165 years of glorious service of central railways | 165 years of central railway: शंभरीच्या म्हातारीचं मनोगत

१८५३ साली आजच्याच दिवशी देशातील पहिली प्रवासी रेल्वे सुरू झाली होती. बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर पहिली ट्रेन धावली होती. आज १६५ वर्षांनंतर मध्य रेल्वेची किती दयनीय अवस्था झालीय, हे आपण सगळेच पाहतोय. देशातील पहिली रेल्वे हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या या रेल्वेचं आपण वाट्टोळं केलंय. या परिस्थितीत, एके काळी वैभव उपभोगलेल्या लोकलला कसं वाटत असेल, अशी कल्पना करून केलेली ही कविता... 

मध्य रेल्वे माझं नाव
वय माझं शंभरवर,
काय सांगू बाबांनो आता
कशी लागली मला घरघर...

इंग्रजांच्या काळात
खूप होती माझी बडदास्त
फेऱ्याही होत्या कमी
अन् माणसंही नव्हती जास्त...

रुळावरून धडधडत आले
की लोक मला घाबरायचे
एक भोंगा वाजवताच
दूर दूर पळायचे...

पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
सगळंच तंत्र बदललं
शहरांचा झाला विस्तार
माझं महत्त्व वाढलं...

मी खूप खुशीत होते
दिवसरात्र धावत होते 
नोकरदारांच्या प्रवासाची
नित्य काळजी वाहत होते...

पश्चिम उपनगरवासीयांच्या सेवेत
माझी बहीण तत्पर होती
धाकटीची भरधाव प्रगती
सगळ्यांचेच डोळे दीपवत होती...

आम्ही दोघी मुंबईची 
लाइफलाइन होऊन गेलो
भावालाही सोबत घेऊन
पनवेलपर्यंत जाऊन पोहोचलो...

पण मरमर राबणाऱ्या, 
टार्गेट अचिव्ह करणाऱ्या 
अन् इन हँड सॅलरी पाहून
मनात चरफडणाऱ्या
कॉर्पोरेट एम्प्लॉयीगत माझीही गत झाली
बडी बडी स्वप्नं (बोनस, इन्सेन्टिव्ह, TVP) दाखवून
'बेसिक'चीच काशी केली...

स्वतंत्र खातं, स्वतंत्र बजेट,
वरवर सगळंच होतं छान,
पण मतांच्या राजकारणात
विकासाला नव्हतं स्थान...

उत्तरेचे मंत्री कुल्हडबाजीत रमले होते,
भाडेवाढीचं नाव काढताच हुल्लडबाजी करत होते
अधिकारीही उत्तरेचेच, 
त्यांना मूळ प्रश्नच कळत नव्हते
दारापाशी कार असल्याने 
त्यांचे काहीच अडत नव्हते...

माझी मात्र आता दमछाक होऊ लागली होती,
प्रत्येक स्टेशनावरची गर्दी पाहून धडकी भरू लागली होती...

कधी कर्जत, कधी कसारा
कधी स्लो कधी फास्ट,
अप-डाउन करताना वाटतं
हीच फेरी ठरेल लास्ट...

हाडं खिळखिळी झालीयत, पायही लटपटतात,
चुकून कधी पटरी सुटली तर सगळे जण खवळतात...

तुम्हाला मी लेकरं मानते
चीडचीड तुमची मला कळते
चाकरमान्यांचे हाल पाहून
माझेही मन हळहळते...

'त्यांच्या' कर्माची फळं 
आपल्याला भोगावी लागत आहेत,
भ्रष्टाचाराचा चारा खाऊनही
ते तिकडे चैनीत आहेत...

किती करायची अॅडजस्टमेंट
आता सहन होत नाही,
तुमच्यात अडकलेला जीव
रामही म्हणू देत नाही...

तुम्हीच आहात माझी लाइफ
माझ्यावर नका रे रुसू,
म्हातारी झाले रे पोरांनो
'मरे' म्हणून नका हसू...

घरच्या आजी-आजोबांना 
तुम्ही देता ना रे औषध,
मग या पणजीला जगवण्यासाठी
काहीतरी करा की झटपट...

तुमच्या सेवेत धावत राहणं
हाच माझा ध्यास आहे
व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना 
आता चमत्काराचीच आस आहे!


Web Title: 165 years of glorious service of central railways
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.