भयगंड एकाकीपणाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:02 AM2018-02-18T01:02:34+5:302018-02-18T01:03:12+5:30

प्रसिद्ध लेखक जॉर्ज आॅरवेल याने त्याच्या ‘नायन्टीन एटीफोर’ या कादंबरीत नमूद केलं होतं की भविष्यात अशी एखादी यंत्रणा अस्तित्वात येईल की मनुष्यप्राणी त्या यंत्रणेच्या आहारी जाईल. ही कादंबरी १९४९ मध्ये प्रकाशित झाली होती.

 Fierce loneliness! | भयगंड एकाकीपणाचा!

भयगंड एकाकीपणाचा!

- डॉ. राजन प्रभू

प्रसिद्ध लेखक जॉर्ज आॅरवेल याने त्याच्या ‘नायन्टीन एटीफोर’ या कादंबरीत नमूद केलं होतं की भविष्यात अशी एखादी यंत्रणा अस्तित्वात येईल की मनुष्यप्राणी त्या यंत्रणेच्या आहारी जाईल. ही कादंबरी १९४९ मध्ये प्रकाशित झाली होती. आजकाल मोबाइलबाबत वाढत असलेली अतिरेकी आसक्ती पाहता आॅरवेल याने कादंबरीतून केलंल भाकीत कालांतराने खरं ठरत असल्याचं दिसतंय.
मोबाइल फोनद्वारे उपलब्ध होणाºया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल माध्यमातून प्रचंड प्रमाणात नवनवीन माहिती उपलब्ध होत असते. त्याचप्रमाणे बातम्या, शेअर बाजारापासून उद्योगधंद्यांपर्यत वेगवेगळ्या क्षेत्रातील माहितीचा लोंढा मोबाइलमध्येच क्षणाक्षणाला उपलब्ध होत असतो. ही त्यातली जमेची बाजू. त्या सगळ्याचा वापर योग्य प्रमाणात कसा करून घ्यायचा की त्यात वाहवत जायचं हे व्यक्तीसापेक्ष असतं.
मानवाची माहितीची गरज कधीच पूर्ण होत नाही. त्याचबरोबर नवनवीन संपर्क होत राहतात, प्रतिक्रिया मिळत राहतात. नानाविध संदेश, व्हिडीओ, पोस्ट, आॅडिओ क्लिप यांची मोबाइलवर भरमार असते. त्यामुळे मोबाइलधारकारला हे सारं पाहत राहावंसं वाटतं. हे पाहत असताना माणसं आपलं दु:ख, विवंचना सारं काही विसरतात. मोबाइलचा अशा तºहेने वापर करताना आपण आपल्या दैनंदिन समस्या, ताणतणाव यापासून तात्पुरतं का होईना हे नकळत लक्षात आलं की त्याचा वापर अधिकच वाढत जातो. मोबाइलवरील सोेशल मीडियाबरोबरच गेम, चित्रपट यात तो अधिकाधिक वेळ घालवू लागतो. त्यातच गुंतून पडावंसं वाटतं आणि त्याची झिंग चढतच जाते. एकप्रकारे ते व्यसनच जडतं. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर या अतिरेकी वापरामुळे ती व्यक्ती स्वत:चं नुकसानच करून घेत असते, पण ते लक्षात येत नाही. वाट्टेल तेव्हा आणि नको तेथेही सेल्फी काढत सुटणं हाही याच वर्गवारीत मोडणारा प्रकार.
एकदा का सोशल मीडियाची अतिरेकी सवय झाली की आपण त्याचा वापर कमी किंंवा बंद केल्यास आपला जगाशी संपर्क तुटेल, अशी अनाठायी भीती वाटू लागते. या अतिरेकी वापरामुळे जास्तीत जास्त बहिर्मुख होऊ पाहणारी व्यक्ती अंतर्मुख होऊन विचार करणं मात्र विसरूनच जाते. वास्तविक मनुष्याला आत्मपरीक्षण करण्याचीच नितांत गरज असते. आणि तेच कमी कमी होत चाललं आहे. एखादं कुटुंब कधी भोजनासाठी हॉटेलमध्ये गेलं तर एकमेकांशी संवाद साधण्याऐवजी ते आपापल्या मोबाइलमध्येच व्यस्त असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळतं. आभासी जगात वावरताना आपल्या शेजारच्या व्यक्तीशी संवाद साधणं दुरापास्त होत चाललं आहे. मोबाइलच्या अशा अतिरेकी वापराच्या व्यसनाला ग्रेडेड डी सेन्सटायझेशनद्वारे आपण बºयाच प्रमाणात दूर करू शकतो. हे व्यसन अचानक बंद होणं कठीण असतं. पण आठवड्यातून सुट्टीच्या दिवशी आपण मोबाइलपासून दूर राहू शकतो. अथवा ठरावीक वेळेत मोबाइल बंद करून त्यापासून दूर राहत स्वत:साठी, कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकतो. वाचनासारखे छंद जोपासता येतात. अन्य अत्याधुनिक साधनांप्रमाणे मोबाइल हेही दुधारी अस्त्र आहे. या दुधारी अस्त्राचा योग्य वापर कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे.
(लेखक हे मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

Web Title:  Fierce loneliness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.