Shabri's two hands with malnutrition | कुपोषणाशी ‘शबरी’चे दोन हात

- कल्पेश पोवळे

‘कुपोषण निर्मूलन’ हा विषय केंद्रस्थानी घेऊन सुरुवात झालेल्या शबरी सेवा समितीच्या वाटचालीस दीड दशक पूर्ण होणार आहे. १४ वर्षांपूर्वी प्रमोद करंदीकर यांनी शबरी सेवा समितीच्या माध्यमातून सुरू केलेली वाटचाल म्हणजे स्थायी स्वरूपाचे काम करण्याचा अनुभव व आदिवासी क्षेत्रातील वास्तव बदलण्याची ऊर्मी यांचा अपूर्व संगम. गरिबी, अज्ञान आणि अनास्था अशा खोल गर्तेत बुडालेल्या आदिवासींना त्यांच्या आरोग्याबद्दल जाणीव करून देणे खूप अवघड होते, परंतु त्यावरही मात करीत शबरी सेवा समितीने रायगड, पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यांत बालमृत्यूचा आलेख कमी करण्यात यश मिळविले.
आतापर्यंत शबरी सेवा समितीच्या प्रयत्नातून ६५ हजार बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. आजही ठाणे, पालघर व नंदुरबार जिल्ह्यांत कुपोषण निर्मूलनासाठी समिती प्रयत्न करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून रोज २०० बालकांना पौष्टिक आहार दिला जातो. कुपोषणाची आधीची पायरी म्हणून गर्भवती महिलांची तपासणी, गर्भवतींसाठी पोषक आहार, औषधे, प्रबोधन, नवजात शिशूचे संगोपन, आहार याबाबत जनजागृती अशा अनेक प्रयत्नांनी कुपोषणाशी दोन हात करणे सुरू झाले. तर नंदुरबारमधील कुपोषण निर्मूलनाच्या लढाईत शहादातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अलका कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाºयांचे शबरी सेवा समितीला सहकार्य मिळत आहे.
शबरी सेवा समिती इतरही अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास, पेन्सिल अशा साहित्याचे वाटप केले जाते, तसेच शबरी सेवा समितीतर्फे कशेळे येथे २५ मुलांसाठीचे वसतिगृह चालविले जाते. येथे मुलांच्या शिक्षणाची, भोजनाची व निवासी मोफत सोय केली जाते. मुलांमध्ये अभ्यासाची व शाळेची आवड निर्माण व्हावी, म्हणून संस्थेतर्फे १0 ठिकाणी मोफत बालवाड्या सुरू केल्या आहेत, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजावी, म्हणून शबरी सेवा समितीतर्फे पुस्तकहंडीचा कार्यक्रम राबविला जातो.
संस्थेतर्फे दरवर्षी गरीब आदिवासींसाठी सामूहिक विवाहाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. यात साधारणत: ४० ते ५० जोडपी सहभागी होतात. याशिवाय उद्याच्या मातांना योग्य मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकासासाठी युवती चेतना शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, कविता पाठांतर, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते.

आदिवासींच्या स्वावलंबनासाठी प्रयत्न
आदिवासींचा आर्थिक विकास व्हावा व त्यांनी स्वावलंबी व्हावे, यासाठी भाजीपाला लागवड, आंबा लागवड, बांबू उद्योग, फळशेती, शेतीसंबंधी मार्गदर्शन अशा उपक्रमांतून त्यांना मदत केली जाते, तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे १०० शेतकºयांना मार्गदर्शन केले जाते. वृक्ष लागवडीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला असून, आतापर्यंत ९,५00 कलमांची लागवड करण्यात आली आहे.


Web Title: Shabri's two hands with malnutrition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.