अवयवदानाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:15 AM2018-03-19T01:15:47+5:302018-03-19T01:15:47+5:30

दान ही संकल्पना परमार्थाचे सर्वोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते.

The organism will get stimulated | अवयवदानाला मिळेल चालना

अवयवदानाला मिळेल चालना

Next

दान ही संकल्पना परमार्थाचे सर्वोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते. परंतु यासंदर्भातील जागरुकतेचा अभाव, अज्ञान आणि विविध गैरसमजांमुळे या महान कार्यात लोकांचा अपेक्षित सहभाग अजूनही नाही. त्यामुळे अवयवदानाची वाढती गरज आणि दात्यांची तुटपुंजी संख्या यामधील वाढत चालेली तफावत ही फार मोठी समस्या आहे. ही तफावत दूर करण्याकरिता लोकांमध्ये जागरुकतेसोबतच रुग्णालयांमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा असणेही तेवढेच गरजेचे आहे. कारण बरेचदा अवयवदात्यांना रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळत नसल्याने अडचण होते. त्याअनुषंगाने नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला (मेयो) मेंदुमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला मंजुरी देण्याबाबत झालेला निर्णय अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारा आहे. या नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायव्हल सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पुढाकारास यश मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मेडिकलमध्ये दोन महिन्यांपूर्वीच हे केंद्र सुरू झाले आहे. याशिवाय नागपुरातील पाच खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणाची व्यवस्था आहे. आता अवयवदाते कसे वाढतील यासाठी प्रयत्नांना वेग द्यावा लागणार आहे. नागपुरात २०० वर हॉस्पिटल्स आहेत आणि येथे दररोज दोन ब्रेनडेड रुग्ण असतात. महिनाभरात किमान १५ अवयवदान व्हायला पाहिजेत. पण गेल्या तीन वर्षांचा आकडा बघितला तर या कालावधीत केवळ २४ ब्रेनडेड लोकांचेच अवयवदान होऊ शकले. देशभरातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने देशात दरवर्षी सुमारेचार चार लाख लोक मृत्युमुखी पडतात. कारण आजही आपल्या येथे अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकांमागे केवळ ०.५ टक्केच आहे. एकट्या महाराष्टÑात हजारो रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. या सर्व लोकांनी अवयवदान केल्यास अवयवांची गरज पूर्ण होऊ शकते आणि अवयवांचा जो काळाधंदा केला जातो त्यालाही आळा बसेल. गरज आहे ती जनजागृती आणि प्रत्यारोपणास आवश्यक तत्पर यंत्रणेची. राज्य शासनाने दीडदोन वर्षांपूर्वी अवयवदान महाभियानास प्रारंभ केला होता. परंतु अवयवदानाची ही लोकचळवळ अधिक व्यापक व्हावी लागणार आहे.

Web Title: The organism will get stimulated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.