथवा धार्मिक भावना दुखावतील अशी विषारी वक्तव्ये करण्याची प्रवृत्ती आपल्या राजकीय नेत्यांमध्ये फारच वाढीस लागली आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या असोसिएशन आॅफ डेमॉक्रेटिकच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे. विद्यमान सरकारच्या काळात अशी चिथावणीखोर भाषणे करणाऱ्यात ९० टक्के नेते भाजपाचे आहेत, असेही या अहवालात नमूद आहे. याचे गांभीर्य ध्यानात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना जीभेला आवर घाला, असे बजावले आहे. यापूर्वीही त्यांनी यासंदर्भात त्यांना सतर्क केले होते. पण हे बोलबच्चन नेते काही त्यांचे ऐकायला तयार नाही. त्यांचे बरगळणे सुरुच आहे.

 

 

Web Title: Rubbish 'art'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.