- साईली कौ. पलांडे-दातार.

परभणीपासून ३५ कि.मी.वर असलेले धारासूर हे गाव तसे सामान्य गावासारखेच आणि तितकेच दुर्लक्षित! पण गोदावरीसारख्या जीवनदायिनी नदीचे सान्निध्य साध्या गावाची महती अनेक पटींनी वाढवली आहे. नदीच्या तटातटाने तीर्थ संकल्पना उदयास येताना दिसते व मानवी वस्ती नदीकाठाने वाढू लागते. अशाच एक ४०-५० फूट नदीच्या तीरावर आणि प्राचीन पांढरीच्या टेकडीवर आजचे आपले गुप्तेश्वर मंदिर वसले आहे! या धारासूर गावाचा धारासूर कोण होता, मंदिर कोणी बांधले किंवा गुप्तेश्वर नाव कसे पडले याचे फारसे संदर्भ आपल्याला मिळत नाहीत; पण मंदिर बांधणीच्या शैलीवरून काळासंदर्भात काही आडाखे बांधू शकतो. दहा फूट उंच पीठावर उभे असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. संरक्षित नसल्यामुळे व अनेक वर्षांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आज ते एका बाजूने झुकले आहे व मंदिराच्या उत्तर बाजूचा भाग ढासळला आहे. उंच पीठावर जाण्यासाठी तिन्ही बाजूंनी पाय-या असून, त्याच्या सुरुवातीला दोन रिकामे देवकोष्ठे आहेत. चढून गेल्यावर उंच चौथ-यावर मध्यभागी मंदिर असून मंदिराच्या तलविन्यासाच्या आकाराचा विस्तीर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे. 

लातूर जिल्ह्यातील पानगाव विठ्ठल मंदिराशी साम्य दाखवणारी रचना या मंदिराची आहे. संपूर्ण मंदिराच्या मुख्य पीठावर व सभामंडपाच्या उपपीठावर गजथर कोरलेला आहे व सर्व हत्ती वैविध्यपूर्ण मुद्रेत जिवंत कोरलेले आहेत. तीनही बाजूने उतरत्या छपराचे, चार वामनस्तंभावर कक्षासनयुक्त अर्धमंडपातून मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपाच्या बाहेरील बाजूला जाळीयुक्त स्तंभाचे नक्षीकाम दिसते, तसेच खाली छोट्या अर्धस्तंभामध्ये मानवी आकृती व सूरसुंदरी आहेत. चौकोनी सभामंडपाचे मुख्य वैशिष्ट्य आहे ते नाजूक रत्न (शंकरपाळ्याचा आकार) कोरलेली जाल-वातायने (हवा खेळती ठेवण्यासाठी खिडक्या)! दख्खनच्या बसाल्ट दगडात एकसंध कोरलेल्या या खिडक्या सभामंडपात नैसर्गिक हवा आणि प्रकाश पोहोचवतात तसेच आडोसाही पुरवतात.

मंदिराचे गर्भगृह चौकोनी असून पंचरथ प्रकारचे आहे. इतरत्र न टिकलेले घडीव विटांचे मूळ शिखर व अंतराळावरील शुकनास, मंदिराच्या एकूण डौलात भर घालताना दिसते. शिखर भूमीज प्रकारचे असून, पाच थरांमध्ये बांधले आहे व मंदिराचा भार कमी करण्यासाठी आतून पोकळ ठेवले आहे. मुख्य सभामंडपात आज नवीन फरशी बसवल्याने मूळ रंगशिलेचे अवशेष दिसत नाही. अर्धमंडपाच्या आणि मूळ गर्भगृहाच्या द्वारशाखांवर वैष्णव द्वारपाल कोरले आहेत व ललाट बिंबावर गणेश प्रतिमा आहेत. प्रदक्षिणा पथावर मंडोवरावरील विविध सूरसुंदरी आपल्याला मराठवाड्यात चालत आलेल्या कल्याणी चालुक्यांच्या कला प्रभावाची आठवण करून देतात. पत्रलेखिका, पुत्रवल्लभा, खंजिर धारण करणारी, विंचू आणि सर्प हातात खेळवणारी, चौरीधारिणी, मर्दला, शत्रूमर्दिनी, डालमालिनी, चंद्रवकत्रा, मुंगूस आणि नाग खेळवणारी, सर्प ल्यायलेली विषकन्या, दर्पणा, नर्तकी, वीणावादक, अप्सरा व मर्कट, आळता काढणारी, कर्पूरमंजिरी अशा उत्कृष्ट बांधीव सूरसुंदरी, मंदिराचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात. वरुणाचे वाहन असलेले नक्षीदार मकर प्रणालाच्या रूपात गाभा-यातील अभिषेकाचे पाणी बाहेर टाकते. 

तीन बाजूच्या देवकोष्ठात अनुक्रमे विष्णूच्या उपेंद्र, ऋषिकेश व त्रिविक्रम मूर्ती आहेत. तसेच, गर्भगृह व अंतराळाच्या बाह्यभिंतींवर ऋषिकेश, मदन, गणेश, चामुंडा ही देवताशिल्पे अंकित आहेत. विष्णूच्या चतुर्विन्शती मूर्तीपैकी (२४ विभव /प्रकार), समाजातील विविध जातींनी विशिष्ट मूर्ती पूजणे अपेक्षित आहे. या मंदिरातील, ऋषिकेशाची मूर्ती ही चांभार, परिट, नर्तक, शिकारी आणि मेड भिल्ल समाजांना वरदायी आहे, तर त्रिविक्रम मूर्ती वैश्य समाजाला वरदायी आहे, अशी सूचना शास्त्र ग्रंथातून मिळते. एकूण स्थापत्य व शिल्पांच्या शैलीवरून हे मंदिर कल्याणी चालुक्य व सुरुवातीच्या यादव काळाच्या सीमेवर साधारण १२ व्या शतकात बांधले असावे. मूळ गाभा-यात आज नवीन शिव पिंड बसवली आहे, जी गुप्तेश्वर महादेव नावाने ओळखली जाते; पण मूळ मंदिराचा स्वामी हा विष्णू आहे याची साक्ष आपल्याला वैष्णव शिल्पांच्या रेलचेल आणि निर्णायक जागेवरील अंकनावावरून कळते. मंदिरातून आज गुप्त झालेला विष्णू मात्र थोडा शोध घेतल्यावर धारसुरातच एका उत्तरकालीन मंदिरात सुरक्षित आहे.

चालुक्य कलेचा परमोच्च आविष्कार असलेली साधारण चार फूट मूर्ती आसनासकट संकटकाळी या मंदिरात हलवण्यात आली असावी. झिलई असलेल्या दगडावर कोरलेली ही माधव रूपातील विष्णू मूर्ती कुठल्याही विध्वंसाशिवाय नाकी डोळे नीट उभी आहे. हे खरेतर धारासुराच्या मागील पिढ्यातील ग्रामस्थांचे श्रेय आहे. प्रभावळीत दशावतार कोरलेली ही मूर्ती पंख असलेल्या गरुड, लक्ष्मी व चौरीधारीबरोबरच, मूर्ती व मंदिराचे दान देणारे अनामिक दाम्पत्य पायापाशी कोरलेले आहेत. मुख्य मूर्तीबरोबरच, गणेशाची आणि महिषासुरमर्दिनीची सुबक प्रतिमा तिथे आढळते. आज, गुप्तेश्वर मंदिराचे खचलेल्या आणि ढासळलेल्या भागांचे संवर्धन तातडीने करायला हवे व त्यासाठी गावकºयांना पुरातत्व खात्याच्या साहाय्याची नितांत गरज आहे. हा समन्वय घडला तर मराठवाड्यातील मंदिर संपदा चिरकाल टिकेल अन्यथा..!

(लेखिका पुरातत्वज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ आणि इतिहास संशोधक आहेत.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.