उत्तुंग वास्तू आणि हरवलेली सामाजिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:40 AM2018-04-01T01:40:11+5:302018-04-01T01:40:11+5:30

१९६०चे दशक मोठे वादळी दशक होते. जगभरच. भांडवलशाही आणि साम्यवाद अशा दोन परस्परविरोधी राजकीय-आर्थिक-सामाजिक विचारधारांमध्ये जग विभागलेले होते. संप, हरताळ, निदर्शने, मोर्चे, मुंबई बंद असे निषेधाचे विविध प्रकार नित्यनेमाने मुंबईत घडत होते.

 Vastu and lost societies | उत्तुंग वास्तू आणि हरवलेली सामाजिकता

उत्तुंग वास्तू आणि हरवलेली सामाजिकता

- सुलक्षणा महाजन

१९६०चे दशक मोठे वादळी दशक होते. जगभरच. भांडवलशाही आणि साम्यवाद अशा दोन परस्परविरोधी राजकीय-आर्थिक-सामाजिक विचारधारांमध्ये जग विभागलेले होते. संप, हरताळ, निदर्शने, मोर्चे, मुंबई बंद असे निषेधाचे विविध प्रकार नित्यनेमाने मुंबईत घडत होते. तसे झाले नाही तर चुकल्यासारखे वाटत असे. त्या काळच्या विद्यार्थी चळवळी बरेचदा शैक्षणिक फीवाढीच्या निषेधार्थ होत असत. तेव्हा खासगी किंवा सरकारी संस्थांमधील व्यावसायिक शिक्षणाची संपूर्ण टर्मची फी जास्त म्हणजे १०० ते १५० रुपये असे. त्यामध्ये सरकारने दोन-पाच वर्षांनी पाच-दहा रुपयांची वाढ सुचवली की संप-हरताळ सुरू होत. त्यामुळे आमच्या पाच वर्षांच्या शिक्षणकाळात फी काही वाढली नाही. मुंबईला पहिल्या वर्षात शिकत असताना आमच्याही जे.जे. कॉलेज आॅफ आर्किटेक्चरमध्ये विद्यार्थी संप झाला होता. विशेष म्हणजे विद्यापीठाने अभ्यासक्रमात सुधारणा कराव्यात म्हणून झालेला संप सुमारे तीन महिने चालला. पुढील काळात अभ्यासक्रम बदलला. परंतु तरीही आम्हाला जे विषय होते ते मला आज जास्तच महत्त्वाचे आहेत असे वाटते. वास्तुकला आणि तंत्रांच्या बरोबरीनेच इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन असे अनेक विषय मला तरी खूप महत्त्वाचे वाटले होते. वास्तुकला आणि शास्त्र हे बहुआयामी असते आणि त्याचा समाजाशी जवळून संबंध असतो याची जाणीव तेव्हा शिक्षणातून प्रकर्षाने मिळत असे. परंतु आधुनिक, ठोकळेबाज वास्तुशैलीचे प्रस्थ पुढील काळात वाढले आणि त्यात हे सर्व हरवले.
तो काळ समाजवाद, साम्यवाद आणि क्रांतिकारी चळवळींच्या प्रभावाचा होता. यांत्रिक आणि औद्योगिक संस्कृतीचा होता. परंतु फारसे रोजगार या क्षेत्रात तेव्हा उपलब्ध नव्हते. खासगी क्षेत्रात पगार फार कमी तर शासकीय संस्थांमध्ये दुप्पट पगार असे. अनेक जण सुरुवातीला शासकीय संस्थेमधील नोकरी घेत आणि नंतर स्वत:चा लहान व्यवसाय सुरू करीत. त्यातही मुली शासकीय नोकरीला आणि लग्नाला प्राधान्य देत. तेव्हा या व्यवसायात मुलींची संख्या फारशी नसे. आमच्या वर्गात आठ-दहा तर अभियांत्रिकी कॉलेजमध्ये एकेका वर्गात मुलींची संख्या दोन-तीन इतकीच असे. ऐंशीच्या दशकात वास्तुकला शाखेत शिकणाऱ्या मुलींचे प्रमाण ३०-४० टक्के झाले. आज ते ८० ते ९० टक्के आहे. १९७०च्या दशकात मुंबईमध्ये वास्तुकला शिक्षणाच्या केवळ दोन संस्था होत्या. आता एकट्या मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ४० संस्था आहेत. प्रत्येक ठिकाणी मुलींची बहुसंख्या आहे.
१९९०च्या दशकात खासगी वास्तुकला महाविद्यालयांची संख्या आणि फी झपाट्याने वाढली. शिवाय शिक्षण साहित्याचा खर्च अफाट वाढला. एकेकाळी विद्यार्थी उपनगरातून किंवा त्यापलीकडून लोकलने प्रवास करून मुंबईला येत.
आता हा प्रवास उलट दिशेने होतो. विद्यार्थीवर्गाचे मुंबईत होणारे संप, हरताळ, बंद यांचे प्रमाण तर शून्यावर आले आहे. जे.जे. कला महाविद्यालयाचे आवार मुला-मुलींनी आजही गजबजलेले आहे. परंतु सर्वात जुन्या कलाशिक्षण संकुलाची जुनी शान मात्र हरवली आहे. जुन्या इमारती दगडी बांधणीच्या, वास्तुकलेच्या शिक्षणाला साजेशा आणि देखण्या आहेत. येथील मोठे स्टुडिओ प्रशस्त, भव्य आणि हवेशीर आहेत. नव्या संस्थांमध्ये वास्तुरचना क्वचितच चांगली दिसते. या सर्व काळात वास्तुकला शिक्षणाचा संपूर्ण ढाचा बदलून गेला आहे. तरीही विद्यार्थ्यांच्या कामामध्ये खूप प्रगल्भता आणि कलाजाणीव वाढली आहे ती विविध माध्यमांमुळे. विद्यार्थ्यांमधील निरीक्षण क्षमता, चटपटीतपणा आणि स्पर्धा खूपच वाढली आहे. भारतीय वास्तुकला बघण्यासाठी आमच्या सहली दक्षिण-उत्तर भारतामध्ये जात. त्याच्या जोडीने आता विद्यार्थी इजिप्त, युरोप अशा देशांतही सहलीला जातात. त्यांचे जग विस्तारले आहे. संकल्पनाशक्ती आणि कामाचा दर्जा खूप सुधारला आहे. व्यवसायात झटपट यश मिळवण्याच्या खूप शिड्या मुलांना माहीत झाल्या आहेत. तरीही यात बरेच काही हरवले आहे. मुख्य हरवले आहे ते सामाजिक भान आणि व्यावसायिक नीतिमत्ता.
समाज आणि वास्तुकलेचे नाते जवळचे असे. आता वास्तुकला विकासकांच्या दावणीला बांधली गेली आहे. वास्तुव्यवसायाचे व्यापारीकरण झाले आहे. एकंदरीत समाजात वाढलेली सेल्फीवृत्तीही त्याला जबाबदार असावी. त्यामुळेच मुंबईच्या वास्तुव्यवसायामध्ये सौंदर्य कमी आणि पैशांचा दिखाऊ साज मोठा झाला आहे. चटई क्षेत्राच्या विळख्यात बाकी सर्वच दुय्यम झाले आहे. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला मुंबईमधील आकाशात झेपावणाºया वेड्यावाकड्या उतुंग इमारतींमध्ये आणि जमिनीवरच्या बकालीमध्ये पडलेले दिसते आहे.

Web Title:  Vastu and lost societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई