राज ठाकरे... २००६ चे आणि आजचे!

By अमेय गोगटे | Published: March 21, 2018 01:07 PM2018-03-21T13:07:09+5:302018-03-21T13:17:37+5:30

'इंजिना'ची दिशा भरकटली असतानाही नेता स्वतःच्या पक्षाबद्दल काहीच बोलत नाही, आत्मपरीक्षण करत नाही.

Raj Thackeray's speech then and now, what about mns future plans | राज ठाकरे... २००६ चे आणि आजचे!

राज ठाकरे... २००६ चे आणि आजचे!

१९ मार्च २००६. स्थळ शिवाजी पार्क. राज्याच्या राजकारणात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा स्थापना मेळावा. उपस्थिती लाखाच्या घरात. वक्ते राज श्रीकांत ठाकरे. ते आले, बोलले आणि जिंकले. ‘सैराट’ आल्यानंतर सगळ्यांना जसं ‘याड’ लागलं होतं, तसंच काहीसं त्यावेळी झालं होतं. 

‘हा राज ठाकरे आज स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करत आहे...’
‘महाराष्ट्रात मराठी माणसाचा उत्कर्ष होणार म्हणजे होणार...’
‘जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय...’

या प्रत्येक वाक्यावर तरुणाईचं रक्त सळसळत होतं, अंगात जोश संचारत होता. आता महाराष्ट्राला ‘अच्छे दिन’ येणार, असं सुखावह स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यापुढे तरळत होतं. 

(१२ साल बाद...)

१८ मार्च २०१८. स्थळ तेच. पक्ष तोच. उपस्थितीही साधारण तेवढीच. वक्ता तोच, पण भाषा वेगळी. खरं तर, एका तपानंतर पक्षाला नव्या ध्येय-धोरणांची गरज असताना, मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलं असताना, 'इंजिना'ची दिशा भरकटली असतानाही नेता स्वतःच्या पक्षाबद्दल काहीच बोलत नाही, आत्मपरीक्षण करत नाही, पुढे काय करणार आहोत सांगत नाही. उलट, १२ वर्षांपूर्वी ज्यांच्यावर तो टीका करत होता, त्यांच्यासोबत जाण्याची तयारीच तो दाखवतो.  त्यामुळे, एकेकाळी प्रभावी वाटणारा नेता कुणा ‘पॉवरफुल्ल’ व्यक्तीच्या प्रभावाखाली आहे की काय, अशी शंका येते.

मनसेने राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणाची जबरदस्त हवा केली होती. जे बोलायचं ते तिथे बोलेन, असं सांगून राज यांनीही उत्सुकता ताणली होती. पण त्यांच्या भाषणात नवं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर खरोखरच सापडत नाही. कारण, गेल्या वर्षभरापासून ते मोदींविरोधात जे बोलताहेत तोच पाढा त्यांनी पुन्हा वाचला. मोदीमुक्त भारतासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलंय, पण सगळ्या मोठ्या निवडणुका स्वबळावर लढवणाऱ्या राज ठाकरे यांच्या बेधडक व्यक्तिमत्वाला ही भाषा शोभणारी नाही. म्हणूनच, 'बोल वो रहे है, लेकिन शब्द...' असं सगळ्यांनाच वाटतंय.

हे भाषण ऐकल्यानंतर २००६ च्या मनसे मेळाव्यातलं भाषण कानात घुमू लागलं. कसला भारी माहौल होता तेव्हा शिवाजी पार्कवर. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर राज यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट आणि 'अंगार-भंगार'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्या भाषणातही टीका होती, पण त्यापेक्षा दिशा होती, धोरणं होतं, स्वप्नं होती. 

ते भाषण प्रत्येक मनसैनिकाने, जमल्यास राज ठाकरे यांनीही परत ऐकायला हवं. म्हणजे मग, १२ वर्षांत त्यातल्या किती गोष्टी झाल्या, याचा एक लेखाजोखा त्यांना मांडता येईल. जमेपेक्षा जशी खर्चाचीच बाजू लांबलचक होते, तशी प्रत्यक्षात न आलेल्या गोष्टींचीच यादी मोठी होईल. वानगीदाखल काही मुद्दे पाहूया. 

रस्ता बांधल्यावर पुढच्या दहा वर्षात त्यावर खड्डा पडला, तर कंत्राटदाराची खैर नाही... 
आरक्षित भूखंड यापुढे कुणाच्याही घशात घालू दिले जाणार नाहीत...  
प्रत्येक विभागासाठी मनसेत स्वतंत्र सेल असेल... 
रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेसाठी मनसेची फळी उभी करणार... 

१२ वर्षांत यापैकी काय-काय झालं? सुरुवात जोरात झाली होती, हे कुणीच नाकारत नाही. पण नंतर इंजिन अडलं कुठे? आता या प्रश्नाचं एक उत्तर प्रत्येक मनसैनिकाकडे तयार आहे. ते म्हणजे, आमच्या हातात सत्ता कुठे आलीय? काही प्रमाणात ते मान्यही करू या. पण, मनसेचे नगरसेवक आहेत की, आमदार होते की; त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात तरी ते आपली जनहिताची धोरणं राबवूच शकत होते. पण, ते झालं नाही आणि म्हणूनच मतदारांनी त्यांना पुन्हा संधी दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपेक्षाभंग केल्याची टीका राज ठाकरे करतात. ती योग्यही असेल. मग, मनसेनंही अपेक्षाभंग केला म्हणूनच त्यांना नाशिकमधील सत्ता गमवावी लागली, असं म्हटल्यास त्यात चूक काय? पण, हे कुणीच मान्य करत नाही. उलट, जनतेनं विकासापेक्षा पैशाला मतं दिली, असं म्हणून त्यांच्यावरच खापर फोडलं गेलं. चूक स्वीकारायला, आत्मपरीक्षण करायला धारिष्ट्य लागतं. राज ठाकरे नक्कीच धाडसी नेते आहेत. यावेळच्या मेळाव्यात हे धाडस दाखवून नव्याने रणशिंग फुंकण्याची संधी त्यांच्याकडे होती. पण त्यांनी ती गमावली, असंच म्हणावं लागेल. 'मुहूर्त... नव्या लढ्याचा, नव्या प्रारंभाचा' या मनसेच्या टॅगलाइनमुळे तशी आशा निर्माण झाली होती. पण, आदल्या दिवशी बहुधा अजेंडा बदलला असावा.

विरोधासाठी विरोध करणं ही आपलीही वृत्ती नाही. मनसेनं काहीच केलं नाही, असं म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. चांगल्याचं कौतुक न करण्याइतके आपणही काही कोते नाही. पण, मनसेसाठी ही वेळ चांगल्याचं कौतुक करत बसण्यापेक्षा कुठे कमी पडलो, हे पाहण्याची आहे, असं वाटतं. हे त्यांना पटणं जरा कठीणच आहे, पण तरी बघा जमतंय का!  दरवेळी काचा फोडूनच प्रश्न सुटतात असं नाही. उलट, काचा बदलून अधिक चांगलं दिसू शकतं आणि बरंच काही साध्यही करता येऊ शकतं.

Web Title: Raj Thackeray's speech then and now, what about mns future plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.