कोरेगाव-भीमाचा धडा काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 04:14 PM2018-01-10T16:14:21+5:302018-01-10T16:15:13+5:30

बहुजन, कष्टकरी समाजाला सुखाचे दिवस यायचे असतील, तर केवळ राजकीय समानतेतून हे शक्य होणार नाही, तर सामाजिक आणि आर्थिक समता येणे अतिशय महत्त्वाचे असते.

What is the chapter of Koregaon-Bhima? | कोरेगाव-भीमाचा धडा काय ?

कोरेगाव-भीमाचा धडा काय ?

- धनाजी कांबळे
बहुजन, कष्टकरी समाजाला सुखाचे दिवस यायचे असतील, तर केवळ राजकीय समानतेतून हे शक्य होणार नाही, तर सामाजिक आणि आर्थिक समता येणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी जशी रस्त्यावरची लढाई महत्वाची असते, तशीच संवैधानिक लढाई देखील महत्त्वाची असते. त्यासाठी नेतृत्व खंबीर असेल, तर त्यांचे अनुयायीदेखील निर्भयपणे आलेल्या संकटांचा सामना करू शकतात, हेच कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन हजारोंच्या संख्येने जनता रस्त्यावर आली. ही ताकद एकजुटीने त्यांच्यासोबत उभी राहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा आयाम प्राप्त होईल...

हे प्रज्ञासूर्या,
तू उगवला नसतास तर,
युगानुयुगे पसरलेल्या
काळोखाला बाजूला सारून
नवी पहाट झालीच नसती... अशी एक कविता आहे. ही कविताच खरं तर सगळा इतिहास डोळ्यासमोर आणते. हजारो वर्षांची गुलामी झुगारून स्वाभिमानानं जगण्याचं बळ प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून दलितांना मिळालेले आहे. एकप्रकारे दलितांच्या आयुष्यात नवी पहाट झाली आहे. जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळेच वेळोवेळी इतिहासाचे स्मरण करून एक नवी ऊर्जा घेतली जाते, तीच पुढे काही दिवसांसाठी ताकद बनून उभी राहते. दिशाहीन पाखरांना दिशा देण्यासाठी अशा इतिहासांच्या खांद्यावर उभे राहून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक समानतेची लढाई उभी करायची असते. त्यासाठी सध्या महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतालाच जातीवादी शक्तींनी जातीवादी चेहरा दाखवला. एकविसाव्या शतकातही त्यांनी जात सोडली नाही. भारतात माणसापेक्षा जातीला आणि माणुसकीपेक्षा धर्माला सर्वाधिक महत्त्व असल्याचे दाखवून दिले. वढू गावात गोविंद गायकवाड यांची समाधी काही समाजकंंटकांनी उद्ध्वस्त केली. त्यानंतर गावपातळीर हा विषय सामोपचाराने मिटवण्यात आला. तसेच गोविंद गायकवाड यांची समाधी पुन्हा नव्याने उभी करण्याची हमी गावक-यांनी दिली. तसेच आमच्यात कोणताही विसंवाद अथवा भेद नसल्याचे सांगितले. तरीही देखील ज्यांना केवळ दंगल घडवायची होती. त्यांनी हे प्रकरण धुमसत ठेवले आणि १ जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली.

भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीविरहीत समतावादी समाजरचनेचे स्वप्न बघितले. पण अद्यापही जाती टिकून आहेत. भीमा कोरेगावमध्ये जातीय अहंकारातून निशस्त्र बौद्ध बांधवांवर अमानुष हल्ला करण्यात आला. एवढेच नव्हे, तर अन्न, पाण्यावाचून माणसं तडफडून मरावीत, अशा भावनेतून या परिसरातील गावांनी एका रात्रीत ठराव करून सर्व दुकाने, हॉटेल्स, पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अक्षरक्ष: एक जानेवारीला जातीय अंहकारातून आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांची, लेकुरवाळ्या बायाबापड्यांची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. अमानुषपणे दगडफेक करण्यात आली. डोळ्यात खूपणा-या गाड्या फोडण्यात आल्या. जाळण्यात आल्या. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाची आठवण ठेवून आणि तथागत गौतम बुद्धांच्या अहिंसेला जागत लाखो अनुयायांनी संयम दाखवत हल्ल्याचा प्रतिकार केला नाही, त्यामुळे अनर्थ टळला. ही बौद्ध अनुयायांनी दाखवलेली प्रगल्भता भारताची समतेची शान वाचवू शकली, हे कुणालाही नाकारता येणार नाही. कारण जगात भारत हा एकमेव असा देश आहे, ज्या देशात जाती आणि धर्माच्या नावावर हिंसाचार घडवून राजकारणी आपली पोळी भाजून घेतात, हे आतापर्यंतच्या इतिहासाने दाखवून दिले आहे.

संयम आणि प्रगल्भता
बौद्ध बांधवांच्या बरोबरच हजारोंच्या संख्येने आलुतेदार समजल्या गेलेल्या समूहातील लोक देखील या ठिकाणी विजस्तंभाला मानवंदना देण्यासाठी यंदा प्रथमच आले होते. त्यांनी देखील सामजस्याने या वेळी प्रगल्भतेची भूमिका घेतल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. या ठिकाणी लाखो अनुयायांवर झालेल्या या हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे. मात्र, काही गोष्टी भविष्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. त्याप्रमाणे कितीही अमानुषपणे छळवणूक आणि अत्याचाराची भूमिका घेऊन जहरी आणि विद्वेषाची भूमिका घेऊन ज्या अतिरेकी शक्तींनी हल्ला केला, त्याला शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मागार्ने बंद पाळून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह देशातील जनतेने या प्रकाराचा तीव्र निषेध केला. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने लोक आपला पक्ष कोणता, नेता कोण, गट-तट विसरून या बंदमध्ये सहभागी झाले. या सगळ्या प्रकारात हे सर्व एकीकडे सुरू असताना स्वत:ला दलितांचे नेते म्हणून प्रस्थापित जात्यांध आणि धर्मांध नेत्यांच्या मागे गोंडा घोळणा-या नेत्यांनी साधा निषेध देखील नोंदवला नाही, आणि हिच चीड प्रचंड मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधवांमध्ये निर्माण झाली. महाराष्ट्रात एक ऐतिहासीक बंद घडून आला. यात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितले. सरकारने तातडीने या प्रकरणातील अतिरेकी शक्तींना, बहुजन समाजाच्या तरुणांना हाताशी धरून स्वत:ची पोळी भाजून घेणा-यांना अटक करून कारवाई करावी, अशी भूमिका घेतली आणि महाराष्ट्राला जातीय दंगली फायद्याच्या नाहीत, हा संदेश दिला. एक प्रगल्भ नेता म्हणून त्यांच्याकडे सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याचे दिसते. केवळ महाराष्ट्र नव्हे, तर गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये बाळासाहेबांना मानणारा एक मोठा समूह आहे. त्यांनी देखील या प्रकारात मोठ्या ताकदीने आपल्या एकीचे बळ दाखविले.

प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष
ज्या दिवशी दंगल घडवून आणली गेली, त्या दिवशी रात्रीपर्यंत प्रसारमाध्यमांत बातमी नव्हती. भीमा कोरेगावमध्ये लाखो अनुयायांवर झालेला हल्ला, दगडफेक, वाहनांची जाळपोळ याबद्दल कुठेही अवाक्षर काढले गेले नाही. मात्र, त्यानंतर दंगलीचे पडसाद राज्यात उमटू लागल्यावर टीव्ही आणि वर्तमान पत्रांनी महाराष्ट्राचे किती नुकसान झाले आणि ते कोण भरून देणार अशा चर्चा सुरू केल्या. वस्तुस्थिती समाजासमोर मांडून प्रश्न चिघळण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करण्याची माध्यमांनी सामजस्याची भूमिका घेणे गरजेचे असते, मात्र या प्रकरणात तसे झाल्याचे दुर्देवाने दिसले नाही. एकीकडे नि:पक्ष, निर्भिड अशी बिरूदावली मिरवणा-या माध्यमांनी जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने अफवांना उत आला होता. हे प्रकरण केवळ भीमा कोरेगावपुरते मर्यादित नाही, हे लक्षात आल्यावर आणि हल्लेखोरांबाबत तीव्र प्रतिक्रिया आल्यावर काही लोकांना ह्यहिरोह्ण बनविण्याचाही प्रयत्न काही पत्रकारांनी केल्याचे दिसून आले. यात काही पत्रकारांनी समतोल साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, जाती आणि धर्माचे चष्मे काढून कुणीही नि:पक्षपणे चर्चा घडवून आणली असे दुर्देवाने दिसले नाही. दुसरीकडे ज्यांची नावे दंगल भडकवण्यामध्ये पुढे येत आहेत, त्यांच्या मुलाखती मात्र पेड न्यूजच्या पद्धतीने एकामागोमाग एक टीव्हीवर दाखवल्या जात होत्या. सरकार मात्र आश्वासनांपलीकडे ठोस काही करताना दिसले नाही. त्याउलट जिग्नेश मेवानी, छात्र भारती, अरविंद केजरीवाल आदींच्या सभांना बंदी घालून त्यांना भाषणबंदी करताना दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम घडवून आणून सरकार स्वत:च सामाजिक तणाव निर्माण करीत असल्याचे दिसले. हे घडत असताना भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदमध्ये ज्या तरुणांनी, महिलांनी सहभाग घेतला त्यांना शोधून अटक करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले होते. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतल्यावर कोंबिंग आॅपरेशन केले जाणार नाही, असे आश्वासन दिले असताना पोलीस मात्र बिनधास्तपणे कोंबिंग आॅपरेशन करीत होते. जे पोलीस भीमा कोरेगावमध्ये जेवढी तत्परता दाखवायला हवी होती, तेवढी दाखवताना दिसले नाहीत. त्याउलट दंगेखोरांना पाठीशी घालण्याचीच त्यांची भूमिका होती, असे बोलले जात आहे. किंबहुना हल्लेखोरांना अटकाव करण्याऐवजी भीमा कोरेगावात जमलेल्या जमावाला हत्यारे लोड केल्याचे सांगून धमकावत होती असे अनेक नागरिकांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. खंर म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर, खैरलांजी, खर्डा येथील दलित अत्याचाराच्या घटनांमध्येही पोलीसांची भूमिका संशयास्पद राहिल्याचा आरोप झाला आहे.

मराठा-दलित एकीचे दर्शन
वढू आणि भीमा कोरेगावचा इतिहास कुणी कितीही दडवून ठेवण्याचा किंवा विकृत करून सांगण्याचा प्रयत्न केला असला, तरी इतिहास कधी कुणाला पुसता येत नाही, हेच सिद्ध झाले आहे. विवेकवादी सर्व समाजाच्या मंडळींनी, प्रमुख पुढा-यांनी (राजकीय नव्हे) भीमा कोरेगावच्या दंगलीचा निषेध करून या प्रकरणातील दोषींना कठोरातले कठोर शासन केले पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे. यानिमित्ताने मराठा, दलित, ओबीसी, आदिवासी असे सगळेच समूह एकत्र आले असून, जातीवाद्यांनी जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो डाव विवेकी समाजाने हाणून पाडला आहे, हे येथे विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे.

सामाजिक सलोख्याला प्राधान्य
कोरेगाव-भीमाच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर केंद्रीत झाल्याचे दिसत आहे. खरं म्हणजे राज्यातील इतर कोणत्याही दलित नेत्याच्या तुलनेत त्यांची सुरुवातीपासून या प्रकरणात दलित, आदिवासी, कष्टकरी, आलुतेदार समाजाच्या सोबत राहिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तीव्र निषेध करून राज्यातून विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या संख्येने असलेल्या जमावावर झालेला हल्ला अतिशय खेदजनक असल्याचे सांगून या प्रकरणात कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग असण्याची शंका उपस्थित केली. एकबोटे आणि भिडे यांची नावेही त्यांनी जाहीर केली आहेत. अशी परखड भूमिका घेणारे बाळासाहेब २०१८ मध्ये तरुणांचे हिरो बनले आहेत, हे कुणालाही मान्यच करावे लागेल. सर्व समूहांना सोबत घेऊनच नवा समतावादी समाज निर्माण करणे शक्य आहे, यावर त्यांचा विश्वास असल्याचेच यावरून दिसते. त्यामुळेच भीमा कोरेगाव दंगलीचा निषेध करण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये विवेकवादी मराठा, कुणबी समाज त्यांच्या सोबत राहिल्याचे दिसले. तसेच मराठा आणि दलित असा संघर्ष उभा करू पाहणा-यांचे मनसुबे यामुळे उधळले हेही इथे ध्यानात घेतले पाहिजे. त्यामुळे ३ जानेवारीच्या बंदमध्ये जे लोक सहभागी झाले ते कोणत्या एका गटाचे, पक्षाचे, संघटनेचे नव्हते, तर ज्यांना ज्यांना माणूस महत्त्वाचा वाटतो, ते सगळे विवेकवादी समूह यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसले. विशेषत: संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघाची भूमिका प्रगल्भ आणि सामजस्याची वाटली. त्यांनी कोणताही निर्णय घेताना अतिशय संवेदनशीलपणे घेतल्याने महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा टिकून राहण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही परिस्थितीचे भान ठेवून जे यात दोषी असतील, त्यांना पाठीशी न घालता सरकारने कठोर शासन करावे अशी मागणी करून अशाप्रकारे सामाजिक अशांतता पसरविणा-यांना थारा देवू नका, असे सांगितले, त्याचाही एक चांगला परिणाम हा सलोखा टिकून राहण्यास झाला आहे.

मतभेद विसरून जनता एकवटली
कोरेगाव-भीमाच्या प्रकरणाने सामाजिक पेच निर्माण झाला असताना सत्तेत असलेले रामदास आठवले यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता बोटचेपेपणाची भूमिका घेतली. त्याचप्रमाणे भाजपसोबत सत्तेत असलेल्या राज्यातील दलित नेत्यांनी देखील या प्रकरणात कोणतीच प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. आंबेडकरी चळवळीतील लोकांना खरं तर त्यांच्या प्रतिक्रियेची गरजही नाही आणि अपेक्षाही नाही. पण त्यांनी किमान लाजेखातर तरी याप्रकरणाची निषेध करून हल्लेखोरांना अटक करण्याचे शहाणपण दाखवण्याची गरज होती. हे त्यांच्या भविष्यातील राजकारणासाठी आवश्यक होते.

मात्र, ते या प्रकरणात उघडे पडले आहेत, हे सबंध महाराष्ट्र जाणतो. अशा वेळी खंबीरपणे बांधवांच्या पाठीशी उभे राहणा-या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वेगवेगळे समूह, गट यानिमित्ताने जोडले गेले आहेत. भविष्यातील सामाजिक, राजकीय वाटचालीत याचा नक्कीच परिणाम दिसून येईल, अशी असणारी आताची परिस्थिती आहे. बाळासाहेब  हे नेहमीच वेगळे प्रयोग करणारे म्हणून परिचित आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या विविध राज्यांमध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांच्यासोबत डाव्या आघाडीतीलही महत्त्वाचे नेते जोडले गेलेले आहेत. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांवर आंदालने उभारली असून, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यांना जर ताकद मिळाली, तर त्याचा ते समाज विकासासाठी चांगला उपयोग करू शकतात. त्यांच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा फायदा जनतेला होऊ शकतो. केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक विषमता संपली पाहिजे, तरच सामाजिक समतोल टिकून राहू शकतो. यासाठी समानता प्रस्थापित करण्याची इच्छाशक्ती असण्याची आवश्यकता असते, हे आता यानिमित्ताने एकत्र आलेल्या जनतेने समजून घेतले पाहिजे. 

जातीअंताच्या लढ्याला बळ
रामदास आठवले यांच्या तुलनेत प्रकाश आंबेडकर हे लोकांमध्ये मिसळत नाहीत, असे बोलले जाते. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून राज्याच्या पातळीवर जातीय अत्याचार प्रतिबंधक चळवळ  आणि जातीमुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज्याच्या कोणत्याही भागात अन्याय-अत्याचाराची घटना घडल्यास आणि ती कोणत्याही समाजातील पीडित लोक असले तरीही त्या ठिकाणी धावून जाण्यात आग्रही असल्याचे दिसले आहे. त्यामुळे भीमा कोरेगावातून या निमित्ताने सुरू झालेल्या या नवीन ‘प्रकाश’वाटेवर अनेक समूहांचे लोक चालतील, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असेलेले रयतेचे राज्य प्रस्थापित व्हावे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य प्रस्थापित व्हावे, यासाठी समतावादी समाज निर्मितीसाठी महाराष्ट्राला एक नवं व्हीजन देतील, असा आशावाद बौद्ध, कष्टकरी, आदिवासी, आलुतेदार समजल्या गेलेल्या जातसमूहांमध्ये दिसून येत आहे. या निमित्ताने दलित समजल्या गेलेल्या समाजाला एक प्रभावी नेतृत्त्व मिळाले आहे. बाळासाहेबांना येत्या काळात हा सर्व समूह कशाप्रकारे साथ देतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. भावनीक प्रश्नांवर गट-तट असा कोणताही भेदाभेद न मानता एकत्र येणारी ही शक्ती राजकीयदृष्ट्या त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभी राहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा आयाम प्राप्त होईल. भीमा कोरेगावच्या लढ्यातून दलित चळवळीत एक नवचैतन्य आले आहे एवढे मात्र निश्चित! डॉ. ज्योती लांजेवार यांच्या शब्दांत इतकेच म्हणता येईल-
‘हजारो हातांचे बळ एकत्र आणून
हा सूर्याचा देश
माणूसमय करायचा आहे
मुखवट्यांच्या जगातले बेगडी चेहरे
स्पर्धाविहीन करून
तंबूंच्या बाहेर यायचे आहे
सूर्याचा देश जागवायचा आहे
तंबूंनी एकत्र यायचे आहे...’

Web Title: What is the chapter of Koregaon-Bhima?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.