Your turn now | आता तुझी पाळी...
आता तुझी पाळी...

- वंदना खरे
(लेखिका ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नाटकाच्या दिग्दर्शिका आहेत.)

मासिक पाळी... शब्द उच्चारताच काही जणी बुजतात. कुजबुज सुरू होते. काही ठिकाणी मुलीला पहिल्यांदा पाळी येताच उत्सव सोहळा रंगतो. तिला मखरात बसविले जाते. तर काही ठिकाणी ही बाब लपवून ठेवणेच योग्य, असे आई मुलीला शिकवते. अनेक संवेदनशून्य पुरुषांसाठी हा थट्टेचा, विनोदाचा विषय असतो. प्रत्यक्षात सर्जनाशी नाते सांगणारी ही अवस्था आहे. एक नैसर्गिक क्रिया आहे. यात जसे ओरडून सांगण्यासारखे काही नाही तसे लपवण्यासारखेदेखील काहीच नाही. म्हणूनच पाळी जरी स्त्रीला येत असली तरी भविष्य जन्माला घालणाºया या मासिक ऋतुचक्राकडे तितक्याच पवित्रपणे, वास्तववादी दृष्टीकोनातून पाहण्याची पाळी आता समाजाची आहे.

मुलगा असो वा मुलगी... ती मोठी होऊ लागली की त्यांच्यात अनेक शारीरिक, मानसिक बदल घडू लागतात. वयात येणे ही प्रक्रिया प्रकर्षाने जाणवू लागते. याचाच एक भाग म्हणजे मासिक पाळी. मुलगी वयात आली, मातृत्वासाठी, गर्भधारणेसाठी तयार झाली याची जाणीव करून देणारी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात लाजण्या-बजुण्यासारखे, लपविण्यासारखे किंवा प्रदर्शन मांडण्यासारखेदेखील काहीच नाही. पण तरीही हे नैसर्गिक मासिक चक्र वर्षानुवर्षे प्रथा-परंपरा, समज-गैरसमजांच्या जोखडात अडकले आहे. ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या माझ्या नाटकात एक संपूर्ण प्रवेश याच मासिक पाळीवर आहे. महाराष्टÑात काही ठिकाणी मुलीला पहिल्यांदाच पाळी आली की उत्सव साजरा केला जातो. प्रत्यक्षात मासिक पाळी येणे ही मुलीची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे मुलीला पाळी यायला सुरुवात झाली, हे सर्वांना ओरडून सांगण्याची काय गरज आहे? मला पाळी आली, उत्सव साजरा करा, असे मुलगी कुठे सांगते? उलट ती गोंधळून गेलेली असते. नेमके काय आणि कशासाठी चाललेय, हेच तिला कळत नाही. शिवाय एक दिवस उत्सव साजरा करायचा, त्या दिवशी तिला मखरात बसवायचे आणि पुढचे चार दिवस इतरांपासून वेगळे, बाहेर बसवायचे, याला काय अर्थ आहे?
मासिक पाळी ही एक दैवी शक्ती आहे, असे समजून पूर्वीच्या काळी मासिक पाळीचे रक्त शेतात शिंपडले जायचे. आसाममध्ये तर कामाख्या नावाच्या देवीच्या मासिक पाळीचा उत्सव आयोजित केला जातो. देवीच्या योनीची पूजा केली जाते. लाल रंगाचे कापड प्रसाद म्हणून देण्यात येते. मातृपूजक संस्कृतीचा हा एक भाग आहे. हीच मातृपूजक संस्कृती, भारतातील देवीपूजा पद्धती आणि लैंगिक प्रतिकांचे अत्यंत मूलगामी असे संशोधन ‘लज्जागौरी’ या पुस्तकातही वाचायला मिळते. पाळीबाबत बोलायचे झाल्यास, कुठे मासिक पाळीचा उत्सव होतो तर कुठे मासिक पाळी आली, हे लपवून ठेवले जाते आणि एक प्रकारे मासिक पाळीसंदर्भातील बोलण्यावर अलिखित सामाजिक बंदी घातली जाते. मुलांच्या कोवळ्या मनावर परिणाम होईल, या भीतीने आई मुलांना याबाबत काहीच सांगत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच मासिक पाळी आली की अनेक मुली घाबरतात. आपल्याला काहीतरी रोग झालाय असे त्यांना वाटू लागते. तर काही मुली इंटरनेट व तत्सम अन्य माध्यमातून याबाबत माहिती मिळवतात. वयात येणाºया मुलांनाही मुलींच्या मासिक पाळीबाबत प्रचंड कुतूहल असते. त्यामुळे ती याबाबत मिळेल त्या माध्यमातून माहिती गोळा करू लागतात आणि अनेकदा घडण्याऐवजी बिघडतात. म्हणूनच या गोष्टीचे ज्ञान जेवढे मुलींना वेळेवर द्यायला हवे तेवढेच ते मुलांनाही देणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनी मुलांशी मनमोकळेपणे बोलायला हवे. पण अनेकदा पालक ही जबाबदारी शाळांवर, शिक्षकांवर ढकलतात. तर बहुतांशी शिक्षक अभ्यासक्रमातील हा विषय त्रोटक माहिती देऊन वगळणे योग्य समजतात. त्यासाठी शिक्षकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.
मासिक पाळी, गरोदर स्त्री याबाबत अनेकदा पुरुषांमध्ये थट्टा-मस्करी, विनोद रंगतात. प्रत्यक्षात याविषयी पुरुषांनीही संवेदनशीलपणे वागण्याची गरज आहे. मासिक पाळी आहे म्हणून जन्माला येणे शक्य आहे. या प्रजनन चक्रामुळेच आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून अशी अनेक नाती जन्माला येतात. त्यामुळे आपल्याच आई-बहिणींच्या मासिक निसर्गचक्रावरून थट्टा-मस्करी करणे यात कसले आलेय पुरुषत्व? सर्वच पुरुष अशा संकुचित मनोवृत्तीचे आहेत, असे म्हणता येणार नाही. काही घरात मासिक पाळी आली, ही गोष्ट पहिल्यांदा मुलीने वडिलांना सांगितल्याची उदाहरणेदेखील आहे. ही चांगली गोष्ट आहे. सुदृढ नातेसंबंधाचे फलित आहे. पण असे नातेसंबंध घराघरांत निर्माण होण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.
मध्यंतरीच्या काळात मासिक पाळीसंदर्भात जनजागृतीसाठी सॅनिटरी नॅपकिनच्या एका कंपनीने ‘टच द पिकल’ नावाची प्रभावी जाहिरात केली होती. ‘बॉडी फॉर्म’ या परदेशी ब्रॅण्डनेही याविषयी ‘ब्लड’ नावाने केलेली जाहिरात प्रभावी ठरली. मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही. याच अनुषंगाने मीदेखील ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे नाटक लवकरच पुन्हा रंगमंचावर घेऊन येत आहे. अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ हा आगामी चित्रपटदेखील याच संदर्भातील जनजागृतीवर आधारित आहे. मात्र ही जनजागृती अधिक व्यापक स्वरूपात होण्याची गरज आहे.
त्यासाठी मासिक पाळीकडे लाज, बंधन, अपवित्रता, अंधश्रद्धेच्या चष्म्यातून विटाळलेल्या, बुरसटलेल्या दृष्टीने पाहण्याच्या आपल्या संकुचित, असंवेदनशील वृत्तीत बदल करणे आवश्यक आहे. कारण पाळी हा नैसर्गिक स्वाभाविक मासिक धर्म आहे आणि केवळ हेच एक वास्तव आहे म्हणूनच स्त्री, आईवडील, भाऊ, शिक्षक, पालक पर्यायाने समाज या नात्याने हे वास्तव स्वीकारण्यासाठी स्वत:च्या विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची पाळी आता आपली आहे. किंबहुना एक प्रगल्भ, प्रगत समाज म्हणून ही जबाबदारी प्रत्येकानेच चोखपणे पार पाडली पाहिजे. तरच यापुढे या विषयावर अशा प्रकारची चर्चा करण्याची पाळी आपल्यावर येणार नाही.

(शब्दांकन - मनीषा मिठबावकर)


Web Title: Your turn now
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.