- रविप्रकाश कुलकर्णी

उपयुक्त गोष्टींची खरेदी-विक्री नेहमीच होत असते, पण त्याची बातमी येतेच, असे नाही. त्याचप्रमाणे, दरवर्षी भरतो तसा बाजार भरला. हा बाजार होता गाढवांचा. पांढरपेशी शहरी लोकांना त्याच आश्चर्य वाटणार, म्हणून त्यांच्यासाठी सांगायला हवे. हा बाजार चार पायांच्या गाढवांचा, दोन पायांच्या नव्हे....
मात्र, या गाढवांचाही इतिहास लक्षवेधी असू शकतो. ह. मो. मराठे यांनी ‘घरदार’ मासिक सुरू केले आणि त्यात काहीतरी वेगळे सदर असावे, याची चर्चा सुरू झाली, तेव्हा लेखक अभ्यासक वि. स. वाळिंबे यांनी कल्पना मांडली की, पुण्याजवळच गाढवांचा बाजार वर्षातून एकदा भरतो. त्या बाजारात एक दिवस घालवून ती निरीक्षण मांडावीत. अशा रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी एक दिवस घालवून हे सदर आकर्षक करता येईल. उदा. एक दिवस स्मरणात वगैरे.
पण हे करायला वि. स. वाळिंबे यांच्याकडे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे वेळ नव्हता आणि हे काम करायला मराठे यांना दुसरा माणूस सापडेना.
आता काय करायचे, संपादक मराठेंना प्रश्न पडला. विचार करता-करता ह. मो. मराठेंना कल्पना सुचली की, ज्यांच्याबद्दल कुतूहल आहे, अशा नामांकिताच्या बरोबर एक दिवस घालवून तो वृत्तांत वेधक ठरू शकतो. या कल्पनेमुळे त्यांची लेखमाला सुरू झाली- ‘एक माणूस एक दिवस’. त्यात बाळासाहेब ठाकरे, सुधीर फडके, नाना पाटेकर अशांची भेट हमो यांनी वाचकांसाठी घडवून आणली. पुढे याच नावाने या लेखांची दोन पुस्तके देखील प्रकाशित झाली. सांगायचा मुद्दा काय, तर या गोष्टीला गाढवांचा बाजार निमित्त ठरला.
सालाबादप्रमाणे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी गाढवांचा बाजार वेगवेगळ्या वेळी भरतच असतो. त्यात काही अप्रूप नाही. अप्रूप असते, ते तेथील घडामोडींचे. उज्जैन येथे भरलेल्या गाढव बाजाराचीच हकिकत पाहा. क्षिप्रा नदीच्या काठी भरलेल्या या बाजारात दोन हजार गाढवांची विक्री झाली. या बाजारात गाढवांची नावे तरी कशी होती पाहा - जीएसटी, सुलतान, बाहुबली, जीओ वगैरे, पण त्यातील दोन गाढवांकडे लक्ष वेधले गेले. त्यांची नावे होती, गुरुप्रीत राम रहिम आणि हनीप्रीत. त्या गाढवांवर म्हणजे गाढव-गाढविणीवर नावे रंगाने लिहिली होती आणि व्यापारी हरीओम खुलासा संदेश देत होता. केलेल्या दुष्कृत्याची फळे भोगावी लागतात! म्हणजे पाहा, करणी कुणाची आणि शिक्षा मात्र गाढव-गाढविणीला...
अशीच एक गोष्ट
माणसाला आपल्या नावामागे कुठली तरी पदवी असावी, असे वाटत असते. ती मिरवावी, असेही वाटत असते. उदा. प्रोफेसर डॉ. विशेषत: ज्यांनी डॉक्टरेट मिळविलेली असते अशी मंडळी, पण यासाठी किमान विद्यापीठाच्या परीक्षा द्यायला लागतात. त्यात उत्तीर्ण व्हायला लागते, पण सगळ्यांनाच शैक्षणिक पात्रता सिद्ध करताच येते, असे नाही. त्यांच्यासाठी मग काही हजार मंडळींनी मार्ग काढला, तो म्हणजे स्वयंघोषित पदवी वा त्यांच्या बगलबच्चांनीच दिलेल्या पदव्या...
पण सगळ्याचेच त्यावर समाधान होत नाही. त्यांना विद्यापीठाने दिलेली पदवी हवीहवीशी वाटत असते.
अशा पदव्या देणारीही विद्यापीठे निघाली. भले त्याला अधिकृत मान्यता नसली तर नसली. नाहीतरी कुणाची पदवी एरव्ही कोण कशाला तपासाला जाते? हल्ली तर अधिकृत डॉक्टरेट मिळवून देणारे डमी अभ्यासक आहेत म्हणे. म्हणजे अभ्यासपूर्ण प्रबंध ते लिहितात आणि ते सादर करणारे भलतेच असतात व त्यांनाच डॉक्टरेट वगैरे मिळतात.
शिवाय डॉक्टरेट नसणारे आपल्या नावामागे डॉ. लावणारे असतात ते वेगळेच.
पण ही झाली याला आताची गोष्ट.
त्या अगोदरची गोष्ट एका सरदाराला पदवी हवीहवीशी वाटली, म्हणून आपला भरधाव घोडा सोडला आणि तो थेट तथाक थित विद्यापीठात पोहोचला. फॉर्म वगैरे भरण्याचे सोपस्कार झाले. लगेच पैसे भरले आणि डिग्रीचे सर्टिफिकेट मिळालेदेखील. सरदार महाशय खुशीत परतू लागले, पण मध्येच त्यांना वाटले, आपल्याला पदवी मिळाली, हे ठीक आहे, पण आपल्या घोड्यालाही पदवी हवी. त्यांच्यापुढे राणा प्रतापच्या चेतक घोडा असावा.
सरदारांनी घोडा फिरवला आणि दौडत त्यांना जिथे पदवी मिळाली, तेथे ते पोचले आणि पैशाची थैली पुढे करत म्हटले, ‘माझ्या घोड्यालाही एक पदवी द्या...’ तेव्हा तेथील रजिस्ट्रार म्हणाले, ‘सॉरी सर, आम्ही घोड्यांना पदवी देत नाही, फक्त गाढवांना देतो!’’
बिचाºया चार पायांच्या गाढवांची बदनामी उगाचच होते हेच खरे....


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.