यशवंत भालकर म्हणजे चैतन्याचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:44 PM2018-12-19T13:44:52+5:302018-12-19T14:02:24+5:30

यशवंत भालकर म्हणजे चैतन्याचा झरा. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे साठीतला हा झरा आटून गेला. चित्रपटाच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यामुळे तो साजरा करण्यासाठी त्यांनी मोठे नियोजन केले होते.

Yashwant Bhalkar means Chaitanya Fountain | यशवंत भालकर म्हणजे चैतन्याचा झरा

यशवंत भालकर म्हणजे चैतन्याचा झरा

googlenewsNext
ठळक मुद्देयशवंत भालकर म्हणजे चैतन्याचा झराअचानक एक्झिट

शवंत भालकर म्हणजे चैतन्याचा झरा. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे साठीतला हा झरा आटून गेला. चित्रपटाच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यामुळे तो साजरा करण्यासाठी त्यांनी मोठे नियोजन केले होते.

मकरंद अनासपुरे, डॉ. अमोल कोल्हे यांना चित्रपटात नायक म्हणून त्यांनीच पहिली संधी दिली. कगेल्हापूरशी संबंधित सर्वच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात ते सहभागी होत. संस्कार भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संस्थांशीही त्यांचा जवळचा संबंध होता.

पन्हाळ्याशी त्यांचे नाते अतूट. केवळ दिग्दर्शक म्हणून नव्हे तर महाराष्ट्र हायकर्स या गिर्यारोहण संस्थेपासून त्यांचा पन्हाळ्याशी संबंध. भालजी पेंढारकर, इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांच्यामुळे ते नातं आणखी घट्ट झालं. दरवर्षी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्याच्या कार्यक्रमाला त्यांची हजेरी असायचीच.

विनोद घोटगे. प्रमोद पाटील यांच्यासह ते पन्हाळा -पावनखिंड पदभ्रमंतीला हजेरी लावायचेच. त्यानिमित्ताने त्यांचा संपर्क व्हायचा. पन्हाळगडावर विखुरलेल्या तोफा एकत्र करुन तीन दरवाजापाशी आम्ही लावल्या होत्या. त्यावेळी पुरातत्व खात्याने आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी केली होती. त्यावेळी भालकर मदतीला धावून आले होते.

तांबडी माती, सूत्रधार, शापित या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्यांची भेट व्हायची. स्मिता पाटील, मधु कांबीकर, राजदत्त यांच्याशी सर्वप्रथम ओळख त्यांनीच करुन दिली. सनगर गल्लीतील त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी कधीही जेवण केल्याशिवाय परत पाठविले नाही. सर्वांनाच ते आदर देत.

पैज लग्नाची या त्यांच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटाचे लेखन लेखक प्रताप गंगावणे यांच्यासह पन्हाळ्याच्या सर्किट हाउसवरच केले. भालजी पेंढारकर त्यांचे गुरु. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे संहिता लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याचे पूजनही भालजी पेंढारकर यांच्या स्मारकाजवळच त्यांनी केले. त्यांच्या या चित्रपटातील गाण्यांची कॅसेट त्यांनी मला आवर्जुन दिली होती.

त्यावेळीच चित्रपटाचे कथानक ऐकून मी त्यांना हा चित्रपट पुरस्कार मिळविणार असे सांगितले होते आणि खरोखरच राज्य सरकारची १४ पुरस्कार या चित्रपटाने पटकावले. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्यानंतर भालजींचे स्वीय सहाय्यक अर्जुन नलावडे यांना घेउन ती बाहुलीही गौरवाने दाखवायला त्यांनी पन्हाळाच गाठला.

आमच्या घरी त्यांनी ती बाहुली काही काळ ठेवून फोटो काढले, माझ्या आईचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर त्यांच्या बहुतेक चित्रपटाचे लेखन त्यांनी पन्हाळगडावरच केले. माझ्या विनंतीवरुन त्यांनी अनेक शाळांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. लोकमतसाठी तर त्यांनी विपुल लिखाण केले. पत्रकारांसाठी तर ते चालता बोलता इतिहासच होते.

भालजींचा कपडेपट सांभाळता सांभाळता ते दिग्दर्शित करत असलेल्या प्रत्येक चित्रपटातील बारकावे त्यांनी आत्मसात केले. सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन जरी त्यांनी केले असले तरी त्यांचे नाव श्रेयनामावलीत नसायचे. मुंबई ते मॉरिशस या चित्रपटाचे ते सहाय्यक दिग्दर्शक असले तरी तेच याचे खरे दिग्दर्शक होते. त्यांचे चिरंजीव संग्राम भालकरला नृत्यदिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रोत्साहन दिले.

भालकर्स अकादमीची त्यांनी स्थापना करुन त्यामार्फत अनेक कलावंतांना पुरस्कारही दिले जात होते. कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीत ते सातत्याने कार्यरत असत. रंकाळ्यावर त्यांनी गेल्या सात वर्षात अनेक आरोग्यदायी झाडे लावली. त्यांचा ६१ वा वाढदिवस त्यांनी त्या झाडांच्या सानिध्यातच साजरा केला.

कथेची सूत्रबध्द मांडणी, कॅमेराचा प्रभावी वापर, कलाकारांचा नेमका हावभाव ही त्यांच्या दिग्दर्शन शैलीची वैशिष्ट्ये. त्यांनी सत्ताधीशसारख्या आपल्याच काही चित्रपटात छोट्या भूमिकाही केल्या. अगदी अलिकडे तुझ्यात जीव रंगला या मालिकेत मुख्यमंत्र्याची छोटीशी भूमिकाही केली.


चित्रपट कारकीर्द

चित्रपट : पैज लग्नाची (१९९७), घे भरारी (१९९९), सत्ताधीश (२000), झुंजार (२00३), रणरागिणी (२004), नाथा पुरे आता (२00५), राजा पंढरीचा(२00५) , आबा झिंदाबाद (२00८), चल गंमत करु, राजमाता जिजाउ, (२0१0), हायकमांड (२0१२), लेक लाडकी (२0१३),
टेलिफिल्म : काळीज
माहितीपट : राधानगरी धरणाची यशोगाथा (२0१८)
पुस्तक : पडद्यामागचा सिनेमा, आठवणीतील गुलमोहर, मला भेटलेली मोठी माणसं, लामणदिवा.
संस्था : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (२00५), महाराष्ट्र शासन चित्रपट परिक्षण समिती सदस्य, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य (२0१८), पश्चिम महाराष्ट्र, संस्कार भारतीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूर शहर अध्यक्ष (२0१८)

- संदीप आडनाईक

 

Web Title: Yashwant Bhalkar means Chaitanya Fountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.