- मयूर देवकर 

अगदी एक-दोन वर्षांपूर्वी प्रवीण पाटेकर हे औरंगाबाद शहरातील नाट्यवर्तुळात चर्चिले जाणारे नाव नव्हते. सध्या ‘मॅट्रिक’ आणि ‘पाझर’ या राज्यभर गाजलेल्या एकांकिकांमुळे त्याचे नाव सर्वदूर पसरले. ‘पुरुषोत्तम’ आणि ‘सवई’ करंडक स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकाविण्याची किमया साधल्यानंतर रंगभूमीवरील एक उदयोन्मुख चेहरा म्हणून तो ओळखला जाऊ लागला. पण आज जे यश आणि स्तुती दिसतेय तशी त्यामागे गेल्या दहा वर्षांची कठोर मेहनत आहे. माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी’ गाव ते औरंगाबादमार्गे मुंबई गाठण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सर्व कलापे्रमींसाठी प्रेरणादायी आहे.
माजलगावपासून २२ किलोमीटर अंतरावरील गव्हाणथडी हे बाराशे लोकवस्तीचे गाव. शेजारच्या गावातील शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अंबाजोगाईला बारावी केली. पदवीसाठी बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. पहिल्या वर्षातच हे काही आपले काम नाही याची जाणीव झाली. म्हणून मग पुढचे एक वर्ष शेतात आणि आसपासच्या कारखान्यांवर काम केले. दरम्यान, एलआयसी एजंट म्हणूनही प्रयत्न करून झाले. ‘ग्रामीण भागात मार्गदर्शनाअभावी करिअरच्या वाटा कशा निवडायच्या हा मोठा प्रश्न असतो. आपल्याला नेमके काय करायचे, बरं जे करायचे त्यासाठी कुठं जायचं याची काहीच माहिती मिळत नाही, असे तो सांगतो.

तसं पाहिलं तर प्रवीणचा लहानपणापासूनच कलेकडे ओढा होता. पाचवीत असल्यापासूनच तो कविता आणि छोटी-मोठी नाटकं लिहायचा आणि गणेशोत्सवाच्या काळात ती नाटकं  करायचा. परंतु नववी-दहावीला आल्यावर घरच्यांनी ते बंद करून अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले. बारावीला असताना महाविद्यालयात युवक महोत्सवात अनेक एकांकिका पाहायला मिळाल्या. शेती, कारखाना आणि विमा एजंट म्हणून काम करून झाल्यावर त्याला औरंगाबादला नाटकाचे शिक्षण मिळते असे कळाले. पण घरी कसे सांगणार? औरंगाबादला काही तरी नोकरी शोधण्याचे कारण सांगून तो येथे आला. दरम्यान पदवी शिक्षणासाठी नाट्यशास्त्रात प्रवेश घेतो असे घरी सांगितले. मुलगा काही तरी करतो म्हणून घरूनही परवानगी मिळाली.
ज्यादिवशी औरंगाबादला तो आला तेव्हा जोराचा पाऊस सुरू होता. दिवसभराच्या थकविणा-या प्रक्रियेनंतर अखेर त्याला सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश मिळाला. पुढचे तीन वर्षे त्याच्या जडणघडणीचे ठरणार होते. ‘कॅम्पसमधील गर्दी मला खूप आवडायची. मला गर्दीत काम करायला आवडते.

बारावीनंतर दोन वर्षे वाया गेल्यामुळे ही माझी शेवटची संधी होती. अशा काळात ही गर्दीच मला आश्वस्त करणारी होती, असे तो सांगतो. ग्रामीण भागातून आल्यामुळे त्याला भाषेचा न्यूनगंड होता. त्यामुळे गुपचूप तो अवतीभोवती सुरू असणा-या घटनांचे निरीक्षण करायचा. कोणी सराव करीत असेल तर पाहत बसायचा. दिवसभर एस. बी.च्या नाट्यगृहात बसून राहायचा. तो म्हणतो, ‘मला एखादे नाटक, एखादा सीन किंवा संवाद आवडला तर मी दिवसेंदिवस तेच घेऊन बसायचो. अनेकांना ते वेगळे वाटायचे. पण माझ्यासाठी हा शिकण्याचा एक भाग होता.’ सुरुवातीला काही नाटकांमध्ये छोटी-मोठी कामे करण्याची संधी मिळाली. प्रथम वर्षी तर ‘बॅकस्टेज’चा खूप अनुभव घेतला. त्यामुळे रंगमंच कळण्यासाठी त्याला खूप मदत झाली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुण्याला जावे, असे वाटू लागले. पण घरून नकार आला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला. दरम्यान एमजीएम महाविद्यालयातही सायंकाळचा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला. याच काळात कामानिमित्त मुंबई-पुण्याला जाणे होऊ लागले. तिकडचे नाट्यक्षेत्र अनुभवायला मिळाले. तीन वर्षांनंतर आता कुठे नाटक समजू लागले होते. विविध स्पर्धांमध्ये हजेरी लावली. वेगवेगळी नाटके पाहिली. त्यातून नाट्य जाणिवा विकसित होत गेल्या.

पदव्युत्तरच्या दुस-या वर्षी त्याने ‘अखंड’ नावाचे नाटक लिहिले. चांगले ५५-६० कलाकारांची फौज घेऊन त्याने हे नाटक बसविले. हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे कसे बाजारीकरण झाले, संतांच्या शिकवणीच्या विपरीत लोक कसे वागतात यावर विनोदी शैलीतून भाष्य करणारे हे संगीतमय नाटक चांगलेच जमून आले. ‘गावाकडे लहानपणापासून जे पाहत आलो त्या स्वानुभवातून हे नाटक तयार झाले. त्याची भाषादेखील ग्रामीण. त्यात काम करणारे कलावंतही ग्रामीण भागातीलच घेतले. मला आधी असणारा भाषेचा गंड मनातून काढून मी लिहू लागलो. आलंकारिक भाषा टाळून साधेपणातून वास्तवाच्या जवळ जाणारे नाटक करण्याचा माझा प्रयत्न असतो, असे तो सांगतो. ‘अखंड’चे त्याने पुणे, नाशिक, बीड आणि औरंगाबाद येथे चार व्यावसायिक प्रयोग केले. 

गेल्यावर्षी लेखन-दिग्दर्शन केलेली मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता अधोरेखित करणारी ‘पाझर’ (२०१६) एकांकिका प्रवीणच्या आयुष्यात प्रसिद्धीची गंगा घेऊन आली. पाणीटंचाई आणि त्यातून उद्भवणाºया संघर्षाचे जिवंत चित्रण यामध्ये पाहावयास मिळते. सवई करंडक, दाजीकाका करंडक, बोलीभाषा करंडक, कलश करंडक, नात्यांगण करंडक, सूर्यकांता करंडक, कालिदास करंडक, शाहू मोडक करंडक , अशा विविध स्पर्धांमध्ये ‘पाझर’चे वर्चस्व राहिले. पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावून तर, या एकांकिकेने कमालच केली. पारितोषिके, बक्षिसे आणि स्तुतीची लयलूट करणा-या ‘पाझर’चेही प्रवीणने तिकीट शो केलेत. ‘आपले नाणे खणखणीत असेल लोक पैसे देऊन पाहायला यायला तयार आहेत. आजचा प्रेक्षक नवनवीन विषय पाहायला उत्सुक आहेत. मराठवाड्यात तर इतके भन्नाट विषय आहेत की, ते जर आपण कल्पकपणे मांडू शकलो, तर खूप संधी आहे, असे तो मानतो.

स्त्रीशिक्षणाचा विषय घेऊन केलेली ‘मॅट्रिक’ (२०१७) एकांकिकादेखील यंदा खूप गाजतेय. समता करंडक आणि नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक ‘मॅट्रिक’ला मिळाले. ‘ज्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत, जे प्रश्न मला माहीत आहेत, त्यावरच मी कलाकृती तयार करतो. उगीच मुंबई-पुण्याची नाट्यशैली, त्यांच्या पठडीतील नाटके, उधार घेतलेल्या संकल्पनांवर कलाकृती उभी करण्यात काही अर्थ नाही. आपले जे मूळ आहे ते अधिकाधिक वास्तववादीपणे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे तो म्हणतो. त्याने आतापर्यंत तीन एकांकिका आणि दोन नाटकांचे लेखन केलेले आहे. 

नाटकाच्या ‘व्हिज्युलायझेशन’वर प्रवीणचा विशेष भर असतो. नाटक केवळ संवादामध्ये अडकून ठेवले नाही पाहिजे. ते पाहण्याचे माध्यम आहे. शब्दांच्या ओझ्याखाली दृश्यपरिणामाशी तडजोड नको; परंतु हा दृश्यपरिणाम साधत असताना अतिरंजकपणाही त्याला मान्य नाही. अधिकाधिक साधेपणा आणून वास्तवाशी जवळ जाण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्यानुसार, ‘नाटकातील जिवंतपणा हरवला नाही पाहिजे. सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना भावणारे नाटक आता हरवत चालले आहे. केवळ शास्त्रामध्ये अडकून न पडता ‘एक्स्प्लोअर’ केले पाहिजे. पाहणाºयाला हेलवणारे नाटक असायला हवे, ते जमले तर कमालच असते!

प्रवीण सध्या मुंबईत चांगलाच स्थिरावलेला आहे. ‘नटसम्राट’सारख्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काम करण्याची त्याला संधी मिळाली. सतीश राजवाडे यांच्या अनेक सिनेमांसाठी त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले; परंतु असे असूनही रंगभूमी त्याला काही सोडवत नाही. सध्यादेखील तो राज्य नाट्यस्पर्धेसाठी ‘अखंड’ नाटक अधिक भव्य प्रमाणात सज्ज करीत आहे. तो म्हणतो, ‘रंगभूमीला सोडणे माझ्यासाठी शक्य नाही. एकांकिका-नाटक  करण्यासाठी माझी मुंबई-औरंगाबाद अशी वारी सुरू असते.’