Change the mentality of air! | मानसिकतेत बदल हवा!

- भक्ती सोमण

सध्या समाजात पाळीबाबत विविध विचारधारेची तरुणाई दिसते आहे. मुली तर आता बिनधास्त झाल्या आहेत, पण मुलांचे काय? घरातील वातावरणामुळे काही मुलांची पाळीबाबत संकुचित वृत्ती आहे, तर काही मुले पुढाकार घेऊन घरच्यांना पाळीचे नियम पाळण्याबाबत परावृत करत आहेत. एकंदर मुलांची पाळीकडे पाहण्याची मानसिकता बदलायला सुरुवात होत आहे.

गेल्या आठवड्यात आम्ही मैत्रिणी एकत्र जमलो होतो. एक मैत्रीण लग्नाची असल्याने आणि सध्या मुले बघत असल्याने, तिला आलेल्या अनुभवांविषयी गप्पा सुरू होत्या. या वेळी मात्र ती खूपच वैतागली होती. कारण मुंबईतल्या दोन उच्चशिक्षित मुलांनी तिला पाळी पाळणार का? असे थेटच विचारले होते. इतकेच नव्हे, तर ही मुले कशा पद्धतीने पाळी पाळतात, याचे वर्णनही तिने आम्हाला सांगितले. ते ऐकल्यावर तर अजूनही काही प्रमाणात पाळीविषयी मुलांमध्ये गैरसमज असल्याचे जाणवले.
एका मुलाने त्यांच्या दुसºया भेटीत पाळी पाळावी लागेल, असे सांगतानाच पाळी सुरू असलेली मुलगी बाजूने जरी गेली तरी अस्वस्थ वाटते. आॅफिसमध्ये मी अशा सहकारी महिलेशी बोलतही नाही, अशा बाईच्या हातचे जेवतही नाही असे सांगितले, तर दुसºया मुलाने पहिल्याच भेटीत हाच प्रश्न विचारताना, आरोग्यासाठी चार दिवस बाजूला बसणे कसे चांगले? माझी बहीण डॉक्टर असूनही बाजूला बसते. मी मेसच्या बाईच्या हातचेही या चार दिवसांत खात नाही, तिला स्पष्टपणे सांगितले आहे तसे, असे सांगितले. याचे कारण विचारल्यावर, त्याने आमच्याकडे गुरूंचे खूप आहे, त्यामुळे पाळावेच लागते, असे सांगितले. तिने असे काही जमणार नाही, असे सांगितल्यावर तर तो चक्क तो जातीवरच गेला. तेव्हा मात्र तिने आजच्या मुली पाळीबाबत किती सहज विचार करतात, याविषयी सांगत त्याला ब्लॉक केले.
हे दोन अनुभव आहेत मायानगरी मुंबईतले. मुंबईतच काही मुलांमध्ये जर पाळीविषयी असे गैरसमज असतील, तर गावखेड्यात काय गत असेल, याची कल्पनाच करू शकत नाही. या मुलीला आले असे अनुभव प्रत्येकीलाच आले असतील, असे अजिबातच नाही. तरी काही अंशी मुलांमध्ये पाळीविषयी गैरसमज आहेत आणि ते कुटुंबाच्या चालीरितीतून आले असावेत, यात शंका नाही. प्रजननाच्या दृष्टीने आवश्यक असणाºया पाळीकडे आज मुली अत्यंत सहज बाब म्हणून बघतात. पूर्वीच्या काळी बायकांना अंग मेहनतीची कामे जास्त होती, त्यामुळे या कामांपासून तिला आराम मिळावा, यासाठी चार दिवस बाजूला बसावे लागत होते, पण आता मुली नोकरी करतात, त्यासाठी प्रवास करतात, समृद्ध जगाचा अनुभव घेतात. अशा वेळी पाळीकडे इतके बारकाईने बघावे, तिचा इतका बाऊ करावा, असे हल्लीच्या मुलींना वाटतही नाही.
एकंदर या विचारसरणीबाबत मानसशास्त्रज्ञ मानसी जोशी म्हणाल्या की, अत्यंत पारंपरिक विचारसरणी असलेल्या कुटुंबातील मुलांच्या बाबतीत पाळीविषयी अशी विचारसरणी असू शकते. एक तर मुलांना पाळी येण्याचा अनुभव नसतो. त्यामुळे घरात पाळीच्या दिवसांत घरातील स्त्री जसे वागेल, जे सांगेल, त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. त्या प्रभावामुळेच अशा मुलांची विचारसरणी अशी होत असावी, पण सर्वच मुलांमध्ये अशी संकुचित वृत्ती आढळून येत नाही. आजचे नवीन जनरेशन विशेषत: तिशीच्या आसपास असलेली मुले तर पाळीबाबात खूप मोकळी आहेत. ते त्यांच्या बायकोसाठी पॅड्सही आणतात. मैत्रिणींबरोबर कधीतरी त्या चार दिवसांबाबत चर्चा करतात. थोडक्यात, आता अवेअरनेसमुळे, इंटरनेटवरच्या माहितीमुळे सर्वच मुले संकुचित नाहीत, पण जेव्हा घरातील आई किंवा आजी पाळीबाबात उगात बाऊ करणे बंद करतील, तेव्हाच घरात आणि पुरुषांच्या विचारसरणीतही नक्कीच बदल घडतील.


पाळीचा ‘सोशल’ आवाज
मासिक पाळी असो वा सॅनिटरी नॅपकिन्स याविषयी समाजात असणारे गैरसमज एकविसाव्या शतकातही कायम आहेच. मात्र, आताची तरुण पिढी सोशल मीडियामुळे या साºया विषयाबाबत काहीशी सजग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याच माध्यमाचा वापर करून मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्सचा बाऊ करणाºया जुनाट विचारसरणीला पुसण्याचा विचार नव्या पिढीने मांडला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर वेळोवेळी विविध प्रकारची सोशल कॅम्पेन्स सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सॅनिटरी नॅपकिन्सवर लावलेला सेवा वस्तू कर, मासिक पाळी येणाºया महिलांना मंदिरात प्रवेश बंदी असे विषय चर्चेत आल्यानंतर, या निमित्ताने सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष समाजातही काही कॅम्पेन्समधून या विषयाला वाचा फोडण्यास सुरुवात झाली. त्यात मग समाजाच्या तळागाळातील, विविध स्तरांतील महिला-तरुणींनी सहभाग घेऊन निषेधाचा सूर आळविला. सोशल मीडियावर ‘हॅप्पी टू ब्लीड’, ‘शी सेज’, ‘डोन्ट टॅक्स माय ब्लड’ आणि ‘लहू का लगान’ या मोहिमांना सामान्य जनतेसह अदिती राव हैदरी, स्वरा भास्कर, सायरस ब्रोचा आणि अशा अनेक सेलिब्रिटींनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला. बºयाच मोहिमांमध्ये पहिल्यांदाच सॅनिटरी नॅपकिन्स हातात घेतलेले फोटो तरुणी व महिलांनी बिनधास्तपणे अपलोड केले.


Web Title: Change the mentality of air!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.