लोकमत दिवाळी उत्सव २०१८; ‘नीरज’ गा रहा है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:45 AM2018-11-13T11:45:06+5:302018-11-13T11:45:46+5:30

सात दशकं सामान्य माणसांचं सुखं-दुख ज्यांनी साध्या सरळपण अर्थपूर्ण काव्य-गीतातून व्यक्त केलं, प्रेम शिकवलं, सौंदर्य दाखवलं आणि धर्मापेक्षा श्रेष्ठ असणारा मानवतावाद शिकवला, ते एक श्रेष्ठतम कवी-गीतकार गोपालदास ‘नीरज’

Lokmat Diwali Festival 2018; 'Neeraj' is singing! | लोकमत दिवाळी उत्सव २०१८; ‘नीरज’ गा रहा है!

लोकमत दिवाळी उत्सव २०१८; ‘नीरज’ गा रहा है!

googlenewsNext

 नागपूर:
‘जो झुका है वह उठे अब सर उठाये
जो रूका है वो चले, नभ चुम आये
जो लुटा है वह नये सपने सजाये
जुल्म-शोषण को खुली देकर चुनौती
प्यार अब तलवार को बहला रहा है
अब जमाने को खबर करतो दो
‘नीरज’ गा रहा है’

सात दशकं सामान्य माणसांचं सुखं-दुख ज्यांनी साध्या सरळपण अर्थपूर्ण काव्य-गीतातून व्यक्त केलं, त्यांना प्रेम शिकवलं, सौंदर्य दाखवलं आणि मुख्य म्हणजे धर्मापेक्षा श्रेष्ठ असणारा मानवतावाद शिकवला, ते हिंदीचे विसाव्या शतकातील एक श्रेष्ठतम कवी-गीतकार गोपालदास ‘नीरज’ यांचं नुकतंच जुलै २०१८ मध्ये ९३ वर्षी निधन झालं आणि गाणारा-गुणगुणणारा आवाज कायमचा थांबला. त्यानं अवघं हिंदी काव्यविश्व सुन्न झालं, उदास झालं. कारण, नीरज हे सर्वार्थानं सामान्य माणसांचा आवाज होते, त्याच्या दुख, वेदनेचा स्वर होते आणि त्याला धीर देत जगण्याचं बळ देत होते. जेव्हा ते कवी-संमेलनात आपल्या खास शैलीत गीत प्रस्तुत करायचे, ते श्रोत्यांच्या काळजाला थेट भिडायचं आणि ते नीरजचे नेहमी करता कायल होऊन जायचे. त्यांच्या इतकी लोकप्रियता व रसिकांचं देवदुर्लभ प्रेम व आदर फारच कमी कवींना प्राप्त झालं असेल. त्याचं एकच कारण होतं, विसाव्या शतकातील भारताचे ते प्रभावी भाष्यकार होते. पण भाष्य करणारी त्यांची गीतंही तरल व कलात्मक असायची आणि त्यांचं आवाहन मन-बुद्धीबरोबर सामान्य जनांच्या विवेक व नैतिकतेलाही असायचं. भवतालचं वास्तव प्रकट करताना तेवढ्यावर न थांबत ते सामान्यांना आशावाद देत जगण्यासाठी दिलासा द्यायचे आणि दिशा दिग्दर्शनही करायचे. कसं ते लेखाच्या सुरुवातीला उद्धृत केलेल्या गीतामधील शेवटचा चरण पाहा, तो आजच्या अस्वस्थ धगधगत्या वर्तमानाचं वर्णन करीत त्या पलीकडे जात एक लोभस स्वप्न - एक भाबडा असला तरी हवाहवासा वाटणारा आशावाद देतात.
‘इस तरह फिर मौत की होगी न शादी
इस तरह फिर खून बेचेंगी न चांदी,

हा गाणारा नीरज थांबला, त्यांचा देह अनंतात विलिन झाला, पण त्यांचा आवाज व कविसंमेलनातलं लाईव्ह सादरीकरण आणि व्हिडिओ-आॅडिओच्या रूपानं त्याचं काव्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे त्यांची थक्क करणारी काव्यसंपदा. त्यामुळे ते आज निजधामास केले असले तरी ते गात आहेतच व राहतीलही !
नीरज यांच्या अफाट लोकप्रियतेचं रहस्य म्हणजे ते सामान्यातील सामान्य हिंदी-उर्दू श्रोत्यांच्या मनात आपल्या साध्या-सरळ पण लोकगीतात्मक शैलीच्या शुद्ध हिंदी कवितांद्वारे थेय उतरायचे. त्यात माधुर्य आणि प्रासादिकता आहे, तसेच रोजी-रोटीच्या संघर्षात पिचलेल्या माणसाच्या माणुसपणाचं आदर्श रूप दाखवत त्यांना जगण्याचं बळ देतात. त्यामुळे सामान्यांना ते आपले अंतरंगातले कवी वाटतात. त्यांना आनंद कौसल्यायननी हिंदीचा ‘अश्वघोष’ तर कवी दिनकारांनी हिंदी भाषेची ‘वीणा’ म्हणून गौरवलं आहे. कुणी त्यांना ‘संत कवी’ म्हणतात, कारण त्यांचा गीत-कवितेला तत्वज्ञानाची व अध्यात्माची बैठक आहे. त्यांनी विपुल दोहे लिहून त्याची प्रचिती आणून दिली आहे. प्रामुख्याने त्यांनी छंदोबद्ध काव्य रचना - गीत, गझल व दोहे - केली आहे. त्यांनी काव्यमंच - गोष्टी मध्ये हिंदी कविता श्रोत्यांपर्यंत पोचावी, ती लोकप्रिय व्हावी यासाठी निरंतर प्रयत्न केले. त्यामागे त्यांची एक जनसंवादी भूमिका हाती. ते म्हणायचे ‘यदी हिंदी कविता को किताबों के पन्ने से निकालकर जुबान तक लाना है, तो उस के प्रभावी पाठ के सिवा अन्य कोई विकल्प नाही है ।’ बंगाली भाषेत काव्यगायनाला - मंचीय कवितेला स्वतंत्र कलेचा दर्जा प्राप्त झाला आहे, तेथे विपुल प्रमाणात कविता सादरीकरणाच्या कॅसेट्स निघतात. नीरजनी त्याचं अनुकरण केलं, म्हणून ते किमान पाच पिढ्यांचे प्रिय कवी-गीतकार होते. त्यांचं काव्य ऐकणं म्हणजे श्रोत्यांसाठी एक श्रेष्ठ दर्जाचा कलात्मक आनंद होता. नीरज त्यांच्याशी एक भावनिक - रुमानी नातं गीत पेश करताना प्रस्थापित करायचे. त्यांचे शब्द श्रोत्यांच्या मनात घर करून राहायचे. ते हिंदी कविसंमेलन असो की उर्दू मुशायरा, दोन्हीकडे त्यांना मोठी मागणी असायची आणि इतर कितीही शायर असले तरी श्रोत्यांसाठी त्यांचे सरताज बादशाह नीरज असायचे. त्यांना त्याची जाणीव होती व अभिमानही. म्हणूनच दिल्लीच्या विश्वविख्यात शंकर-शाद मुशायऱ्यात एकदा त्यांनी भाग घेताना त्यांच्या एका गझलेचा हा शेर जेव्हा म्हणला, सारं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं डोक्यावर घेतलं गेलं.
‘गीत गुमसुम है, गझल चुप है, रुबाई है दुखी
ऐसे माहौल में ‘नीरज’ को बुलाया जाये’

आणि मग नीरजमुळे गीताला स्वर फुटायचे, गझल गाऊ लागायची व रुबाई उल्हासित होऊन प्रगट व्हायची आणि दोहे-गीतीका व हायकू, ज्यावर नीरज यांचं खास प्रभुत्व होतं, त्यालाही वाचा मिळायची आणि मैफिल भावश्रीमंत होऊन जात रसिकांना भारावून टाकायची.
आज नीरज आपल्यात नाहीत, पण त्यांचं विपुल असं गीत-विधानाचं रत्नजडीत भांडार आहे. ते फोडून मी आज काही वेचक रत्नरूपी कविता-गीत सादर करून त्यांना आदरांजली वाहणार आहे.
कवी नीरजचं मूळ नाव गोपालदास सक्सेना. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२५ ला उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील (होय, मुलायम सिंगाचा हाच मतदार संघ आहे.) पुरावली गावात बाबू ब्रिज-किशोर सक्सेनांच्या पोटी झाला. नीरज सहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले, तेव्हा जगण्यासाठी त्यांना बालवयातच बराच संघर्ष करावा लागला. गंगानदीमध्ये भक्त जी नाणी फेकायचे, ती ते उडी मारून-डुबकी घेऊन गोळा करायचे, तेव्हा त्यांच्या घरची चूल पेटायची व पोटाची भूक शमायची.
मोठ्या कष्टानं नीरज कसंबसं १९४२ साली मॅट्रिक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे शिकायचं होतं, पण घरची गरिबी व कुटुंबाची जबाबदारी म्हणून त्यांनी टायपिस्ट म्हणून प्रथम इटावा, मग दिल्लीला नोकरी केली. त्यानंतर ते कानपूरला डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये लिपिक म्हणून लागले. मग एका खासगी कंपनीत पुन्हा टायपिस्टची पाच वर्षे नोकरी करावी लागली. परंतु या जगण्याच्या संघर्षात व साचेबद्ध नोकरीत खर्डेघाशी करताना जिद्दीनं व कष्टानं त्यांनी कॉलेज शिक्षण सुरू ठेवलं आणि एम. ए. हिंदी करून प्रथम काही दिवस मेरठला व नंतर कायमस्वरूपी अलिगडला धर्म समाज कॉलेजमध्ये हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. आणि या प्राध्यापकीनं त्यांच्या जीवनात बºयापैकी आर्थिक स्थैर्य आले. त्यामुळे त्यांची मधल्या काळात दबलेली काव्यप्रतिभा पुन्हा बहरू लागली आणि ते काव्यमंचावर आपली छंदोबद्ध कविता-खास करून गीतं सादर करू लागले आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले.
आणि या काळातील दोन गीतांमुळे नीरजना हिंदी पाठकांनी आपल्या मनात कायमचं स्थान दिलं. विशेष म्हणजे ही दोन्ही गीतं हिंदी सिनेमात वापरली गेली व तीही कमालीची लोकप्रिय झाली. ती गीतं म्हणजे-
‘चांदनी में घोला जाये, फूलों का शबाब
उस मे फिर मिलाई जाए थोडीसी शराब
फिर होगा यूं नशा जो तैय्यार
वो प्यार है ’
हे गीत ‘चांदनी में’ ऐवजी ‘शौखियों मे’ असं दिवसाचं शूटींग असल्यामुळे देवानंदनं बदलून ‘प्रेमपुजारी’तं वापरलं. ते आजही त्यातील निसर्गाशी तद्रूप झालेल्या प्रतिमा आणि प्रेमाची मधुरतम नव्या व्याख्येमुळे रसिकांना प्रिय आहे.
एका मुलाखतीत नीरज यांनी खुद्द म्हणलं आहे की, ते सत्तर-पंचाहत्तर वर्षे कविता लिहित आहेत व काव्यमंचावरून सादर करीत आहोत. मधला एक वीस वर्षे फिल्मी गीतलेखनाचा कालखंड १९६४ ते १९८४ असा होता, पण मुंबईला असले तरी त्यांचं गीत-काव्यलेखन अहर्निश चालू होतं.
हा असा एक दुर्मिळ कवी आहे, ज्यानं विपुल काव्य लिहिलं, काव्याचे सर्व प्रकार हाताळले, पण सारे लेखन दर्जेदार-कलात्मक. त्यांची डझनभरापेक्षा जास्त काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. वानगीदाखल ‘संघर्ष’, ‘अंतर्ध्वनी’, ‘विभावरी’, ‘प्रणयगीत’ ‘दर्द दिया है’, ‘बादर बरस गये’, ‘मुक्तकी’, ‘दो गीत’, ‘नीरज की पाती’, ‘गीत भी, अंगीत भी’, ‘असावरी’, ‘नदी किनारे’, ‘लहर पुकारे’, ‘कारवाँ गुजर गया’, ‘फिर दिप जलेगा’, ‘तुम्हारे लिए’ आणि ‘नीरज की गीतीकाये’ ही त्यांच्या प्रमुख काव्यसंग्रहाची नावं आहेत. याखेरीज त्यांच्या निवडक कवितांची अनेक संपादनं पण आली आहेत. हा हिंदीमधला एक सातत्यानं पाच दशकं बेस्ट सेलर कवी राहिला आहे.

Web Title: Lokmat Diwali Festival 2018; 'Neeraj' is singing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.