Is the good people compelled of heaven? | चांगल्या माणसांना स्वर्गाचीच सक्ती का?

- डॉ. नीरज देव

सर्व धर्मांत स्वर्ग-नरकाची कल्पना आढळते. मग भलेही त्याला स्वर्ग-नरक म्हणा, हेवन-हेल म्हणा वा जन्नत-जहन्नुम म्हणा. अगदी परस्पर विरोधी संकल्पना मानणाºया धर्मांतही ही संकल्पना सारखीच असते. चांगल्या माणसांसाठी स्वर्ग तर वाईट माणसांसाठी नर्क राखून ठेवलेला असतो. पापाचरण करणाºयांना नरकात धाडणे एक वेळ ठीक; पण चांगल्या माणसांना स्वर्गातच जाण्याची सक्ती का असावी? नरकात जाऊन समाजसेवा करण्याची मुभा का नसावी?
खरे तर पाप-पुण्य, चांगले-वाईटच्या संकल्पना हरेक धर्मानुसार भिन्न भिन्न असतात. चांगले असण्या-नसण्याची संकल्पना एखाद्या पुस्तकाला ईशप्रणित मानण्यावर, एखाद्याला प्रेषित मानण्याच्या आधारावर वा एखाद्या विविक्षित व्यवहारावर आधारलेली असते. कैक वेळा एखाद्या धर्माला अपेक्षित धर्माचरण दुसºया धर्मात अधर्माचरण ठरते.
तरीही यच्चयावत धर्म, यच्चयावत धर्मग्रंथ उच्चरवाने हेच सांगतात की, अधर्माचरण करणाºयांना नरकात खितपत पडावे लागते, तर पुण्याचरण करणाºयांना स्वर्गसुख लाभते. बरे स्वर्ग-नरकाची संकल्पनाही सारखीच. स्वर्गात रंभा, उर्वशी वा हूर सापडणार, तर नरकात उकळत्या तेलात तळणार वा हालहाल करणार. अर्थात नर्क म्हणजे तुरुंग वा छळछावणी, तर स्वर्ग म्हणजे भोगविलास.
मला प्रश्न पडतो, ज्यांनी ज्यांनी भोगविलास नाकारले त्यांना त्यांना स्वर्गात पाठवून देव काय हो साधणार? बघा ना, बुद्ध, महावीर, जीझस, शंकराचार्य, मुहंमद, नागार्जून, नानक, कबीर, रामदास, तुकारामादी स्वर्गात जाऊन करणार तरी काय? त्यापेक्षा भोगविलासापायी जे नरकात गेले त्यांचीच काही सोय पाहिली असती तर जरा संयुक्तिक ठरले असते. ईश्वराची तºहाच न्यारी. भुकेल्याला अन्न न देणारी अन् मधुमेह्याला साखरेचे लाडू वाटणारी.
निदानपक्षी बुद्धादी या महापुरुषांना तरी एवढी सवलत द्यायला हवी होती की, त्यांना वाटेल तेथे त्यांनी जावे, स्वर्गात वा नरकात. याच विचारात असताना मला अचानक एक गोष्ट आठवली कोणत्यातरी पादºयाची, कोणी तरी हाच प्रश्न त्याला विचारला होता की, चांगल्या माणसांना स्वर्गातच का पाठवतात? त्या प्रश्नाने तो पादरीही परेशान झाला.
त्या रात्री त्याने एक स्वप्न पाहिले, तो एका रेल्वे-स्टेशनवर उभा आहे, जेथून स्वर्ग व नरकाला गाडीने जाता येते. तो उत्साहाने स्वर्गाला जाणाºया गाडीत चढला व तेथे पोहोचला तर त्याने पाहिले स्वर्ग एकदम ओसाड होता, तेथे कोणतीही चहलपहल नव्हती. त्याला आश्चर्य वाटले. त्याने दोन-चार वेळा तपासून घेतले, पाटीही पाहिली; आपण नरकात तर नाही ना? पण पाटी स्वर्गाचीच होती. तो विचारात पडला स्वर्गाची ही अवस्था हाल तर नरकाचे काय हाल असतील?
निराशायुक्त उत्सुकतेने तो नरकात पोहोचला तेथे पाहातो तर काय? सारी नरकभूमी हिरवीगार, फेसाळलेली, फुललेली आणि हे काय बुद्ध, शंकर, कबीर, नानक, रामदास, महावीरादी सारीच चांगली माणसे नरकात? कोणी या तर कोणी त्या कामात मग्न.
त्याने पुन:पुन्हा पाटी वाचली नरक हेल, जहन्नुम हीच ठळक अक्षरे कोरलेली. तो एकदमच गोंधळला, आपण आजवर धर्मग्रंथात जे शिकलो, शिकविले ते चुकीचे तर नाही ना? या विचाराने तो हैराण झाला आणि अचानक त्याची नजर शेतात राबणाºया सॉक्रेटिसवर पडली. त्याने त्याला गाठले व विचारले, ‘आम्ही पृथ्वीवर तुम्हा साºयांना चांगली माणसे समजत होतो, तुम्ही स्वर्गात गेला असाल, असे समजत होतो; पण तुम्ही तर इथे नरकात?’
सॉक्रेटिसने मृदुस्मित करत तुकारामाकडे कटाक्ष टाकला, तसे हसून तो देहूचा वाणी उत्तरला, ‘तुला कोणी सांगितले चांगली माणसे स्वर्गात जातात म्हणून ? अरे! चांगली माणसे जेथे जातात तेथे स्वर्ग निर्माण करतात. खरे पाहता आम्हाला तर नरकाचीच ओढ असते. मी म्हटलेय ना, बुडती हे जन बघवे ना डोळा म्हणुनि कळवळा येतसे. मग भोगविलासात मग्न स्वर्गात आम्ही काय हो करणार? त्यापेक्षा नरकात तापणाºयांना मदत करण्यासाठी नरकातच जाणार.’
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, चांगल्या माणसांना स्वर्गात जाण्याची सक्ती नसते, तर जेथे ते जातात, तेथे स्वर्ग निर्माण करतात.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)


Web Title: Is the good people compelled of heaven?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.