स्वप्नांचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:03 PM2018-03-17T15:03:58+5:302018-03-17T15:04:06+5:30

कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) पेपरफूटप्रकरणी गेल्या पंधरवड्यापासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हजारो उमेदवार आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तळ ठोकला आहे.

Dream game | स्वप्नांचा खेळ

स्वप्नांचा खेळ

सविता देव हरकरे
नागपूर:
कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) पेपरफूटप्रकरणी गेल्या पंधरवड्यापासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हजारो उमेदवार आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तळ ठोकला आहे. आज मुंबई, दिल्लीच नाहीतर देशभरात ठिकठिकाणी विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांमध्ये असंतोष धगधगत असून त्याचा स्फोट होणे सुरू झाले आहे. स्पर्धा परीक्षा आणि उमेदवार निवडीत मोठ्या प्रमाणात होणारे गैरप्रकार अन् भ्रष्टाचार हे या सर्वांच्या मुळाशी आहे. आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांची अवस्था आणि कहाण्या अत्यंत हृदयद्रावक आहेत. यातील अनेक विद्यार्थी आपले घरदार सोडून, जमीन विकून सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता दिल्लीत आले होते. परंतु पेपरफुटीच्या घटनेने एसएससीवरील त्यांचा विश्वासच उडाला. आंदोलनकर्त्या काही विद्यार्थ्यांनी तर दिल्लीतील आपला खर्च भागविण्याकरिता संपत्ती सुद्धा विकली. यापैकी एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर आपला व्हिडीओ टाकला आहे. बिहारच्या मधेपुरामधून आलेला हा विद्यार्थी पैशाच्या अडचणीमुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगतो आहे. ४० रुपयांची थाळीसुद्धा घेण्याची ऐपत नसल्याने अनेकदा उपाशी राहावे लागते किंवा फुटाण्यावर त्याला आपली भूक भागवावी लागते. निवड प्रक्रियेतील प्रचंड गैरव्यवहारामुळे आपली निवड होईल की नाही अशी शंका त्याला आहे. गेल्या १५ दिवसांपासून तो अक्षरश: रस्त्यावर आहे. हे एक उदाहरण आहे.
एसएससीची परीक्षा यंत्रणा पूर्णत: भ्रष्ट झाली आहे. यात सुधारणा करण्यापूर्वी सखोल चौकशी करून दोषींचा शोध घेणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठीची केंद्रे तर अफलातून ठिकाणी असतात. कधी कुणाच्या घरी तर कधी सायबर कॅफेमध्ये हे केंद्र असते. एकाच परीक्षा केंद्रातून आठ हजार उमेदवारांच्या निवडीचा चमत्कारही घडला आहे. आॅनलाईन परीक्षा सुरू झाल्यापासून कॉप्यांचे हायटेक प्रकार अस्तित्वात आले. एम्मी अ‍ॅडमिन, टीमवर्क आणि अ‍ॅनी डेस्कसारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने बऱ्याच अंतरावर असलेली व्यक्तीही उमेदवाराचा कॉम्प्युटर हाताळू लागली आहे.
केंद्र शासनाने गेल्या महिन्यात झालेल्या एसएससी पेपर फूट प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. यातून काय निष्पन्न होणार ते भविष्यात कळेलच. पण विद्यार्थ्यांचे आंदोलन आता होतेय म्हणजे परीक्षेत गैरप्रकार झाल्याची ही पहिलीच घटना आहे असे नव्हे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील तरुण आपल्या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरतात याचा अर्थ त्यांच्या सहनशलतेची मर्यादा संपली आहे. वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांच्या मनात उसळणाऱ्या आगडोंबाचा हा स्फोट आहे. व्यवस्थेविरोधात पुकारलेला हा आवाज म्हणजे धोक्याचा इशारा आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण नैराश्याच्या खाईत लोटला जातोय. उच्च शिक्षण घेतल्यावरही हाताला काम नाही, वय वाढतेय, त्यासोबतच कुटुंब आणि समाजाचा दबावही वाढतोय, उदरनिर्वाहाची चिंता याने आजचा तरुण त्रस्त आहे. ग्रामीण, शहरी, मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या महत्त्वाच्या असतात. त्यांच्या दृष्टीने हा आर्थिक सुरक्षिततेचा सर्वाधिक विश्वसनीय पर्याय असतो. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एसएससी, बँक, नागरीसेवा आदी परीक्षांच्या तयारीसाठी आपले घरदार सोडून मोठ्या शहरांमध्ये येत असतात. त्यांना एकच आशा असते, परीक्षा उत्तीर्ण करुन सरकारी नोकरी मिळेल आणि आपण शांतिपूर्ण जीवन जगू शकू. सरकारी नोकरी मिळण्याची आशा उराशी बाळगून तो या स्पर्धा परीक्षा देतो. पण त्याच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा गोरखधंदाच व्यवस्थेतील गेंड्याचे कातडे परिधान केलेल्यांनी चालविला आहे.
आमचा देश हा तरुणांचा देश आहे, असे या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोठ्या गर्वाने सांगत असतात. पंतप्रधान आपल्या ‘मन की बात’मध्ये तरुणांच्या आशा प्रफुल्लीत करताना दिसतात, पण विद्यार्थ्यांना नेमकी गरज असते तेव्हा मात्र ते मौन का बाळगतात? तरुण नोकऱ्या मागतात, आपले अधिकार मागतात, परीक्षांमध्ये सुरक्षिततेची मागणी करतात तेव्हा या देशातील राजकीय नेतृत्व मौन का बाळगते? अशी कोणती मजबुरी आहे? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
दिल्लीत एसएससीप्रमाणे महाराष्ट्रात एमपीएससी घोटाळा गाजतो आहे. बोगस भरतीमुळे राज्यभरातील विद्यार्थी संतापले आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात मोर्चे काढले जात आहेत. हा घोटाळा मध्य प्रदेशातील व्यापमपेक्षाही मोठा असल्याचे सांगितले जात असून गेल्या अनेक वर्षांपासून हा गैरप्रकार सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींनी आतापर्यंत २३७ परीक्षार्थी डमी बसविल्याची कबुली दिली असली तर ही संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विभागातील रिक्त पदेही भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांमध्ये आधीच नैराश्य पसरले आहे. त्यात हा घोटाळा उघडकीस आल्याने तर त्यांच्या स्वप्नांवर पूर्णपणे पाणी फेरले गेले आहे.
या सर्वांच्या मुळाशी आहे ती आपली शिक्षण व्यवस्था. शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण हा चिंतेचा विषय झाला आहे. या बाजाराचा मुख्य ग्राहक आहे आपला मध्यमवर्ग. जो आजच्या घडीस सर्वाधिक श्रीमंत होण्याचे स्वप्न बघतो आहे. ज्ञानार्जनासाठी शिक्षण ही संकल्पनाच आता मागे पडली आहे. पालक आपल्या मुलांना मोठ्या शाळांमध्ये प्रवेश देतानाच त्यांच्या पॅकेजचा विचार करीत असतात. दहावीत चांगले गुण, मग बारावीसोबत स्पर्धा परीक्षा, बड्या महाविद्यालयात प्रवेश आणि भरमसाठ पॅकेज, हे आमचे उत्कृष्ट शिक्षणाचे समीकरण झाले आहे. जो तो पैशाच्या मागे धावत असताना दुसरे काय होणार?

 

Web Title: Dream game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.