'Those days' sickness | ‘त्या’ दिवसांची अस्वस्थता

- डॉ. मंदाकिनी शेणवी
(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

पाळी येणे, ती नियमित असणे हे स्त्री म्हणून तिच्या आरोग्याचे खास लक्षण मानले जाते. म्हणजे मुलगी वयात येणे ही एक महत्त्वाची बाब आहेच. अनेक सामाजिक ठिकाणी स्त्रीची पहिली पाळी केव्हा आली, याचाही आढावा घेतला जातो. कारण तिच्या नियमित येणाºया पाळीमुळे तिला विवाहानंतर मूल होईल, याची खातरजमा केली जाते. अर्थात, पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याने ती एक आरोग्यदायी गोष्ट निश्चितच आहे, असे आपण समजतो, परंतु बºयाच वेळा मासिक पाळीच्या अनियमितपणामुळे म्हणा, कधी लवकर येण्याने किंवा कधी खूप उशिरा येण्याने बºयाच वैद्यकीय समस्या निर्माण होतात. अनेकदा आपण वयात आलेल्या मुलींना पाळी यायच्या काही दिवस आधी चिडताना, रागावताना किंवा उगाचच अस्वस्थ झालेल्या पाहतो. हे असे का होते, हे त्या मुलीला तर कळत नाहीच, पण तिच्या आईलाही कळत नाही.
माझ्या ओळखीतील सुहाना (नाव बदललेले) नावाची एक १६ वर्षीय युवती मासिक पाळी यायच्या काही दिवस आधी विक्षिप्त वागत असे. अस्वस्थ होत असे. तिची आई तिला अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यात चिडलेली, संतापलेली पाहून स्वत:च गोंधळून जायची आणि तिची मुलीबरोबर या काळात भांडणे व्हायची. तिच्या आईला कळायचेच नाही की, एरव्ही व्यवस्थित वागणारी ही शहाणी मुलगी पाळी यायच्या काही दिवस आधी अशी का घाबरते? अशी सुन्न का होते, एकटीच घरामध्ये का बसते? तिचा चेहरा घाबराघुबरा का होतो, तिच्या मनात भीतीची उगाचच आवर्तने उठायची. विचारले तर तिला काय सांगायचे सुचत नसे. पाळी तर तिची दर महिन्याला यायची, पण हा असा विचित्र अनुभवसुद्धा तिला यायचा. आतून तिला खूप घाबरल्यासारखे, दडपण आल्यासारखे वाटायचे. जीव उगाचच कासावीस व्हायचा. खाणे-पिणे सुचायचे नाही. कॉलेजला जाणे ती टाळायची. अभ्यास करायची नाही. डोळे सदा भरून आलेले. काही चांगला सल्ला द्यावा, तर ती चिडचिड करायची. आरडाओरडा करायची. बºयाच वेळा तिच्या मनात या काळात आत्महत्या करावी, असे विचारही उगाचच येत असत. असे विचार येतात, म्हणून ती आणखी भयभीत होत असे. हा खरेच एक विचित्र आणि सहन न होणारा अनुभव आहे.
अनेक स्त्रियांना अशा प्रकारच्या अनुभवातून अगदी पाळीची सुरुवात होण्यापासून ते पाळी थांबेपर्यंत जावे लागते. पूर्वी या लक्षणाला नक्की काय म्हणावे, हे कुणाला कळत नसे, पण आता याला प्रिमेन्सस्ट्रयल सिन्ड्रोम किंवा ‘पीएमएस’ असे म्हणतात. साध्या शब्दात हा मासिक पाळीपूर्वी येणारा आजार, असे म्हणावे लागेल. कधी-कधी पाळी यायच्या पूर्वी महिलेला काहीसे नरमगरम वाटते, पण काही विशिष्ट लक्षणे सातत्याने पाळीपूर्वी दिसू लागली, तर हा पाळीपूर्वी येणारा आजार असे ओळखले पाहिजे. पीएमएस हा मासिक पाळीपूर्वीच येतो आणि त्यात विविध प्रकारची शारीरिक व मानसिक लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ही लक्षणे अगदी साधारण असतात, पण ती प्रत्येक पाळीपूर्वी येतात आणि ती येणार आहेत, हे स्त्रियांना कळते. मध्यम किंवा तीव्र स्वरूपात पाळीपूर्वी येणारी ही शारीरिक वा मानसिक लक्षणे स्त्रीच्या दैनंदिन जीवनावरही नकारात्मक प्रभाव टाकतात. त्या दृष्टीतून पीएमएस हा वैद्यकीय आजार आहे, असे म्हणायला हवे.
८० टक्के महिलांमध्ये मासिक पाळी येण्याअगोदर काही सामान्य लक्षणे स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी जाणवू शकतात, पण २० ते ३० टक्के महिलांना पीएमएसचा मध्यम स्वरूपाचा आजार दिसून येऊ शकतो, असा अंदाज आहे, तर साधारणत: ५ ते ८ टक्के स्त्रियांमध्ये पीएमएस खूप गंभीर स्वरूपातही दिसू शकतो. स्त्रियांचे शिक्षण व वैवाहिक स्थिती यांसारख्या घटकांचा पीएमएसशी तसा शास्त्रीय संबंध दिसत नाही. साधारणत: ज्या स्त्रियांमध्ये पीएमएसची लक्षणे आढळतात, त्या स्त्रियांनी त्याचे निदान डॉक्टरकडून करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार, तिच्यातील शारीरिक व मानसिक बदलांना समजून घेऊन, तिच्याशी विधायक वागणे गरजेचे आहे.


(शब्दांकन - स्नेहा मोरे)


Web Title:  'Those days' sickness
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.