- डॉ. संजीवनी तडेगावकर

आपले समजूतदारपण उलगडताना कवयित्री योगिनी सातारकर-पांडे  म्हणतात-

‘बरंच झालं, पोहोचला नाहीस तू गोष्टीतल्या शेवटापर्यंत, 
कळायचंय तुला अजून,
तसाही असत नाही प्रत्येकच गोष्टीला शेवट,
किंवा शेवटही असते एक नवी सुरुवात,
आपण चालत राहायचं फक्त,
गोष्टीत तपशील भरत.’

गोष्टीतील तपशील भरताना आयुष्यातील रिकाम्या जागा कशा भरून निघतील? याच्या शोधात असलेले संवेदनशील मन इच्छांना नाकारीत मर्यादांच्या रेघोट्या मारीत खिन्न होऊन जाते. तेव्हा कवयित्री लिहिते-

‘स्वीकारू शकत नाही,

म्हणून मी नाकारलं तुझं अस्तित्व,

जसा की तू नाहीसच,

फाडून टाकली कागदावरची अक्षरं मनातून तुला मिटवता आलं नाही तरी.’

स्वीकार-नकाराच्या मधली घुसमट आणि अपयशी नात्याचे ओझे जन्माला पुरून उरते. त्यातून येणारी खिन्नता, नैराश्य कधी-कधी आकसून टाकणारे असते. याची जाणीव योगिनींची कविता वाचताना होते. करंजीला मुरड घालावी तसे स्वत:ला दुमडून घेत सर्वांच्या सोयीसाठी जगणारी बाई सर्वत्र जशी आपल्याला भेटते. तशीच योगिनींच्या कवितेतही भेटते. ती अतिशय नेमकेपणाने त्यांनी शब्दांकित केली आहे. तिचे-भेटणे-जगणे आपल्याला नवे नाही; पण धिटाईने व्यक्त होणे नवे आहे. काळजातले अंधार कोपरे मिणमिणत्या उजेडात का होईना दाखवणे नवे आहे. बाईपणाच्या मर्यादांची झूल बाजूला करून मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करणे नवे आहे. स्वत:च्या मनासारखे जगता आले नाही. हे स्वत:पुरते का होईना मान्य करणे नवे आहे आणि म्हणूनच त्या लिहितात-

‘तू दिसतोस हातभर अंतरावर,
मी कामात व्यस्त, मी मिटून घेतलेलं,
स्वत:ला स्वत:त, बंदिस्त चौकटीच्या आत,
स्वत:शी झगडत भांडत आणि
दिसणारा जाणवणारा असणारा तू,
हातभरच अंतरावर!’ 

अवघ्या स्त्रीवर्गाला अंकित करू पाहणारी येथील व्यवस्था कायम तिला गृहीत धरत आलेली आहे. तिचे जन्माला येणे, वाढणे, हसणे, रडणे, फुलणे, मित्र-मैत्रिणी ठेवणे, बाहेर जावे आणि घरी यावे, शिक्षण घेणे-न घेणे, लग्न करणे, मुले होऊ देणे- न होऊ देणे इथपासून ते खाणे, पिणे, इथपर्यंत तिचे जगणे पार पायखुटी घातलेल्या गायीसारखे आकळून टाकलेले आहे. स्त्री-पुरुषसंबंधाबद्दल नव्याने होणारे बदल, नात्यातील मोकळेपणा, पुरुषाची वाढती सहकार्याची भावना, कामातील सहभाग आजच्या आणि उद्याच्या स्त्रीसाठी अनुकूल बाब आहे. आपल्या स्त्री जोडीदाराबद्दल वाढणारा आदर, तिला समजून घेण्याची वेळप्रसंगी मदत करण्याची भावना, केवळ अधिकाराची भाषा न करता दिली जाणारी समानता आणि कुठल्याच अटी-तटीवर अधारित नसलेले नाते. हे स्त्रियांसाठी अतिशय सुंदर आयुष्याची परिभाषा ठरेल, असे सकारात्मक बदल घडताना दिसून येत आहेत. त्याचे प्रमाण कमी असले तरी ही सुरुवात तर होतेय, ही आनंदाची बाब आहे.

(लेखिका प्रसिद्ध कवयित्री आहेत.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.